रवींद्र महाजन

वैश्विक प्रश्नांची उकल करताना एकीकडे आपल्याला आपल्या तत्त्वज्ञानाचा आधार घ्यावा लागेल व दुसरीकडे आधुनिक ज्ञानाच्या सर्व शाखा सुयोग्यपणे आत्मसात करून घेऊन त्यांचा मानवहितासाठी उपयोग करावा लागेल..

Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
environment issue in election manifestos environmental issues in lok sabha election 2024
या रणधुमाळीत पर्यावरणाबद्दल प्रश्न विचारा..

एक नेहमी समोर येणारा प्रश्न म्हणजे एकात्म मानवदर्शन हे भारतापुरतेच आहे की ते जगभर लागू पडू शकते. संचार व दूरसंचार क्रांतीमुळे जग जवळ येत आहे. भारतातील घटनांचा सावकाश का होईना पण जगभर परिणाम होऊ शकतो. तेव्हा या दृष्टीने एकात्म मानवदर्शनाच्या जागतिक संदर्भाबद्दलही विचार व्हावयास हवा.

जगभर उपयोगी

एकात्म मानवदर्शन हे पूर्णपणे नवे तत्त्वज्ञान नाही. हा सनातन धर्माचा युगानुकूल आविष्कार आहे. सनातन धर्म हा भारतापुरताच मर्यादित नसून मानवजातीसाठी आहे व त्या दृष्टीने एकात्म मानवदर्शन हे जगभर उपयोगी आहे. जागतिकीकरणाने व विकास प्रक्रियेने निर्माण झालेल्या प्रश्नांचे स्वरूपही जगभर काहीसे सारखेच आहे. तेव्हा त्यावरील उपायांतही सगळीकडे साम्य असू शकते.

जगाची गरज व भारताकडून अपेक्षा

दत्तोपंत ठेंगडींनी ‘तिसरा पर्याय’ या पुस्तकात पाश्चिमात्य देश १७८९च्या फ्रेंच क्रांतीची स्वातंत्र्य, समता व बंधुत्व ही उद्दिष्टे गाठण्यात अपयशी ठरल्याचे अधोरेखित केले आहे. त्या संदर्भात डॉ. आंबेडकरांना धर्मज्ञ म्हणून त्यांचे उद्धरण दिले आहे. डॉ. आंबेडकर म्हणतात, ‘विधायक दृष्टीने माझे सामाजिक तत्त्वज्ञान तीन शब्दांत सामावले आहे : स्वातंत्र्य, समता व बंधुत्व. पण कोणी असे समजू नये की मी माझे तत्त्वज्ञान फ्रेंच क्रांतीच्या उद्दिष्टावरून घेतले आहे, मुळीच नाही. माझ्या तत्त्वज्ञानाची मुळे ही राज्यशास्त्रात नसून धर्मात आहेत. ती मी माझे आदर्श भगवान बुद्ध यांच्या शिकवणीतून घेतली आहेत. बुद्धाच्या तत्त्वज्ञानात स्वातंत्र्य व समता आहेत, पण अमर्याद स्वातंत्र्य समतेचा घात करते व टोकाच्या समतेत स्वातंत्र्याला जागा उरत नाही. म्हणून बंधुत्वाला सर्वोच्च स्थान दिले पाहिजे. कारण त्यातून स्वातंत्र्य व समता नाकारले न जाता त्यांना संरक्षण मिळते. बंधुत्व हे मानवतेच्या भावंडभावाचे दुसरे नाव आणि तो म्हणजेच धर्म. हा भावंडभावच स्वातंत्र्य व समता यांचे संरक्षण करू शकतो.’

हा भावंडभाव एकात्म मानवदर्शनाचा गाभा असलेल्या एकात्मभावाची अभिव्यक्ती आहे. आधुनिक पश्चिम अध्यात्म नाकारून इहवादातच गुंतून पडल्याने ती भावंडभावाला व नंतर समतेलाही पारखी झाल्यासारखी दिसते. या पार्श्वभूमीवर पश्चिमेतील विचारकांच्या भारताकडून अपेक्षा आहेत. विख्यात इतिहासकार अर्नोल्ड टॉयन्बीने म्हटले आहे, ‘पण हे आधीच स्पष्ट होत चालले आहे की हे पर्व जर मानवजातीच्या आत्मघातात संपवायचे नसेल तर पश्चिमी आरंभ असलेल्या या पर्वाचा शेवट मात्र भारतीयच असला पाहिजे. मानवी इतिहासातील या आत्यंतिक धोक्याच्या क्षणी केवळ भारतीय मार्ग हाच मानवजातीच्या मुक्तीचा एकमेव मार्ग आहे.’

भारताचे वैश्विक ध्येयव्रत

सर्वेऽपि सुखिन: सन्तु, सर्वे सन्तु निरामया:।

सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चिद् दु:खमाप्नुयात।। (सगळे सुखी होऊन निरोगी आयुष्य जगू देत. सगळय़ांचे कल्याण होवो व कोणाच्याही वाटय़ाला दु:ख येऊ नये) व वसुधैव कुटुम्बकम्। – जग हे कुटुंबच, हा आपला दृष्टिकोन आहे. ‘कृण्वन्तो विश्वमार्यम्’ (सर्व माणसांची उन्नती) हे आपले जागतिक ध्येय आहे. आर्य म्हणजे कोण याचे स्पष्टीकरणही वसिष्ठस्मृतीत दिले आहे. ‘कर्तव्यमाचरन् कामकर्तव्यमनाचरन्। तिष्ठति प्रकृताचारे य: स आर्य इति स्मृत:।।’ (वासनांच्या अधीन न होता व शास्त्राने अयोग्य म्हटलेली कर्मे न करता, प्रकृतीच्या व शास्त्रांच्या नियमांप्रमाणे योग्य कर्तव्ये करणाऱ्या माणसास ‘आर्य’ म्हणतात.) या चिरंतन जीवनदृष्टीच्या युगसंगत उपयोजनातून केवळ आपल्या समाजाचेच कल्याण नव्हे तर वैश्विक कल्याण साधण्याचे ध्येयव्रत हिंदू समाजासमोर आहे.

विकसनशील राष्ट्रवाद

मानवी विकासाचा क्रम राष्ट्राच्या टप्प्यावर थांबत नाही. तिथेच थांबणारा राष्ट्रवाद असहिष्णू आणि आक्रमक होतो. हिंदू विचार मात्र ‘राष्ट्र’ म्हणजे विकासाच्या मानवी प्रक्रियेत अपरिहार्य असलेली एक पायरी मानतो. राष्ट्रवादाची मुळे इतक्या खोलवर रुजलेली आहेत आणि ती इतकी पुरातन आहेत की, ती नष्ट करणे सर्वथा असंभव आहे. आंतरराष्ट्रीय कम्युनिझमचा पुरस्कार करण्यासाठी रशियाने राष्ट्रवादाचा त्याग केला होता, परंतु अनुभवांती त्यांच्या असे लक्षात आले की, राष्ट्रभावना नष्ट केली तर त्याचबरोबर देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रेरणाही नष्ट होते. त्यामुळे राष्ट्रवाद नष्ट करता येणार नाही, इतकेच नव्हे तर तो नष्ट करून चालणारही नाही. मग राष्ट्रीय आकांक्षा व जागतिक कल्याण यांचा मेळ कसा घालायचा?

जर मानवी एकात्मतेच्या सत्याचा संस्कार होत गेला तर ‘मी’चा विकास मानवतेचे कल्याण साधण्याच्या दिशेने होत राहील व राष्ट्रीय आकांक्षा व जागतिक कल्याण यांचा मेळही साधता येईल.

आपली विश्वराज्याची कल्पना

ठेंगडी यांनी म्हटले आहे की, मानवी समाज-रचनेचा क्रम पाहता व्यक्ती, कुटुंब यातून पुढे राष्ट्रीय शासन व मग एकात्म मानवदर्शनाच्या आधारावर विश्वराज्याची (वल्र्ड स्टेट) निर्मिती होऊ शकेल. विश्वशांती आणि विश्वकल्याणाच्या मार्गाकडे संकेत करताना श्रीगुरुजींनी समजावून सांगितले आहे की, राष्ट्रांचा विनाश न करता त्यांना आपापल्या श्रेष्ठ वैशिष्टय़ांनी युक्त अशा जीवनाचा विकास करू द्यावा. या विकासात सर्व राष्ट्रांनी परस्परांचे सहकारी व्हावे आणि ऐहिक जीवनाच्या प्राथमिक आवश्यकता पूर्ण करण्याकरिता सर्व राष्ट्रांनी परस्परांच्या भरणपोषणाकरिता सहायक व्हावे. एकात्म मानवदर्शनाच्या आधारावर अस्तित्वात येणाऱ्या विश्वराज्यात एकच नव्हे तर अनेक केंद्रे असतील. एकसाचीपणा लादला जाणार नाही. सर्व घटक राष्ट्रे स्वायत्त राहून परस्पर समन्वयाने आपला विकास साधतील. एकात्म भाव असल्याने ते सर्वाना पोषक व सर्वहिताचीच धोरणे व कार्यक्रम अवलंबतील.

भारताने काय करावे

दीनदयाळजी म्हणतात की जगातील प्रगतीचा अभ्यास करून आम्हीही जगास काही दिशा दाखवू शकू की नाही? आम्ही विश्वावर बोजा होऊन न राहता विश्वाच्या समस्या सोडविण्यात साहाय्य करणे आवश्यक आहे. आमच्या संस्कृतीत व परंपरेत जगाला देण्याजोगे काय आहे याचा विचार झाला पाहिजे. कोणताही भेदभाव मनात न आणता संपूर्ण मानवतेला सुखशांतीचे वरदान देण्याचा प्रयत्न करावा, यासाठीच भारतवर्ष जीवित आहे. हे अमृतमय ज्ञान व त्याच्या वितरणाचे जीवनकार्य (मिशन) भारताच्या वाटय़ाला भगवती प्रकृतीने घातले आहे. जगाने आपल्या म्हणण्याचा विचार करावा असे वाटत असेल तर त्यासाठी आपल्याला काही गोष्टी योजून कराव्या लागतील : राष्ट्रीय इच्छाशक्तीचे उत्थान, शक्तिसंपन्नता, राष्ट्रीय स्तरावर क्षमता सिद्ध करणे.

राष्ट्रीय इच्छाशक्तीचे उत्थान

जगाच्या कल्याणासाठी चाललेल्या प्रयत्नांत आपला वाटा उचलणे शक्य व्हावे, यासाठी सर्वप्रथम आवश्यक गोष्ट कोणती असेल तर ती ही की, आपल्या समाजाच्या विस्कळीत घटकांचे आध्यात्मिक व भौतिक अशा दोन्ही स्तरांवर एकात्म भावाच्या जागरणातून अभेद्य, सुसंघटित जीवन उभे करणे. यातून होणारे राष्ट्रीय इच्छाशक्तीचे उत्थान हे केवळ राष्ट्रीय पुनर्निर्माणाचे कार्य सिद्ध करण्यासाठीच नव्हे तर राष्ट्राच्या वैश्विक कार्याच्या सफलतेसाठीही आवश्यक आहे.

शक्तिसंपन्नता आवश्यक

जगात राष्ट्राराष्ट्रांच्या व्यवहारांत असा अनुभव येतो की, भौतिकदृष्टय़ा जे बलिष्ठ असतील, समृद्ध असतील आणि इतरांना आधार देण्याची क्षमता ज्यांच्या ठायी असेल, त्यांचे अनुकरण इतर लोक करू लागतात. दुर्बलांचा विचार चांगला असूनही तो लक्षातही घेतला जात नाही. म्हणून आपण साऱ्या जगासमोर आत्मविश्वासयुक्त, सामथ्र्यसंपन्न आणि विजिगीषू राष्ट्र म्हणून उभे ठाकले पाहिजे.

राष्ट्रीय स्तरावर क्षमता सिद्ध करणे

भारतीय चिंतनात समाजाचे प्रश्न सोडविण्याची युगानुकूल क्षमता आहे व ती आपल्या पूर्वजांनी अनेक रचना करून सिद्ध केली आहे उदा. मानसिक तणावांचा निरास करण्याची क्षमता, भौतिक वैभव पण पर्यावरणाचे संतुलन टिकवून, स्वावलंबी ग्रामव्यवस्था, सुख, शांतीदायक आश्वासक कुटुंबव्यवस्था इ. अशी व्यवहारक्षमता आपणास सध्याच्या काळात व आजच्या प्रश्नांच्या संदर्भात पुन्हा सिद्ध करावी लागेल. त्यातूनच आपले राष्ट्रीय परमवैभव सर्वागाने उभे राहील व जगामध्ये आपल्याला सुयोग्य स्थान प्राप्त होईल. असे आपले समर्थ व वैभवशाली राष्ट्रच जगाला कल्याणकारी मार्गावर घेऊन जाऊ शकेल.

वैश्विक प्रश्नांची उकल करताना एकीकडे आपल्याला आपल्या तत्त्वज्ञानाचा आधार घ्यावा लागेल व दुसरीकडे आधुनिक ज्ञानाच्या सर्व शाखा सुयोग्यपणे आत्मसात करून घेऊन त्यांचा मानवहितासाठी उपयोग करावा लागेल. अध्यात्म व विज्ञान यांच्या संतुलित चिंतनाच्या प्रकाशात मानवांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याला हे सर्व करत अग्रेसर व्हावे लागेल. आपल्या देशात आपण एकात्म मानवदर्शनाची सार्थता सिद्ध केली तर जगही त्यामागे धावेल. यासाठी दुसरा मार्ग नाही.

नान्य पंथ: विद्यते!