‘अभिनंदन चंदूभय्या, शाब्दिक प्रहार करावा तर असा. एक घाव दोन तुकडे, भाजप मित्रपक्ष असला म्हणून काय झाले? विनाकारण त्रास देत राहतात. तोंड दाबून बुक्क्यांचा मार तरी किती काळ सहन करायचा? त्यामुळे बरे झाले तुम्ही थेट बोललात ते. आता साहेब खूश होतील. आगामी विस्तारात तुमचे मंत्रीपद पक्के. मग दोघे मिळूून सारा उत्तर महाराष्ट्र कवेत घेऊ.’ पलीकडून बोलत असलेल्या जळगावच्या गुलाबरावांनी फोन ठेवला तसे चंद्रकांत रघुवंशींच्या आनंदाला आणखी भरते आले. नंतर एकापाठोपाठ एक फोन येतच राहिले. ते घेता घेता ‘शिंदेंच्या उठावामुळे भाजप जिवंत झाला’ हे वाक्य चंदूभय्यांच्या मनात घोळत राहिले. त्याच आनंदात त्यांनी गाडी काढली व निघाले थेट ठाण्याला. साहेबांना भेटायला.
नंदुरबार मागे पडले तसे त्यांचे विचारचक्र पुन्हा सुरू झाले. माध्यमांशी बोलताना आपले लक्ष्य गावित होते, पण त्यांना बळ देणार्या भाजपलाही त्यांची जागा दाखवणे गरजेचे होतेच. आम्हीच अजेय अशी शेखी मिरवणार्या पक्षाला भ्यायचे तरी किती काळ? कधी तरी वास्तवाची जाणीव करून देणे गरजेचे होते. साहेबांनी बंड केले नसते तर मविआ पुढची १० वर्षे सत्तेत राहिली असती. अगदी भाजपच्या नाकावर टिच्चून. साहेबांचे एक धाडस भाजपला संजीवनी देण्यासाठी पुरेसे ठरले तरीही त्यांना मुख्यमंत्रीपद नाही. आपणही मंत्रीपदापासून वंचित असा विचार मनात येताच त्यांची जीभ चावली.
शिंदेंच्या निवासस्थानी पोहचताच तिथे हजर असलेला प्रत्येक जण त्यांचे अभिनंदन करू लागला. ते दालनात गेल्याबरोबर शिंदेंनी त्यांना मिठीच मारली. उंची शाल पांघरून त्यांचा सत्कार केला. ‘लगे रहो’ असे एकच वाक्य त्यांनी उच्चारले. ‘साहेब, तुम्हीच माझे शुक्राचार्य, संजीवनी विद्या ज्ञात असलेले. तुम्ही जसे भाजपला जिवंत केले तसे मलाही करा. मंत्रीपद देऊन उपकार करा.’ हे ऐकताच शिंदे हसले. ‘सुरू आहे चर्चा नंबर दोनशी’ एवढे सूचक बोलून ते निघाले. यामुळे सद्गदित झालेले चंदूभय्या पुन्हा गावाकडे निघाले. प्रवासात त्यांना त्यांची राजकीय कारकीर्द आठवू लागली. आधी काँग्रेस, मग शिवसेना, त्यात फूट पडल्यावर शेवटी शिंदेसेना. जिकडे सत्ता असेल तिकडे राहायचे. घराण्यातील व्यापारउदिमासाठी ते केव्हाही चांगले. उगीच डोक्याला त्रास नाही. ज्या पक्षात गावित तिथे कधीच जायचे नाही. शेवटी गावितविरोध हाच तर आपल्या राजकारणाचा केंद्रबिंदू असा विचार करत असतानाच त्यांचा फोन वाजला. पलीकडून त्यांच्या उद्योगसमूहाचे व्यवस्थापक बोलत होते.
‘आपल्या चारही प्रतिष्ठानांवर आज काही अधिकारी आले व जुजबी चौकशी करून गेले. त्यात सीबीआय, ईडी, आयकर खात्याचे वरिष्ठ होते.’ ऐकताच चंदूभय्या अस्वस्थ झाले. त्यांनी या तपासयंत्रणेतील काही ओळखीच्यांना फोन करण्यास सुरुवात केली. सर्वांकडून एकच उत्तर मिळाले. ‘वरून आदेश आहेत. जे काय करायचे ते पटकन करा.’ ऐकून भय्यांची अस्वस्थता आणखी वाढली. त्यांनी साहेबांना फोन केला. ‘हूं, बघतो’ म्हणून त्यांनी तो कट केला. आणखी बोलायचे म्हणून पुन्हा फोन केले तरी ते उचलेनात. काय करावे, त्यांना सुचेना. तशीच त्यांनी गाडी वळवली व पुन्हा मुंबईकडे निघाले. थेट वर्षावर जाऊन त्यांनी देवाभाऊंचे पायच धरले.
‘चुकले माझे. माफ करा. तुमचाच पक्ष अजरामर आहे. कुणाला जिवंत ठेवायचे ते तुम्हीच ठरवू शकता. संजीवनी विद्येचे खरे वाहक तुम्हीच.’ तेथून बाहेर पडताच भय्यांना यंत्रणांमधील ओळखीच्या अधिकार्यांचा फोन आला. ‘सब कुछ ओके.’
