लोककलांमध्ये पुरुषांनी स्त्री पात्र साकारण्याची परंपरा भारताच्या विविध राज्यांत, प्रदीर्घ काळ जोपासली गेली. मात्र व्यावसायिकरीत्या स्त्री पात्र वठवणार्यांच्या आयुष्यातील आव्हानं काही कोणत्याच काळात कमी झाली नाहीत. पश्चिम बंगालमध्ये चपल राणी म्हणून प्रसिद्ध असलेले लोककलाकार चपल भादुरी यांचा प्रवास हा या सर्व आव्हानांचा आणि चढउतारांचा आलेख म्हणावा असाच.
‘चपल रानी, द लास्ट क्वीन ऑफ बंगाल : द लाइफ अँड टाइम्स ऑफ अ फीमेल इंपर्सनेटर’ हे संदीप रॉय यांनी लिहिलेलं भादुरी यांचं चरित्र नुकतंच प्रसिद्ध झालं. पुस्तक चपल राणीची कथा आणि व्यथा मांडतानाच बंगालमधील लोकनाट्यांचा प्रवासही कथन करतं. चपल भादुरी आणि प्रसिद्ध अभिनेत्री असलेली त्यांची आई यांच्यातील बंधाचा वेध पुस्तकात घेण्यात आला आहे. सुरुवातीच्या काळातील संघर्ष ते एकप्रभावशाली व्यक्तिमत्त्व असा प्रवास, लोकनाट्यांत स्त्री कलाकार अभिनय करू लागण्याचा काळ, त्यातून स्त्री पात्र साकारणार्या पुरुष कलाकारांची पीछेहाट, चपल यांच्या आयुष्यावरील माहितीपट, त्यांची कॅनडा भेट आणि वृद्धाश्रमात संपलेला त्यांचा जीवनप्रवास पुस्तकात मांडण्यात आला आहे.
