सुरीनाम या दक्षिण अमेरिकेतल्या देशात किमान २७.४ टक्के लोकसंख्या भारतीय वंशाची आहे. भारताच्या पूर्व किनार्यावरून १८६३ ते १९१६ या काळात जे ३४ हजार स्त्रीपुरुष मजुरीसाठी सुरीनामला गेले, त्यांचे हे सारे वंशज. नकाशात ब्राझीलच्या वर आणि गयाना व फ्रेंच गयाना या दोन देशांच्या मधोमध असणारा हा देश १९७५ पर्यंत डचांच्या ताब्यात होता आणि तेव्हापासूनच डचांच्या (नेदरलॅण्ड्स अर्थात हॉलंड) या देशाची राजधानी ॲमस्टरडॅम हे ‘अमली पदार्थ सर्रास मिळणारे शहर’ म्हणून प्रख्यात होते, याचे कारण सुरीनामसारख्या देशात डचांच्याच आशीर्वादामुळे वाढलेला अमली पदार्थ उत्पादनाचा व्यवसाय! हा वसाहतकालीन कलंक पुसून सुरीनामला विकसनशील देश म्हणून ओळख देण्याचा प्रयत्न करणार्या तेथील नेत्यांच्या यादीत चंद्रिकापर्साद संतोखी यांचे नाव अग्रभागी आहे. ‘चॅन संतोखी’ म्हणूनही ओळखल्या जाणार्या माजी राष्ट्राध्यक्षांचे निधन ३० मार्च रोजी, वयाच्या अवघ्या ६७ व्या वर्षी झाले.
ॲमस्टरडॅमच्या पोलीस अकादमीत प्रशिक्षण घेऊन चंद्रिकापर्साद हे पोलीस अधिकारी म्हणून मायदेशात परतले, तोवर अमली पदार्थ व्यापाराचा बुजबुजाट देशभर होता. पुढे तर अमली पदार्थ व्यापारात हात असलेले लष्करी अधिकारी डेसिर बूटेर्स यांनी बंड करून १९८२ या एका वर्षात अनेक राजकीय विरोधकांना संपवले. थेट लष्करशाही न येता, तत्कालीन राष्ट्राध्यक्षांनीच बूटेर्स यांना महत्त्व देऊन आपली खुर्ची टिकवली. त्या १९८२ च्या हत्यांचा तपास पोलीस अधिकारी या नात्याने चंद्रिकापर्साद संतोखी यांनी केला. त्यानंतरच्या निवडणुकीत १९८८ साली रामसेवक शंकर हे राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांचा ‘प्रोग्रेसिव्ह रिफॉर्म पार्टी’ (मूळ नाव ‘युनायटेड हिन्दुस्तानी पार्टी’) हा पक्ष निवडून आला. तरीही बूटेर्स यांचे आव्हान संपले नव्हते. चोख तपासानेही बदल घडत नाही, हे पाहून संतोखीच राजकारणात उतरले. ‘प्रोग्रेसिव्ह रिफॉर्म पार्टी’ (पीआरपी) मध्ये त्यांना वरिष्ठ पद मिळालेच, शिवाय ‘नॅशनल पार्टी’चे रोनाल्ड व्हेनेशियान हे राष्ट्राध्यक्ष असताना, २००५ मध्ये संतोखी हे कायदा खात्याचे मंत्री झाले. वूटेर्स यांनी पुन्हा २०१० मध्ये सत्ता मिळवली आणि १० वर्षे टिकवली. पण या दशकभरात सुरीनामच्या कायदेमंडळाचे (नॅशनल असेम्ब्लीचे) सदस्य असलेल्या संतोखी यांचे नेतृत्वगुण चमकले.
अखेर २०२० मध्ये, संतोखी यांच्या नेतृत्वाखाली बहुपक्षीय आघाडीचे सरकार स्थापन झाले. या आघाडीतील अन्य पक्षांत अमली पदार्थ व्यापारात गुंतलेले काही सहकारी होते, त्यांना मंत्रीपदेही द्यावी लागली. पण ‘अमली पदार्थ व्यापाराच्या कचाट्यातून देशाला सोडवण्यासाठी अर्थव्यवस्थेचीच फेररचना करावी लागेल’ अशा विचाराने आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मदतीने संतोखी यांनी आर्थिक सुधारणा कार्यक्रम राबवला. त्यावर विरोधकांनी इतके रान उठवले की, सुरीनामच्या नॅशनल असेम्ब्लीत आंदोलक घुसले. पण बांगलादेशच्या हसीना वा नेपाळचे ओली यांच्याप्रमाणे न डगमगता, संतोखी यांनी पद तर टिकवलेच, पण आंदोलनही शांत केले आणि आर्थिक सुधारणांची कासही सोडली नाही, हे त्यांचे मोठेपण!
भारताकडून संतोखी यांना मोठ्या आशा होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जाहीर कौतुक करणार्या संतोखी यांनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांचाही पाहुणचार सुरीनाममध्ये केला होता, तर भारताने त्यांना २०२१ मध्ये ‘प्रवासी भारतीय सन्मान’ दिला होता.
