scorecardresearch

Premium

चतु:सूत्र : युवा प्रश्नोपनिषद..

युवांद्वारे वारंवार विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांविषयी मुक्तचिंतन

youth student question
चतु:सूत्र : युवा प्रश्नोपनिषद..

अमृत बंग

मी १८ ते २५ या वयात कोणत्या गोष्टी करण्यास प्राधान्य दिले पाहिजे ज्यामुळे मला पुढील भविष्यात त्याचा फायदा होईल? तुमच्या जीवनात एकदाच येणारा ‘इमर्जिग अ‍ॅडल्टहूड’चा हा टप्पा एक विलक्षण आणि अद्वितीय संधी आहे. फारशा इतर जबाबदाऱ्या नसल्याने मिळणारी मोकळीक आणि स्वत:साठी इतका वेळ परत कधी सहजासहजी उपलब्ध होत नाही. म्हणून मेंदूचा, क्षमतांचा आणि व्यक्तित्वाचा विकास हे प्रमुख उद्दिष्ट असावे. त्या दृष्टीने करता येण्यासारख्या काही बाबी :

upsc UPSC Preparation Examining
यूपीएससीची तयारी: नैतिक विचारसरणींची परीक्षेच्या दृष्टीने प्रस्तुतता
Vijay Wadettiwar criticizes Nitesh Rane
वडेट्टीवार स्पष्टच म्हणाले, “भागवत आणि मोदींवर टीका करणाऱ्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये…”
caste the origin of ous discontents
जात का जात नाही?
Chanakya Niti
Chanakya Niti : विद्यार्थ्यांनी ‘या’ गोष्टींचे पालन केल्यास ते जीवनात कधीही होणार नाहीत अयशस्वी; वाचा, काय सांगतात चाणक्य….
  • मानसिक परिश्रम करण्याची सवय वाढवा – अभ्यास व ज्ञानार्जन हे कॉलेजपुरते मर्यादित न ठेवता भरपूर मेहनत करावी. कठीण विषय समजून घ्यावेत, कुठले का असेना. कॉम्प्लेक्स विचार समजता व करता आला पाहिजे.
  • काही तरी नेमके कौशल्य (वर्क स्किल्स आणि सॉफ्ट स्किल्स) अंगी बाणवावे.
  • निव्वळ कॉलेज टू कॉलेज, एक डिग्री ते दुसरी डिग्री वा एक परीक्षा ते दुसरी परीक्षा अशा उडय़ा मारू नयेत. जीवनात प्रत्यक्ष काम करून बघावे. त्याद्वारे शिकलेल्या गोष्टींचा उपयोग कळेल, नवीन अनुभव मिळतील व विकास होईल, स्वत:चा ‘पर्पज’ काय आणि त्यासाठी पुढे नेमक्या कुठल्या क्षमता वाढवायच्या याबद्दल स्पष्टता येईल.
  • माझी मूल्ये काय, माझे जीवनाबाबतचे स्वप्न काय, माझ्या नेमक्या आर्थिक गरजा काय व किती, माझ्या जोडीदाराबाबत काय कल्पना आहेत इ. मुद्दय़ांबाबत विचार करावा आणि शक्य ती स्पष्टता आणावी.
  • विविध प्रकारचे भरपूर अवांतर वाचन करावे. ‘निर्माण’च्या वेबसाइटवर २०० सुंदर पुस्तकांची यादी आहे, त्यातील किमान ३० तरी वाचावीत. कॉलेज वा नोकरीसह कुठल्या तरी सामाजिक विषयाबाबत प्रत्यक्ष कृतीत सहभागी व्हावे. 
  • समाजातील वंचित घटकांशी, त्यांच्या प्रश्नांशी प्रत्यक्ष फेस टू फेस यावे ज्याद्वारे स्वत:च्या सामाजिक जाणिवेच्या कक्षा रुंदावतील.
  • स्पर्धा परीक्षांचा अभ्यास म्हणून नाही, पण एखादे चांगले वर्तमानपत्र, मासिक, जर्नल (उदा. ‘द इकॉनॉमिस्ट’, ‘डाऊन टू अर्थ’, ‘सायंटिफिक अमेरिकन’ इ.) नियमितपणे वाचणे सुरू करावे. राजकीय, आर्थिक, पर्यावरणीय, वैज्ञानिक क्षेत्रांत नेमके काय घडत आहे याविषयी अनभिज्ञ न राहता आपली समज हळूहळू वाढवावी.  
  • आई-वडील, कॉलेजचे मित्र/ सीनियर्स यांच्या पलीकडे जाऊन कोणी अनुभवी व्यक्ती ज्यांच्याशी आपली नाळ जुळेल असे (एक वा अधिक) मेंटर्स शोधून त्यांच्याशी नाते तयार करावे. जीवनाबाबतच्या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर, निर्णयांबाबत, संभ्रमाबाबत त्यांच्याशी वेळोवेळी स्वत:हून चर्चा करावी. ज्या लोकांना मी एक रोल मॉडेल म्हणून बघू शकतो अशा अनेक जणांविषयी वाचावे, त्यातील काही व्यक्ती जिवंत असल्यास शक्यतो त्यांना भेटावे, त्यांचे काम बघावे. माझे जीवनाचे स्वप्न आणि मी काय करू शकतो याबाबतचे निर्णय जर वर्गमित्रांच्या, एक-दोन वर्षे सीनियर असलेल्यांच्या बौद्धिक पातळी आणि ‘मॅच्युरिटी’ने प्रभावित होऊन घ्यायचे नसतील तर स्वत: जाणीवपूर्वक त्या कक्षा विस्तारण्याचा प्रयत्न करावा.  
  • ग्रॅज्युएशन संपताना आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी व्हावे, आई-वडिलांवर अवलंबून राहू नये. स्वत:चा खर्च स्वत: भागवण्याची व्यवस्था करावी. विनाकामाचा खर्च टाळून योग्य बचतीच्या व गुंतवणुकीच्या सवयींचा अवलंब सुरू करावा.
  • कॉलेजमधील विविध क्लब्स, स्पर्धा, इव्हेन्ट, खेळ, संगीत, इ.मध्ये जरूर भाग घ्यावा. छंद नक्की जोपासावेत.
  • कुठल्याही व्यसनांपासून दूर राहावे. पीअर प्रेशर म्हणूनदेखील आणि हौस/ थ्रिल म्हणूनदेखील व्यसन करू नये. शारीरिक आरोग्याची काळजी घ्यावी. नेटफ्लिक्स ‘बिंज वॉच’ करण्याच्या नादात झोपेचे वाटोळे करू नये.
  • रॅगिंग करू नये, सहनही करू नये.

नेहमीचे आयुष्य जगत असताना सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी एक तरुण म्हणून मी काय योगदान देऊ शकतो? तुमच्याकडे उपलब्ध असलेले सर्वात महत्त्वाचे स्रोत म्हणजे तुमचा वेळ, पैसे आणि दैनंदिन जीवनातून प्रकट होणारी मूल्ये. या तिघांचा एकत्रित उपयोग केल्यास बरेच काही साध्य करता येणे शक्य आहे. काही गोष्टींपासून सुरुवात केल्यास पुढचा मार्ग सापडेलच!

त्या अशा :

  • शक्य असेल तर, स्वत:ला ज्या विषयात बदल घडवण्याची प्रेरणा आहे त्या प्रश्नावर काम करणाऱ्या एखाद्या उत्तम सामाजिक संस्थेला तुम्ही जॉइन होऊ शकता किंवा स्वत:चा उपक्रम सुरू करू शकता. ते शक्य नसल्यास नोकरी सांभाळून तुम्ही आठवडय़ात/ महिन्यात/ वर्षांत किती दिवस वा तास सामाजिक योगदानासाठी काढू शकता याचा अंदाज घ्या. विविध संस्थांना ५’४ल्ल३ी१२ ची गरज असते. तुम्ही तिथे मदत करू शकता. जागरूक नागरिक म्हणून माहितीच्या अधिकाराचा वापर करून सार्वजनिक व्यवस्था जबाबदार व पारदर्शक व्हाव्यात यासाठी हातभार लावू शकता.
  • तुमच्या मासिक वा वार्षिक उत्पन्नातील किमान काही रक्कम (तुमच्या आर्थिक सोईनुसार १ ते १० टक्क्यांपर्यंत) सामाजिक कार्यास देण्याचा निर्धार करा. तुम्हाला ज्या सामाजिक संस्था/ उपक्रम हे उत्कृष्ट वाटतात (हे शोधण्यासाठी थोडा अभ्यास व प्रयत्न करावा लागेल!) त्यांना मदत करा.
  • दैनंदिन जीवनात विविध बाबतीत तुम्ही काय निर्णय घेता यातून तुमची मूल्ये प्रकट होतात. इथेही सामाजिक योगदानाची आणि मूल्याधारित व्यक्त होण्याची संधी आहे. दारू/ तंबाखूचे सेवन न करणे, पर्यावरणीयदृष्टय़ा कमी हानीकारक असे जगणे व संवर्धनासाठीच्या कृती करणे, उगाचच जास्त सीसीची बाइक न विकत घेणे, स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल अशी खरेदी, रस्त्यावरील भाजीविक्रेते व इतर तुलनेने गरीब अशांशी घासाघीस न करणे, शक्य असल्यास मांसाहार न करणे (त्याचा पर्यावरणावर प्रचंड परिणाम होतो), इ. अनेक मार्गानी आपल्याला विचार व कृती करता येईल. ‘व्हॅल्यूज इन्फ्लुएंसर’ बनता येईल!

जोडीदाराबद्दल निर्णय घेताना, कोणत्या मुद्दय़ांवर विचार करणे आवश्यक आहे?

शक्यतो क्रमानुसार या गोष्टींचा विचार करावा:

  • मूल्यांमधील एकरूपता/ काँग्रुअन्स
  • जीवन-ध्येयांची सुसंगतता/ कम्पॅटेबिलिटी
  • पूरक व्यक्तिमत्त्वे/ काँप्लिमेंटेरिटी
  • त्या व्यक्तीमधील कोणत्या गोष्टींचे, वैशिष्टय़ांचे मला खरोखर कौतुक आहे? मला त्या व्यक्तीच्या वाढीस हातभार लावावासा वाटतो का? या नात्यामध्ये मी काय ‘देऊ’ शकतो? आमचा सहवास परस्परांना समृद्ध करणारा आहे का?
  • भावनिक जवळीक
  • शारीरिक आकर्षण

‘चांगल्या जोडीदाराचा’ शोध घेताना ध्यानात ठेवायची एक महत्त्वाची बाब म्हणजे तो/तीदेखील एक ‘चांगला’ जोडीदार शोधत असणार. त्यामुळे मी स्वत: एक सुयोग्य, जबाबदार, काळजी घेणारा, ज्याचा सहवास हवाहवासा वाटेल, असा पोटेन्शियली चांगला जोडीदार कसा बनेन यावरदेखील लक्ष केंद्रित करावे. यावर काम करणे हे आपल्या हातात आहे. सामाजिक प्रश्न सोडविण्याच्या अनुषंगाने डोक्यात आलेल्या कल्पनेला कशा प्रकारे मूर्तरूप द्यावे?

स्वत:ला पुढील प्रश्न विचारावेत:

  • माझ्या कल्पनेद्वारे मी नेमका कुठला सामाजिक प्रश्न सोडवू इच्छितो?
  • तो प्रश्न हा ‘प्रश्न’ आहे हे मी कसे ठरवले? त्यासाठी माझ्याकडे काय पुरावा/ अनुभव आहे?
  • हा प्रश्न वा ही समस्या किती लोकांची आहे?
  • हे लोक कुठे पसरलेले आहेत?
  • आज त्यांना ही समस्या सोडवण्यासाठी काय उपाय उपलब्ध आहेत? ते त्या उपायांचा कसा वापर करतात? त्यात प्रमुख अडचणी काय?
  • आता माझी कल्पना नेमका कुठला अडथळा दूर करेल? माझे ‘इंटरव्हेन्शन पॅकेज’ काय असेल? त्यासाठी काय आधार आहे? ते मी लोकांपर्यंत कसे पोहोचवेन?
  • या कल्पनेच्या कार्यान्वयनाला किमान किती काळ लागेल आणि माझी किती काळ देण्याची तयारी आहे?  कामाचे वेळापत्रक काय?
  • या कामाला एकूण किती पैसे लागतील? ते कुठून उभे राहतील?
  • या कामाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने – ‘सक्सेस’ म्हणजे काय? काय झाले किंवा घडले तर कल्पना यशस्वी झाली असे मी म्हणेन?

सरतेशेवटी.. कर के देखो!

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chatuustra the youth a lot of hard work not limited to college should do study ysh

First published on: 27-09-2023 at 03:42 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×