लोहारकाम करणार्या घरात जन्मलेले चंद्रशेखर शिल्पी हे लाकडावरल्या कोरीव कामासाठी तसेच दगडी मूर्तींसाठी प्रख्यात होते आणि अलीकडेच त्यांना राष्ट्रीय कारागीर पुरस्कारही मिळाला होता. प्रवास कुठपर्यंत झाला एवढेच महत्त्वाचे नसते, तो कुठून सुरू झाला होता यालाही महत्त्व असते. हे लक्षात घेतल्यास, चंद्रशेखर शिल्पी यांनी लोखंडाऐवजी लाकूड, दगड ही साधने वापरून केवळ उत्तम कारागिरीच केली असे नाही, तर सामाजिक बदलही स्वत:पासून घडवला, हेही लक्षात येईल! पिढीजात व्यवसाय मूर्तिकला हा नसूनही, स्वेच्छेने परंपरा जपणार्या या कलावंताचे निधन १५ ऑगस्ट रोजी झाले.
ओडिशा, तमिळनाडू इथले मूर्तिकार पिढ्यानपिढ्या कला जोपासणारे. तसे चंद्रशेखर नव्हते. तेलंगणालगतच्या यादगीर तालुक्यात त्यांचे मूळ गाव. तिथून ते नडोजा नागण्णा मोनाप्पा बडिगेर यांच्याकडे राहून, गुरुकुल पद्धतीने १८ वर्षे शिकले. तिथले शिक्षण लाकडातल्या कोरीव कामाचे. म्हैसूरच्या लाकडी ‘इनले’ कामापेक्षा हे निराळे. लाकडाला दगडाप्रमाणेच खोदून, तासून ते करण्यात येते. या कामात प्रवीण झाल्यावर चंद्रशेखर दगडी शिल्पेही करू लागले. या भागात मागणी कोणत्या मूर्तींना आहे, हे न पाहता होयसाळ, चालुक्य, राष्ट्रकूट, चोल (चोला) आणि पल्लव काळातल्या मूर्तिकलेचा अभ्यास एकलव्य-वृत्तीने त्यांनी केला. त्यासाठी शिल्पशास्त्र वाचून त्यातील प्रमाणे, लावण्यसंकेत हे त्यांनी आत्मसात केले. पण प्राचीन शिल्पशास्त्र हा वास्तुशास्त्र किंवा स्थापत्यकलेचा भाग (ओडिशातील पिढीजात शिल्पकारांना आजही ‘स्थपती’च म्हणतात); त्यामुळे तेही त्यांनी अभ्यासले.
त्यांचा व्यवसाय बहरला, तो ‘देवरबागलु’ म्हणजे देवळे/ देवघरे आदींच्या दरवाजांचा. ठिकठिकाणांहून या कोरीव लाकडी दरवाजांना मागणी आली आणि वाढली. पण ‘स्वत:साठी’ ते दगडी मूर्तिकला शिकले. पूर्वापार चालत आलेली मूर्तिरूपे करायची, मग त्या मूर्तीच्या भोवतालच्या कमानीवर आपल्या लाकडातल्या कारागिरीचे ज्ञान वापरून कलात्म निर्मिती करायची, अशा प्रकारे त्यांनी स्वत:ची निराळी वाट शोधूनही परंपरा पाळली. पारंपरिक मूर्तिकलेचे शिक्षण घेण्यासाठी गेल्या दोन-तीन दशकांत त्यांच्याकडे विद्यार्थी येऊ लागले.
या मेहनतीचे चीज म्हणजे, ‘कर्नाटक शिल्पकला अकादमी’ चे केवळ सदस्य न राहता ते या अकादमीच्या स्पर्धांचे परीक्षक झाले. पुढे २०१२ मध्ये या अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळाला आणि २०१४ मध्ये कर्नाटकात मानाच्या समजल्या जाणार्या ‘राज्योत्सव प्रशस्ती’ने त्यांना गौरवण्यात आले. यानंतर दशकभराने, २०२४ साली त्यांच्या नावाचा विचार केंद्रीय वस्त्रोद्योग खात्यातर्फे सर्वच प्रकारच्या कारागिरीस देण्यात येणार्या पुरस्कारासाठी झाला आणि २०२५ मध्ये राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार (नॅशनल हॅण्डिक्राफ्ट्स ॲवॉर्ड) त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला.
चंद्रशेखर शिल्पी यांच्यामागे मोठा शिष्यपरिवार असला तरी परिवारातीलच शिष्य- मुलगी गायत्री शिल्पी- यांनी शिल्पकलेत नाव कमावले आहे. कलबुर्गी (पूर्वीचे गुलबर्गा) येथे स्वत:चा स्टुडिओ व कार्यशाळा त्यांनी थाटली होती. तिथल्या दगडी मूर्तींच्याही डोळ्यांत, आपला कर्ता आता कायमचा निघून गेल्याची जाणीव १५ ऑगस्टच्या रात्री तरळली असेल!
