तारक काटे

गांधीजींचे आयुष्य म्हणजे सामान्य माणसाने स्वत:ला जाणीवपूर्वक घडवत राहून असामान्यत्वाकडे केलेला प्रवास आहे. आज जग युद्ध आणि द्वेषात अडकत चालले असताना गांधींच्या विचारांचा नव्याने वेध घेणे गरजेचे वाटते..

Ram Navmi 2024 Ram Raksha Stotra Reading Benefits in Marathi
Ram Navami 2024 : जाणून घ्या ‘रामरक्षा’ अन् भगवान शंकराचा ‘हा’ संबंध; पाहा, दररोज रामरक्षा स्तोत्र म्हटल्याचे फायदे
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…

गांधीजींचे जीवन आणि कार्य समजून घेऊन जगाला आज भेडसावणाऱ्या प्रश्नांना गांधीविचारांच्या आधारे उत्तरे गवसू शकतात का हे पाहणे, हा गांधीवादावरील या लेखमालेचा उद्देश होता. या समारोपीय लेखाच्या निमित्ताने गांधीजी मला कितपत समजले हे मांडण्याचा हा संक्षिप्त प्रयत्न..

गांधीजींचे आयुष्य म्हणजे सामान्य माणसाने स्वत:ला जाणीवपूर्वक घडवत राहून असामान्यत्वाकडे केलेला प्रवास आहे. आत्मभान, जगाविषयीची डोळस दृष्टी, मानवी मूल्यांवरील अपार श्रद्धा, दुसऱ्याच्या व्यक्तित्वाचा आणि विचारांचा आदर करण्याची नम्र वृत्ती, पारदर्शी व्यवहार, स्वत:चा सतत घेतला जाणारा शोध, त्याप्रमाणे गवसलेल्या नव्या सत्याच्या आधारे स्वत:च्या विचारांत आणि कृतीत बदल घडवून आणण्याची तयारी, समाजसेवेसाठी पूर्ण समर्पण हे गुण त्यांना मोहनदासाकडून महात्मापदाकडे घेऊन गेले.

पोरबंदरमधील एका सुखवस्तू घरात सदाचरणी आई-वडिलांच्या संस्कारांत गांधीजींचे बालपण गेले. मात्र चुकीच्या संगतीने व्यसने जडली, चोरीचीही सवय लागली. पुढे त्यांना याचा पश्चात्ताप झाला आणि त्यांनी स्वत:च यातून स्वत:ची सुटका केली. दुबळय़ा शरीराचा आणि बुजऱ्या स्वभावाचा, अभ्यासात सामान्य परंतु शाळेत नियमित येणारा आज्ञाधारक विद्यार्थी असे त्यांचे शालेय जीवनातील व्यक्तित्व. इंग्लंडमध्ये कायदेविषयक शिक्षण घेताना तेथील भारतीय विद्यार्थ्यांची आर्थिक विपन्नता पाहून त्यांनी काटकसरीने जगण्यास सुरुवात केली. 

Indian Currency Note: नोटांवर आधी गांधीजींचा फोटो नव्हताच; वाचा नेमका काय आहे भारतीय चलनाचा इतिहास! कशा छापल्या जातात नोटा!

त्यांच्या आचार-विचारांत खरे क्रांतिकारी परिवर्तन झाले ते दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्यात. तापट स्वभावावर त्यांनी निग्रहपूर्वक नियंत्रण मिळवले. वकिली करताना अशिलाने सत्य सांगितले पाहिजे, हा त्यांचा आग्रह असे. स्थानिक भारतीय व कृष्णवर्णीयांवरील अन्यायाविरुद्ध लढताना त्यांना नवे सामाजिक भान आले. मिळालेल्या महागडय़ा भेटवस्तूंचे आणि मालमत्तेचे त्यांनी सामाजिक विश्वस्त निधीमध्ये रूपांतर केले आणि अपरिग्रहाकडे वाटचाल सुरू केली. जॉन रस्किनच्या ‘अनटू द लास्ट’ या पुस्तकामुळे त्यांच्या विचारांत अंतर्बाह्य बदल झाला. किमान गरजांवर आधारित साधे पण अर्थपूर्ण जीवन जगणे महत्त्वाचे वाटल्याने त्यांनी फिनिक्स आश्रम स्थापन केला आणि तेथील शेतावर कुटुंबीय व इतर सहकाऱ्यांसोबत सार्वजनिक जीवन अंगीकारले. जग अधिक सुंदर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत हे त्यांना जाणवू लागले.

आध्यात्मिक चिंतनामुळे त्यांना वैयक्तिक व आत्मकेंद्री विकारांपासून अलिप्त राहणे शक्य झाले. आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता काय हे समजून घेऊन त्यांनी गीतेच्या शिकवणीप्रमाणे कर्मयोगाचा स्वीकार केला. एकंदरीत दक्षिण आफ्रिकेत असतानाच गांधीजींची महात्मापदाकडे वाटचाल झाली.

१९१५ साली भारतात परतल्यानंतर त्यांनी संपूर्ण देशात भ्रमण केले आणि त्यांना येथील सर्वसामान्यांच्या दैन्याचे खरे दर्शन घडले. त्यांच्याशी समरस होण्यासाठी त्यांनी एकवस्त्रत्वाचा स्वीकार केला. चंपारण आणि खेडा जिल्ह्यातील सत्याग्रहांचे नेतृत्व करताना गांधीजींना शेतकऱ्यांच्या दुरवस्थेची तीव्र जाणीव झाली. भारतातील दारिद्रय़ाचे प्रश्न सोडवायचे असतील, तर देशात बहुसंख्येने असलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविले पाहिजेत याचे भान त्यांना आले. अहमदाबादच्या गिरणी कामगारांच्या न्याय्य लढय़ाला त्यांनी पाठिंबा दिला. या साऱ्यातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणारा नेता म्हणून त्यांचा देशातील जनतेने स्वीकार केला.

गांधीजींवर दोषारोप करून मोकळे होण्यापूर्वी…

इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढय़ात १९२० च्या सुमारास गांधीजींनी काँग्रेसच्या नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी रूढ केलेली असहकार, सत्याग्रह, सविनय कायदेभंग ही तेव्हाच्या प्रचलित राजकारणासाठी राजकीय प्रतिकाराची सर्वस्वी नवी आयुधे होती. हिंसात्मक विरोध सत्ताधीशांना चिरडून टाकता येतो. परंतु अन्यायाविरुद्ध हिंसाचाराचा अवलंब न करता उभे राहिल्यास सत्ताधीशांचा नाइलाज होतो, हे या आंदोलनांतून ध्यानात आले. गांधीजींनी भारतीय जनतेला निर्भय केले आणि इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचा आत्मविश्वास दिला. चौरीचौरासारख्या ठिकाणी सत्याग्रहाला हिंसेचे गालबोट लागले, तेव्हा गांधीजींनी तो ताबडतोब मागे घेतला. ‘साध्या’चा मार्गदेखील शुद्ध असावा हे भान त्यांनी आपल्या संपूर्ण राजकीय जीवनात कटाक्षाने पाळले. त्यांनी उगारलेले सत्याग्रहाचे नवे आयुध जनतेला राजकीय लढय़ात सहभागी होण्याची संधी देत होते.

गांधीजींनी जनतेला अन्याय्य कायदे जाहीररीत्या मोडण्याची शिकवण दिली, पण सोबतच कैद केल्यास तेथील नियम शांतपणे पाळण्याची शिस्तही शिकविली. गांधीजींनी टिळकांच्या राष्ट्रवादाला सुधारणावादाची जोड देऊन तो अधिक व्यापक केला. त्यामुळे १९२० ते १९३० या काळात देश खडबडून जागा झाला. नेहरू, राजाजी, पटेल, सुभाषचंद्र, मौलाना आझाद, राजेंद्रप्रसाद यांसारखे उच्चशिक्षित, कर्तबगार, बुद्धिमान परंतु विचार व स्वभावानेही भिन्न असलेले विविध वयांचे किती तरी विचारवंत गांधीजींकडे आकर्षित होऊन त्यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले.

१९२० ते १९४७ या काळात गांधीजी निर्विवादपणे भारतीय जनतेचे नेते होते. या काळातच त्यांनी खादीप्रसार, ग्रामोद्योग, नई तालीम, ग्रामीण स्वच्छता, अस्पृश्यता निवारण, राष्ट्रभाषाप्रचार यांसारख्या विविध समाजोपयोगी उपक्रमांना चालना दिली. खेडय़ांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वयंसेवकांची फळी उभारली. गरिबांना विकासाच्या संधी मिळून, समाजात योग्य प्रतिष्ठा प्राप्त व्हावी हे त्यांचे उद्दिष्ट होते. गांधीजी स्वत:ला सनातनी हिंदू म्हणवत असले, तरी त्यांनी कधीही व्रत-वैकल्ये, पूजाअर्चा अशी कर्मकांडे केली नाही. मात्र सकाळी फिरायला जाणे, सायंकाळची सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थना, सोमवारचे मौन हे नियम कधी चुकविले नाहीत. दैनिक वेळापत्रक अतिशय व्यग्र असूनही ते ‘हरिजन’ साप्ताहिकासाठीचे दोन दिवस वगळता आठवडय़ाचे इतर पाचही दिवस भेटीला येणाऱ्यांसाठी राखून ठेवत. यात राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, परदेशी व्यक्ती, पत्रकार यांसोबतच सामान्य माणसांचाही समावेश असे. त्यांना भेडसावणाऱ्या सामाजिक, व्यावसायिक, कौटुंबिक, वैयक्तिक अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांसंबंधी सल्ला हवा असे; कारण गांधीजी त्यांना अगदी जवळचे वाटत. त्यांना रोज सरासरी शंभर पत्रे येत. त्यापैकी सुमारे १० पत्रांना ते स्वहस्ताक्षरात उत्तरे पाठवत, तर इतर पत्रोत्तरांचा आशय आपल्या सचिवांना सांगत. मात्र प्रत्येक पत्राला उत्तर देत.

चतु:सूत्र : गांधीजींच्या जनआंदोलनांमागील भूमिका

सतत चाललेल्या आत्मशोधामुळे गांधीजींचा स्वभावही बदलत गेला. पूर्वी काहीसे कठोर असलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व जास्त प्रेमळ व मृदू होत गेले. आश्रमातील मुले व महिलांच्या बाबतीत त्यांचा व्यवहार अगदी खेळीमेळीचा होता. स्वत:च्या मुलांना बापाचे प्रेम देऊ शकलो नाही याचा पश्चात्ताप होऊन पुढे ते फार हळवे झाले. कस्तुरबा त्यांच्या अस्तित्वाचा भाग झाल्या होत्या. एकूणच उत्तरायुष्यात त्यांच्या स्वभावातील करुणा, प्रेम, ऋजुता, सेवा हे भाव प्रभावी झालेले दिसतात. या काळात गांधीजी समाजकारणात जास्त रमले. राजकारणातील बहुतेक निर्णय काँग्रेस संघटनाच घेऊ लागली व फक्त महत्त्वाच्या विषयांवरच त्यांचा सल्ला घेतला जाऊ लागला. देशाच्या फाळणीला त्यांचा विरोध होता, मात्र तत्कालीन राजकीय परिस्थिती पाहता त्यांना काँग्रेसच्या नेत्यांच्या या निर्णयाला पाठिंबा द्यावा लागला. फाळणीतून उद्भवलेला हिंसाचार पाहून ते उद्विग्न झाले. आयुष्यभर जोपासलेल्या अहिंसेची ती शोकांतिकाच होती. दूर पूर्व बंगालमधील नौखालीत गावोगावी पदयात्रा करून त्यांनी हा हिंसाचार शमविण्याचा आणि अत्याचाराला बळी पडलेल्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. या हिंसाचाराविरुद्ध त्यांनी केलेल्या उपवासांमुळेच दिल्ली, कलकत्ता आणि बिहारमधील दंगे शमविले जाऊ शकले. या काळात ते एकाकी झाले, तरी गीतेच्या शिकवणीप्रमाणे निहित कर्म करीत राहिले.

माणूस बदलू शकतो यावर त्यांचा अढळ विश्वास होता. त्यामुळे विरोधकांशीही त्यांचा संवाद कायम राहिला. तळागाळातील माणसांबद्दलची आस्था त्यांना जनसामान्यांशी जोडत गेली. स्वत: नि:स्पृह आणि स्वेच्छेने गरिबीत जगणारा एक पुण्यवान माणूस देशातील दरिद्रीनारायणाच्या भल्यासाठी झिजतोय यावर त्यांची श्रद्धा होती. त्यांच्या दृष्टीने ते एक संतच होते. जगातील अनेक नामवंतांवर गांधीजींचा प्रभाव होता. अल्बर्ट आईनस्टाईनसारख्या द्रष्टय़ा शास्त्रज्ञालाही त्या काळातील कोणत्याही राजकारण्यापेक्षा गांधीजींची विचारप्रणाली जास्त प्रभावशाली वाटली व त्यामुळे त्यांना गांधीजी अनेक पिढय़ांसाठीचे आदर्श वाटले. जगभर आजही गांधीजींच्या विचारांचे आकर्षण आहे. आपला देश मात्र त्यांना हरवत चालला आहे. आज जग पुन्हा युद्ध, धार्मिक उन्माद, द्वेष यात अडकत चालले आहे. भौतिक हव्यास वाढत चालला आहे. पर्यावरणीय प्रश्न, बहुराष्ट्रीय कंपन्यांचे शोषण, भांडवलशाहीची आक्रमकता, आर्थिक विषमता यात सामान्य माणूस भरडला जात आहे. अशा वेळी गांधींच्या विचारांचा नव्याने वेध घेणे गरजेचे वाटते. या लेखमालेसाठी लिखाणासाठी संधी दिली याबद्दल ‘लोकसत्ता’चे मन:पूर्वक आभार!