अमृत बंग

स्वत:चा आवाज नाही, पुरेसे पर्याय उपलब्ध नाहीत, व्यक्तित्वाच्या परिपूर्तीची गरजच जवळच्यांनी ओळखलेली नाही आणि वेळ वाया घालवण्याची प्रलोभने तर अनेक! हा दोष एकेकटय़ा युवांचा नसून, ‘व्यक्तित्व कुपोषणा’च्या समस्येचे हे बळी आहेत..

Why MHADA will not build houses in high income group
म्हाडाकडून यापुढे उच्च उत्पन्न गटातील घरांची निर्मिती नाही?
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
arjun meghwal
साहित्य अकादमीच्या स्वायत्ततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह; केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीवर आक्षेप, सी. राधाकृष्णन यांचा सदस्यपदाचा राजीनामा
Criticism of Deputy Chief Minister Devendra Fadnavis regarding Mahavikas Aghadi in bhandara
“उद्धव ठाकरेंचा आम्ही खूप वर्षे अनुभव घेतला, आता काँग्रेसला त्यांच्यासोबत…” देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले…

भारतात १८ ते २९ वर्षे या वयोगटात २६ कोटी युवा आहेत. पण ते काय करत आहेत, त्यांचा रोजचा दिवस कसा जगत आहेत, हे युवा स्वयंविकासाच्या इष्टतम स्थितीत आहेत का? अत्यंत कळीचे असे हे प्रश्न समजून घेण्यासाठी प्रथम काही उदाहरणे बघू या.

श्रावणी चंद्रपूरची. स्वत:ची इच्छा नसतानादेखील आई-वडिलांचा आग्रह म्हणून तिने त्यांनी सांगितलेल्या विषयात पदवीचे शिक्षण घेतले. आता तिला फार पैसे मिळतील अशी नोकरी लगेच सापडत नाही, अशी स्थिती आहे. आई-वडील म्हणताहेत की तू पुण्याला जा आणि स्पर्धा परीक्षांचे क्लासेस लाव. तिची तीदेखील इच्छा नाही. कुठे शिकाऊ उमेदवारीचे काम करावे यासाठी ती वा पालक दोघेही तयार नाहीत. परिणामत: पदवी संपून दोन वर्षे झाली तरी श्रावणी घरीच बसून आहे. दिवस कसा जातो तर प्रामुख्याने मोबाइल, इन्स्टाग्राम व यूटय़ूबवर.

वैभव मुंबईच्या एका प्रतिष्ठित महाविद्यालयात एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षांला आहे. हॉस्टेलला मुलांमध्ये दारू व गांजा सर्रास चालतात. दुसऱ्या मजल्यावरच्या त्याच्या रूमकडे चालत जात असताना दोन्ही बाजूला अनेक बाटल्या पडलेल्या दिसतात. मेसमधले जेवण ना स्वास्थ्यपूर्ण ना चविष्ट. खूपदा बाहेरून स्विगी, झोमॅटोवरून पदार्थ ऑर्डर केले जातात. त्यांचे अर्धवट अन्न उरलेले अनेक डबे व पार्सल्स विविध खोल्यांच्या दरवाजांबाहेर पडलेले दिसतात. तिथे अनेक उंदीर फिरत असतात. पुरेसे ऊन व खेळती हवा नसल्याने अनेक कपडय़ांना फंगस लागले आहे. पण पोस्टिंगला जायचे असल्यास तोंडावर पाणी व अंगावर भरपूर स्प्रे मारून चटकन तयार व्हायची कला वैभव व त्याच्या मित्रांनी अवगत केली आहे. ‘हॉस्टेल लाइफ’ हे असे असणारच असे मानून यात काही गडबड आहे असेदेखील आता वैभवला वाटत नाही. रोजचे (प्रामुख्याने रात्रीचे) सुमारे चार ते पाच तास हे वैभव इन्स्टाग्राम रील्स स्क्रोल करण्यात, मिर्झापूर – मनी हाइस्टसारख्या वेब सीरिज बघण्यात, पब्जी वा इतर गेम्स खेळण्यात घालवतो. तो सहसा रात्री ३ वाजता झोपतो. पुस्तके वाचण्याची तशी वैभवला फारशी सवय नाहीच, पण आता मित्राच्या सांगण्यावरून त्याने अंकुर वारिकू यांचे ‘डू एपिक शिट’ हे पुस्तक चाळायला घेतले आहे. कुठलेच वर्तमानपत्र वाचत नसल्याने भारताच्या सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश हे धनंजय चंद्रचूड आहेत आणि नुकताच इतर न्यायाधीशांना कॉलेजियम पद्धतीने नियुक्ती द्यावी की नाही यावर सरकार आणि कोर्टाचा काही वाद झाला या (किंवा अशा) बाबतीत वैभव पूर्णपणे अनभिज्ञ आहे.

अक्षय बीड जिल्ह्यातल्या एका गावातील हुशार मुलगा. नवोदय विद्यालयात बारावीपर्यंत शिकून तो आता अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी औरंगाबादला आला आहे. कॉलेज तर म्हणायला सुरू आहे, पण लेक्चर्स व प्रॅक्टिकल्स क्वचितच होतात. आई-वडील वा घरच्या इतर कोणाशीही अक्षयला फारसे नीट बोलता येत नाही, स्वत:च्या भावना नीट व्यक्त करता येत नाहीत.‘जेवण झाले का, सर्व ठीक सुरू आहे ना’ याभोवतीच बोलणे थांबते. कॉलेजमध्ये दोन-तीन मित्र आहेत, पण त्यांच्याशीही संवाद उथळ आहे. आपली घुसमट होते आहे, सतत एकटेपणाची भावना आहे असे अक्षयला वारंवार वाटत असते.

  अभिनव नाशिकचा. त्याची एमबीबीसची पदवी पूर्ण होऊन आता तीन वर्षे झाली आहेत. पुढे पीजी करायला हवे, तेदेखील रेडिओलॉजी, ओर्थोपेडिक्स वा स्किन याच विषयात असे त्याला वाटते, कारण ‘त्या ब्रांचेसना प्रतिष्ठा आहे’, ‘त्यात बक्कळ पैसा आहे’ असे त्याला सीनियर्सनी सांगितले आहे. दुर्दैवाने यात किंवा इतर कशातही प्रवेश मिळेल एवढे गुण अभिनवला नीट-पीजीच्या परीक्षेत मिळत नाहीत. तीन वर्षे झाली तरी तो अद्याप परीक्षाच देत आहे. तोच तोच अभ्यास करून अभिनव कंटाळला आहे. बऱ्याचदा त्याला फ्रस्ट्रेटेड वाटतं. कॉलेजमध्ये फिरताना लाज वाटते. खोली – लायब्ररी – मेस एवढेच चक्र दिवसभर चालू आहे. २७ वर्षे वय झालं तरी अजूनही त्याचा गुजारा आई-वडील पाठवत असलेल्या पैशांवरच होतो आहे.

जळगावची प्रणाली आता गेली चार वर्षे पुण्याला एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करते आहे. तिला भरपूर पॅकेज आहे याचा तिला झालेला आनंद आता ओसरला आहे; पण त्याबाबत तिच्या आई-वडिलांना असलेला अभिमान मात्र अजून कायम आहे. त्याहून किमान दीडपट अधिक कमावणारा मुलगाच प्रणालीकरिता बघायचा असे त्यांनी ठरवले आहे. इकडे प्रणालीला मात्र तिच्या कामात आता कुठलाही उत्साह राहिलेला नाही. रोज ५ कधी वाजतील याची ती वाट बघत असते. ऑफिसमधील सहकारीदेखील वीकेन्डचा प्लॅन काय करायचा याचीच चर्चा करत असतात. दारू पिणे प्रणालीला स्वत:ला फारसे पटत नाही, पण सोबतचे मित्र-मैत्रिणी मनसोक्त पितात आणि आपण एकटे पडायला नको म्हणून ती त्यांच्यासोबत पब्सना जात असते. पुण्यातले बहुतांश हॉटेल्स त्यांनी पालथे घालून झाले आहेत. ‘पुण्यात फ्लॅट बुक कर’ असा पालकांचा तगादा सुरू असतो तो तिने कसाबसा आतापर्यंत थोपवून धरला आहे. आपण काही सामाजिक योगदान द्यावे असेही प्रणालीला अध्येमध्ये वाटते, पण नेमके काय करावे हे काही सुचत नाही.

प्रतीक नांदेडचा. विद्यापीठात एमएच्या पहिल्या वर्षांला त्याने नाव नोंदवले होते, पण मग मध्येच ते सोडले. त्याचा दिवसाचा मुख्य कार्यक्रम म्हणजे इतर दोन मित्रांना घेऊन रोज ५०-१०० रुपयांचे पेट्रोल भरून त्याच्या यामाहा बाइकवर ट्रिपलसीट फिरणे. त्याला टापटीप कपडे घालायला आवडते. फोटोग्राफरला २०० रुपये देऊन रोज मस्त फोटो काढून घेणे आणि त्याची इन्स्टाग्राम स्टोरी करणे हा त्याचा आवडता छंद. कोणाचे फॉलोअर्स किती व ते कसे वाढवायचे हा तीन मित्रांच्या गहन चर्चेचा नेहमीचा विषय. काम व कमाई यापेक्षा दारू, खर्रा व कॅरम हे जवळचे मुद्दे. आपल्यासारख्या युवांना ‘नीट’ (NEET –  Not in Education, Employment or Training) म्हणून संबोधले जाते हे त्यांच्या गावीही नाही.

आणि सरतेशेवटी, आपल्या सगळय़ांच्या परिचयाचा, संदीप. वाशिम जिल्ह्यातल्या रिसोडचा. कृषीमध्ये बीएस्सीची पदवी घेऊन आता चार वर्षे पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे. यूपीएससी नाही तर किमान एमपीएससी तरी होऊ या इच्छेवर तगणाऱ्या लक्षावधी तरुणांपैकी तोदेखील एक आहे.

वरील सातही उदाहरणे (नावे बदलली आहेत) हे अपवाद नाहीत; तर सध्याच्या युवांच्या सार्वत्रिक स्थितीचे प्रातिनिधिक निदर्शक आहेत. निर्माण उपक्रमाद्वारे गेल्या दीड दशकात प्रथम महाराष्ट्रातील आणि नंतर भारताच्या २१ राज्यांतील हजारो तरुण-तरुणींना भेटण्याची, संवाद साधण्याची, त्यांचे जीवन जवळून पाहण्याची संधी मला आणि निर्माण टीममधील माझ्या सहकाऱ्यांना लाभली. त्या दरम्यान हे सात जण विविध रूपांत, तपशिलाच्या काही बदलासह आम्हाला वारंवार भेटले आहेत. मनापासून वाईट वाटावे अशी ही परिस्थिती आहे. 

लहान मुलांच्या शारीरिक कुपोषणाबाबत बऱ्याचदा चर्चा होते, बातम्या होतात, ते योग्यच आहे. पण आपल्या युवांच्या व्यक्तित्व कुपोषणाची काय परिस्थिती आहे याची भनकदेखील कोणाला नाही. ‘नॅशनल फॅमिली हेल्थ सव्‍‌र्हे- ५’च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील पाच वर्षांखालील बालकांमध्ये कुपोषणाचे (स्टंटिंग) प्रमाण हे ३५ टक्के आहे. मात्र ‘निर्माण’द्वारे आम्ही केलेल्या युवांच्या अभ्यासात युवांमधील व्यक्तित्व कुपोषणाचे (लँग्विशिंग) प्रमाण हे ४३ टक्के आढळून आले. भारतासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, हे लक्षात घेऊन ही परिस्थिती बदलण्यासाठी काय करता येईल याची चर्चा आपण पुढील लेखात करू या.