हिनाकौसर खान

दोन माणसांना निखळपणे मैत्री करण्यासाठीदेखील कुणाची तरी परवानगी घ्यावी लागेल इतकी अराजकता कधी आली? रंधीकपूर नावाच्या एका गावात हिंदू-मुस्लीम दंगल पेटली होती. गावातले मुसलमान हातात नंग्या तलवारी घेऊन गावभर नाचत होते. गर्भवती चंद्रिका तीन वर्षांच्या मुलीसह डोहाळजेवण करायला माहेरी आली होती. दंगल पेटल्यावर १५ जणांच्या कुटुंबानं गाव सोडायचा निर्णय घेतला. चुलत्यानं गाडी काढली. लहान लेकरांसह गाडीत सगळे दाटीवाटीनं बसले. गाडीनं गावाबाहेरचा रस्ता धरला. नेहमीची वाट सोडून एक छुपा रस्ता घ्यायला ते वळले. पण मुसलमानांची तरुण पोरं नेमकी त्या रस्त्यावर दबा धरून बसली होती.

children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
Lok Sabha Election, Lok Sabha Election 2024,
डोके ठिकाणावर ठेवून मतदान कराल ना?
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे

गाडीची चाहूल लागताच सगळे लाठय़ाकाठय़ा, तलवारी घेऊन सज्ज झाले. गाडी जवळ आली आणि पोरांनी हल्लाबोल केला. चंद्रिकाच्या मांडीवरची मुलगी कुणीतरी दूर फेकून दिली. तिच्या ओल्या बाळंतीण बहिणीचं दोन दिवसांचं बाळ दगडावर आपटलं. तिच्यावर बलात्कार झाला. गाडीतल्या पोराबाळांना, बायाबापडय़ांनाही खेचून बाहेर काढून सपासप वार करत १४ जणांना जागीच मारलं. चंद्रिकाचं पोट दिसत होतंच तरी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला. ती बेशुद्ध झाली. मेली समजून तिला मारेकरी पोरांनी सोडलं, त्यामुळं ती वाचली. ती अजूनही लपूनछपून जगतेय. असं ऐकण्यात येतंय की तिच्या गुन्हेगारांना मोठमोठे लोक ‘दावत’वर बोलवून त्यांचा सत्कार करतात. या मारेकऱ्यांनी असं उजळ माथ्यानं बिनधास्त फिरावं?

सोलापूरमध्ये राहणाऱ्या मनीष आणि सबाच्या कुटुंबाचं जुनं सख्य. मनीषचं लग्न झालंय. सबा अजून शिकतेय. दोघं एका कामाच्या ठिकाणी भेटले. कामाला वेळ होता म्हणून आइस्क्रीम खात उभे होते. कुठून तरी ही गोष्ट कट्टर मुस्लीम संघटनेला समजली.‘‘ए, ७ ७ ७ आमच्या मुलीला पळवणार? आमच्याकडे काय ‘मर्द’ नाहीत? प्रेम करतोस? लवजिहाद? जिहाद फक्त मुसलमान करतात, ठाऊक नाही? ७७७ तुला ‘लव रामायण’ करावं लागेल.. ’’ असं म्हणत त्यांनी मनीषला चिखलासारखा तुडवला. सबा सांगतेय, ‘तो माझा मानलेला भाऊ आहे. तुम्ही समजताय तसं काहीच नाही, आम्ही नुसते मित्र आहोत.’ पण तिचं कोण ऐकतंय. उलट तिच्या घरच्यांना बोलवून संघटनेच्या गरम डोक्याच्या पोरांनी त्यांनाच दमदाटी केली, ‘‘छोकरी हिंदू लडके के साथ घुमरी. ध्यान किधर तुम्हारा’’ मनीषला आणखी बेदम मारहाण करून मुस्लीम पोरं फरार झाली. आता मागे उरलेला तो जगेल का? जगला तर कुठल्या अवस्थेत?

गंगा नदीच्या काठावर मुस्लिमांनी मोठा इज्तेमा भरवला होता. हजारोंच्या संख्येनं पांढऱ्या परिवेशात टोपीदाढीधारी माणसं गोळा झाली होती. अरबी-उर्दू भाषेत त्यांचं पुटपुटणं सुरू होतं. हळूहळू आवर्तनं वाढत गेली. धर्मनेत्याने बयान सुरू केलं, ‘आपल्याला धर्माधिष्ठित इस्लामी राष्ट्र बनवायचंय. आपले शंभर लोक असे तयार व्हायला पाहिजेत जे स्वत: मरायला, मारायला आणि तुरुंगात जायला तयार होतील. ईदशिवाय कुठलाही सणवार साजरा होऊ द्यायचा नाहीये. त्यांची आर्थिक कोंडी करायची. कसलाच व्यवहार करायचा नाही. पूर्ण बायकॉट. उलट आपलं मिशन ‘सफाई आंदोलन’ (जेनोसाइड) झालं पाहिजे. रस्त्यावर आपल्याच यात्रा पाहिजेत. दगडंदेखील आपल्याच हातात पाहिजेत. सज्ज व्हा..’ हा पुकारा ऐकून सळसळत्या रक्ताच्या तडफदार बाण्याच्या, स्वत:चा मेंदू अजिबात वापरायची इच्छा नसणाऱ्या मुस्लीम तरुणांनी काठय़ा हातात घेतल्या. नंग्या तलवारी हवेत फिरवल्या. कोयत्यांना धार लावली. काही नाही मिळालं तर दगडं हातात घेतली आणि त्वेषानं इस्लाम राष्ट्राचा जयघोष केला. थरकाप उडवणारा हा प्रकार आपण खपवून घ्यायचा?
चंद्रिकाच्या त्या गुन्हेगारांना शिक्षा मिळायला नको? मनीषची काय चूक होती? त्यानं जगावं असं वाटतंय का? उपटसुंभ बयान करत द्वेष पेरणाऱ्या भडकाऊ सभांना कोण परवानग्या देतं? अशा सभा उधळून नको लावायला का?

या मुद्दय़ांची उत्तरं ‘होय!’ येत असेल तर आणखी एक गोष्ट करूयात? चंद्रिकाच्या जागी जिच्यासोबत ही घटना घडली त्या बिल्किस बानोचं नाव लिहून पाहू. मनीषच्या जागी ज्याच्यासोबत घडलं त्या मजहरचं नाव लिहू. कट्टर मुस्लीम संघटनेऐवजी कट्टर हिंदू संघटना, इज्तेमाऐवजी धर्मसंसद आणि सफाई आंदोलनात हिंदू ऐवजी टार्गेट मुस्लीम लिहू.. काय घडलं? या बदलानंतर आपण आधी दिलेल्या उत्तरात काही बदल घडतोय?
एका समान परिस्थितीत दोन वेगवेगळय़ा धर्मजातसमूहांना आपण समाज म्हणून वेगळे निकष लावतो का? त्यातून वैयक्तिक स्वत:चं सामाजिक भान कमी तर होत नाहीये का?

किती सहजपणे बिल्किसचा गुन्हेगार उजळ माथ्यानं भाजपच्या आमदार, खासदाराबरोबर सार्वजनिक पाणीवाटपाच्या शासकीय कार्यक्रमात दिसतो. कोर्टात अजून याचिका सुरू असताना तो इतका उघड कशाचा बळावर फिरतोय? त्याच्या उघड वावराविषयी आपलं सामाजिक नैतिक बळ किती तकलादू आहे याची जाण बोचत नाही?

लवजिहादसारख्या चुकीच्या संकल्पना/शब्दांचं नॉर्मलायजेशन करून पुन्हा दोन माणसांना निखळपणे मैत्री करण्यासाठीदेखील कुणाची तरी परवानगी घ्यावी लागेल इतकी अराजकता कधी आली?

एकूण लोकसंख्येच्या १४ टक्के मुस्लीम पण धर्माधिष्ठित इस्लामी राष्ट्र करू असं कुणी म्हटलं तर यच्चयावत सर्वाचे कान टवकारणार नाहीत का? अशा वेळी चटकन हेडलाइन, ब्रेकिंग बातम्या होतील. त्याआधी देशविघातक हालचाली म्हणत पोलीस कारवाई होईल. त्याहीआधी तसं म्हणणाऱ्यांच्या घराला आग लागलेली असेल. मात्र पदोपदी जहाल रीतीनं सभा, मोर्चे, माध्यमांतून आव्हानात्मक पद्धतीनं सतत हिंदूराष्ट्राची भाषा बोलली जाते तेव्हा ते खपवून घेणारे तुम्ही-आम्ही कोण आहोत? आपण काय पाठीशी घालतोय अन् आपल्या पाठीत सुरा खुपसला जाणार नाही याची काय शाश्वती? अशा घटनांत कारवाई तर फार दूरची गोष्ट होते मग.

न्यायव्यवस्था आंधळी असते पण समाजही तितकाच आंधळा-मुकाबहिरा झालाय अशी स्थिती आहे. पूर्वी शिवजयंती म्हटल्यावर मुस्लिमांमध्ये भयगंड पसरायचा. शिवाजी महाराज ‘हिंदू रयतेचा’ राजा या प्रतिमेनं मुस्लिमांना झाकोळून टाकलं. हळूहळू मुस्लीम अभ्यासकांनी हा मुद्दा खोडून काढला. आता मुस्लीम समाजात शिवजयंतीच्या कार्यक्रमांची भीती लोप पावली पण अलीकडे हनुमान जयंती, रामनवमीच्या कार्यक्रमांनी पुन्हा तीच बीजपेरणी सुरू केलीय. उत्तर भारतात प्रचलित असणाऱ्या शोभायात्रा गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातही सुरू झाल्या. उत्तर भारतात या शोभायात्रांना रीतसर मार्गानं न जाता गल्लीबोळातल्या मशिदींचीच वाट धरावी वाटते. अनुचित प्रकार टाळण्यासाठी मशिदी कापडाने झाकून ठेवाव्या लागतात. अलीकडे तेच पेव महाराष्ट्रातही आलंय. विश्वास आणि सौहार्दालाच काळिमा फासणाऱ्या या घटना आपण सर्रास चालवून घेतोय.

जगभरातले अल्पसंख्याक समूह बहुसंख्याकांमध्ये वावरताना आपला धर्म संकटात येईल, आपल्यावर अतिक्रमण होईल, आपली संस्कृती नष्ट होईल या भीतीखाली जगत असतो. मात्र भारतात हाच प्रकार बहसंख्य हिंदू मध्ये जाणवत राहतो. कारण आपल्या देशातला बहुसंख्य समाज ‘मेजॉरिटी विथ मायनॉरिटी कॉम्प्लेक्स’मध्ये अडकलेला आहे. त्यातूनच मग ‘हिंदू खतरे में है’ किंवा मुस्लीम मर्दाना पुरुषाची भीती आणि मग त्याचा खातमा करण्याच्या भाषेचं सामान्यीकरण होतं. पण अल्पसंख्याक सर्वसामान्य मुस्लिमाला मात्र साधं ‘अरे भई, क्या देखरे’ असं म्हणण्याचा अवकाशही सहज सापडत नाही. अशा वेळी जॉर्ज ऑर्वेलच्या ‘ऑल अॅनिमल्स आर इक्वल, बट सम अॅनिमल्स आर मोअर इक्वल दॅन अदर्स’ या म्हणण्याचा प्रत्यय येतो. कुठला नियम कुणाला लावायाचा याचा धरबंद तरी कुणाला आहे सध्या?

असो, रमजानचा महिना सुरू आहे. मुस्लीम इलाक्यात इफ्तारसाठी मोठमोठी पँडल्स लागलीत. खाद्यपदार्थाची रेलचेल आहे. कुणा ओळखीच्या मुस्लीम मित्र-मैत्रिणीच्या घरची ईद आणि शिरकुर्मा तुमची वाट पाहत असेल. असे मित्रमैत्रीण आहेत का? नसलंच कुणी ओळखीचं तरी इफ्तारीला त्या पँडल्समध्ये मांडलेला भेजा, खिमा, कबाब, शोरमा, हलीम टेस्ट केलाय कधी? निगुतीनं रांधलेलं असतं. चवीला अफलातून असतं पण मोहल्ल्याविषयीचं भय ओलांडून धीर एकवटून गेलात तिथं? जाऊन बघा एकदा..

रमजानच्या निमित्तानं बिल्किस, मजहर, लवजिहाद, लिंचिंग, जेनोसाइड या प्रश्नांची झळदेखील तिथंच कुठं तरी माहीत होईल. डबल का मिठ्ठाबरोबर एखादे चाचाचाची त्यांचं एखादं कथनही परोसतील. एखादी बोच एखाद्याच्या पोटाच्या वाटे हृदयापर्यंत पोचलीच तर पोचू द्या की!
दोस्तलोगा, रमजान मुबारका!