scorecardresearch

Premium

खेळ, खेळी खेळिया : मँचेस्टर ‘डिव्हायडेड’..!

मँचेस्टरचे फुटबॉलपटू आंतरराष्ट्रीय स्टार खेळाडू बनले. पण दोन महत्त्वाच्या घटनांनी मँचेस्टर युनायटेडची विजयमालिका आणि दरारा कमी झाला.

controversy in manchester united football club
इंग्लंडचा मँचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लब

सिद्धार्थ खांडेकर

मँचेस्टर क्लब गेला काही काळ सातत्याने वादांच्या केंद्रस्थानी आहे..

Brian Lara WI vs AUS
WI vs AUS : वेस्ट इंडिजचा ऐतिहासिक विजय अन् समालोचनादरम्यान ब्रायन लाराला अश्रू अनावर, VIDEO व्हायरल
AUS vs WI 2nd Test Match Updates in marathi
AUS vs WI 2nd Test : वेस्ट इंडिजचा ऑस्ट्रेलियावर ८ धावांनी ऐतिहासिक विजय, शमर जोसेफ ठरला विजयाचा शिल्पकार
Kevin Sinclair cartwheel
क्रिकेटच्या मैदानावर कोलांटउड्या सेलिब्रेशन व्हायरल; वेस्ट इंडिजच्या केव्हिन सिनक्लेअरची धमाल
Australian Open Tennis Tournament Carlos Alcaraz defeated by Alexander Zverev sport news
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा: झ्वेरेव्हचा अल्कराझला धक्का; पुरुष एकेरीत मेदवेदेवचीही उपांत्य फेरीत धडक

जगातील सर्वात प्रसिद्ध आणि ग्लॅमरस म्हणवला जाणारा इंग्लंडचा मँचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लब सध्या पुन्हा एकदा वादांच्या केंद्रस्थानी आहे. बरीच वर्षे रया गेल्यानंतर गतवैभव मिळवण्यासाठी तो झगडतोय. गेली दहा वर्षे या क्लबला इंग्लिश प्रीमियर लीगचे अजिंक्यपद मिळवता आलेले नाही, ही क्लबच्या चाहत्यांची मुख्य तक्रार. महान फुटबॉल प्रशिक्षक सर अलेक्स फग्र्युसन यांनी निवृत्ती घेतल्यानंतर प्रीमियर लीग किंवा चँपियन्स लीग जिंकून देऊ शकेल असा एकही प्रशिक्षक मँचेस्टर युनायटेडला लाभलेला नाही. इंग्लिश अजिंक्यपद नाही आणि युरोपीय चँपियन्स अजिंक्यपदानेही हुलकावणी दिली आहे. दरम्यानच्या काळात या क्लबचा मँचेस्टरमधीलच नगरबंधू असलेल्या मँचेस्टर सिटीने काही वेळा प्रीमियर लीग जिंकली आणि गतवर्षी युरोपियन चँपियन्स लीग अजिंक्यपदासह तिहेरी अजिंक्यपदे पटकावली. मँचेस्टर युनायटेडचे ‘कट्टर वैरी’ म्हणवल्या जाणाऱ्या लिव्हरपूलनेही या काळात प्रीमियर आणि युरोपीय चँपियन्स लीग जिंकून दाखवली. १९९०च्या दशकात आणि नवीन सहस्रकाच्या पहिल्या दशकात मँचेस्टर युनायटेडचा दरारा होता. इंग्लिश प्रीमियर लीग भारतासह अनेक आशियाई देशांमध्येही दाखवली जाऊ लागल्यामुळे मोठय़ा प्रमाणात निष्ठावान युवा चाहतावर्गही या विशाल टापूतून मँचेस्टर युनायटेडला मिळाला होता. क्लबच्या वलयात त्यामुळे भरच पडली. मँचेस्टर, म्युनिच, माद्रिद, मिलान येथील प्रमुख क्लबच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे अनेकदा तेथील देशवासीयांचे लक्षही या क्लबकडे लागलेले असते. विशेषत: इंग्लंडच्या बाबतीत प्रदीर्घ काळ राष्ट्रीय फुटबॉल संघाच्या ट्रॉफी दुष्काळामुळे मँचेस्टर युनायटेडच्या यशालाच राष्ट्रीय यश मानले जाऊ लागले. त्यामुळेही मँचेस्टर युनायटेडचा प्रभाव वाढू लागला. सर अलेक्स फग्र्युसन या स्कॉटिश व्यवस्थापकाकडे मँचेस्टर युनायटेडची धुरा आल्यानंतर स्पेनच्या रेआल माद्रिदप्रमाणेच मँचेस्टरही अत्यंत यशस्वी क्लब म्हणून ओळखला जाऊ लागला. फग्र्युसन यांच्या कार्यकाळात १३ प्रीमियर लीग आणि दोन युरोपियन चँपियन्स लीग अशी या क्लबची घसघशीत पदक कमाई झाली. डेव्हिड बेकहॅम, ख्रिस्तियानो रोनाल्डो, वेन रूनी हे मँचेस्टरचे फुटबॉलपटू आंतरराष्ट्रीय स्टार खेळाडू बनले. पण दोन महत्त्वाच्या घटनांनी मँचेस्टर युनायटेडची विजयमालिका आणि दरारा कमी झाला.

हेही वाचा >>> अन्वयार्थ : मग कसला ‘समन्यायी’ विकास?

त्यांतील पहिली घटना मँचेस्टर युनायटेडची मालकी अमेरिकेतील ग्लेझर कुटुंबीयांकडे जाणे, आणि दुसरी घटना म्हणजे अर्थातच २०१२-१३ हंगामानंतर फग्र्युसन यांचे निवृत्त होणे.

ग्लेझर कुटुंबीयांकडे मँचेस्टरची मालकी २००५मध्ये आली. सुरुवातीच्या काळात फग्र्युसन यांचा दरारा आणि मँचेस्टर युनायटेडची कामगिरी या दोन घटकांमुळे मालक म्हणून ग्लेझर यांच्या उणिवा प्रकर्षांने समोर आल्या नव्हत्या. परंतु फग्र्युसन यांचे नंतर ग्लेझर कुटुंबीयांशी खटके उडू लागले. फग्र्युसन यांच्या निवृत्तीनंतर मँचेस्टर युनायटेडला गतवैभव मिळवून देण्यासाठी आवश्यक योजना आणि दृष्टी ग्लेझर कुटुंबीयांकडे नव्हती. मालक मंडळी फारशी इंग्लंडमध्ये फिरकतच नाहीत. त्यामुळे युरोपातील फुटबॉल बाजारपेठ, खेळाडू, प्रशिक्षक, नवीन प्रयोग आणि मुख्य म्हणजे चाहत्यांच्या भावना यांचा त्यांना थांग लागत नाही. कारण असे काही करण्याची त्यांना फारशी पडलेलीही नाही असा मँचेस्टरच्या कट्टर चाहत्यांचा वर्षांनुवर्षे आक्षेप आहे. शिवाय माल्कम ग्लेझर आणि इतर मंडळींनी त्यांच्यावरील अवाढव्य कर्जे फेडण्यासाठी मँचेस्टर युनायटेडचा तारण म्हणून वापर केला. मँचेस्टरच्या मालमत्ता गहाण ठेवल्यामुळे उत्पन्न वाढले, तरी कर्जावरील परतफेडीचा बोजाही वाढत गेला. तशात माल्कम ग्लेझर यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या वारसांनी मँचेस्टर युनायटेडच्या उत्पन्नातील मोठा हिस्सा लाभांश म्हणून मटकवायला सुरुवात केली आणि चाहते आणखी बिथरले.

इतके होऊनही मँचेस्टर युनायटेडची गणना जगातील श्रीमंत क्लबांमध्ये आजही होतेच. पण इतका पैसा असूनही रेआल माद्रिद, बायर्न म्युनिच, बार्सिलोना, मँचेस्टर सिटी, युव्हेंटस अशा इतर बडय़ा क्लबांसारखे सातत्य मँचेस्टर युनायटेडला दाखवता येत नाही, ही मँचेस्टरच्या चाहत्यांची खदखद आहे. याचे एक कारण म्हणजे फुटबॉल क्लबचे परिचालन करताना विजयी मानसिकता आणि संस्कृती रुजवण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची असते, त्यात ग्लेझर फारच तोकडे ठरले. गेली काही वर्षे त्यांनी क्लबमधील मालकी हिस्सा विकण्याचा घाट घातला आहे. गतवर्षी कतारच्या आमिर मंडळींनी रस दाखवला, पण मँचेस्टर युनायटेडचे मूल्यांकन त्यांच्या दृष्टीने अवाढव्य आणि अवास्तव ठरले. गेल्या काही वर्षांमध्ये होजे मोरिन्यो, लुइस व्हॅन गालसारखे उत्तम प्रशिक्षक क्लबने करारबद्ध केले. त्यांच्याकडून म्हणावी तशी कामगिरी झाली नाही. या प्रशिक्षकांच्या मर्जीतले, त्यांचे लाडके पण भर ओसरलेले महागडे फुटबॉलपटू खरीदण्याची मुभा ग्लेझरकडून त्यांना मिळाली होती. त्यांच्याऐवजी अधिक दर्दी मालक मंडळींनी प्रशिक्षकांबरोबर चर्चा करून खेळाडू करारबद्ध करण्याची जबाबदारी पार पाडली असती. मँचेस्टर युनायटेडच्या फुटबॉल संस्कृतीचा अविभाज्य घटक म्हणजे ओल्ड ट्रॅफर्ड येथील भव्य स्टेडियम. आज इंग्लंडमधील बहुतेक सगळे प्रमुख क्लब नवे स्टेडियम उभारत आहेत किंवा सध्याच्या स्टेडियममध्ये सुधारणा करत आहेत. तसे काही करण्याची गरज ग्लेझरना वाटली नाही. क्लबचे मेरुमणी सर बॉबी चाल्र्टन यांच्या जिवंतपणीच त्यांचे नाव एका स्टँडला दिले गेले. पण अल्पावधीतच या स्टँडचे छप्पर गळू लागले होते.

हेही वाचा >>> बुकमार्क : खरंच, उशीर झालाय!

क्लबची प्रीमियर लीगच्या ताज्या हंगामात दोलायमान अवस्था आहे. चेल्सीविरुद्ध विजय मिळवण्याआधी न्यूकॅसल, मँचेस्टर सिटीविरुद्ध पराभव झालेले होते. फग्र्युसन यांच्या २६ वर्षांमध्ये घरच्या मैदानावर क्लब जितके सामने हरला, त्यापेक्षा थोडे अधिक गेल्या दहा वर्षांत गमावलेले आहेत. एरिक टेन हाग या डच प्रशिक्षकांनी गतहंगामात चांगली कामगिरी करून प्रीमियर लीगमध्ये क्लबला पहिला पाचात आणले होते. विद्यमान हंगामात त्यांची पकड निसटू लागल्याची स्पष्ट चिन्हे आहेत. जेडन सांचो, मार्कस रॅशफर्ड, अँटनी यांना सूर गवसलेला नाही किंवा त्यांच्याशी मतभेद असल्यामुळे त्यांना वारंवार वगळले जाते. एरिक यांना स्वत:ची ऐशी शैलीच निर्माण करता आलेली नाही, त्यामुळे मैदानावर तो गोंधळ, संभ्रम स्पष्ट दिसतो. युर्गेन क्लॉप यांच्या मार्गदर्शनाखाली लिव्हरपूलचा संघ एका विशिष्ट शैलीत खेळतो. पेप गार्डियोला यांच्या हेडमास्तरी करडय़ा नजरेखाली मँचेस्टर सिटीच्या शैलीत जराही बदल होत नाही. अ‍ॅस्टन व्हिला, टॉटनहॅम या क्लबनीही शैलीत योग्य तो बदल केल्याचे फायदे त्यांना मिळत आहेत. मँचेस्टर युनायटेडचा ‘जुना दुश्मन’ आर्सेनल सध्या अग्रस्थानावर विराजमान आहे. न्यूकॅसलसारखा संघ सातत्याने मँचेस्टर युनायटेडला हरवताना नितांतसुंदर आक्रमक खेळाचे दर्शन घडवत आहे. या सगळय़ांच्या तुलनेत श्रीमंत मँचेस्टर युनायटेड चाचपडत आहे आणि त्याचे चाहते चरफडत आहेत. विद्यमान इंग्लिश फुटबॉल हंगामाचा मध्यविराम जवळ आला आहे. नाताळनंतर योग्य ते बदल शैलीत झाले नाहीत, तर पहिल्या पाचात येण्याचीही या क्लबची क्षमता नाही असे क्लबचेच प्रतिभावान माजी फुटबॉलपटू सांगू लागले आहेत. पण ही बाब ज्यांना प्राधान्याने दिसायला हवी, ते ग्लेझर कुटुंबीय फार विचलित झालेले दिसत नाही. एरिक टेन हाग यांच्या शैलीवर संघातीलच काही खेळाडू नाराज असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. मँचेस्टर युनायटेड अशा प्रकारे मँचेस्टर ‘डिव्हायडेड’ ठरू लागले आहेत. या भानगडीत कदाचित एरिक यांना बकरा बनवले जाईल. पण त्यातून मँचेस्टर युनायटेडच्या समस्या सुटणाऱ्या नाहीत. sidhharth.khandekar@expressindia.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chaos and controversy in manchester united football club zws

First published on: 09-12-2023 at 03:47 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×