‘सर्व टीकाकार तसेच माध्यमकर्मींनो, दुष्काळाच्या छायेत असलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी अहोरात्र झटत असताना तुम्ही माझी एक चित्रफीत फिरवून जो पोरकटपणा लावलाय त्याचा सर्वप्रथम तीव्र निषेध करतो. छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागात दुष्काळी गावांना भेटी देत असताना एके ठिकाणी फुलांच्या गालिचावरून चाललो. त्यामागची वेगळी कथा तुम्हाला ठाऊक नाही नतद्रष्टांनो! या गावच्या शिवारातील सर्व पिके करपली पण काही ठिकाणी फुलांची शेती शाबूत आहे असे मला कळले. मी लगेच सोबतच्या कार्यकर्त्यांना पाठवून सर्व फुले रोखीने विकत घेतली. त्यामुळे शेतकर्‍यांना पैसे मिळाले. त्यांचे चेहरे फुलासारखे टवटवीत झाले.

पैसे घ्या पण फुले तुमच्याजवळच ठेवा असे माझे सांगणे होते. मग त्या फुलांचे करायचे काय असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला व त्यांनी माझ्या स्वागतासाठी त्याचा गालिचा अंथरला. त्यावरून चालत मी ज्या घरात गेलो तिथे अनेक शेतकरी जमलेले. सरकारची मदत मिळेल तेव्हा मिळेल पण मी तुम्हाला माझ्या खिशातून मदत करायला तयार आहे असे आश्वासन देत फूलखरेदीचा प्रसंग सांगितला. त्यामुळे प्रेरित होऊन सर्वांनी फुलांची शेती करण्याचा निर्णय जाहीर केला.

पिकांपेक्षा फुलांच्या शेतीला पाणी कमी लागते असेही त्यांचे म्हणणे होते. जोवर या भागावर दुष्काळाची छाया आहे तोवर मी या भागात नियमितपणे येत राहीन. तुम्ही माझे स्वागत हारतुरे घालून करू नका. असाच गालिचा अंथरा व जेवढी फुले वापरली त्याचे पैसे माझ्याकडून घ्या असे वचन मी दिले. हे ऐकून त्यांच्या चेहर्‍यावर फुललेला आनंद मी कधीही विसरणार नाही. दुष्काळाच्या चिंतेत असलेल्या एका गावाला माझ्या या कृतीमुळे समाधान मिळत असेल तर हा क्षण मी सर्वोच्च समजतो.

आमचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ बांधावर फिरताहेत. त्यांचाच आदर्श घेत आम्ही सर्वजण गावागावात जाताहोत. बांधावरच्या चित्रफिती तयार करण्यापेक्षा स्वागतासाठी वापरलेल्या फुलांच्या माध्यमातून शेतकर्‍यांना थेट मदत ही कल्पना मला नावीन्यपूर्ण वाटली. त्यामुळे ही चित्रफीत मी प्रसारित होऊ दिली. मात्र टीकाकारांनी त्याचा वेगळाच अर्थ काढून माझ्यासारख्या कर्तव्यतत्पर मंत्र्यांची नाहक बदनामी चालवली आहे.

दुष्काळी दौरे करताना शेतकर्‍यांचे नुसते सांत्वन करण्यापेक्षा त्यांच्या हातात काही पडेल अशी कृती मी केली. संकटात असलेल्या लोकांना थेट मदत करणे ही आमच्या पक्षाची व शिंदे साहेबांची परंपरा आहे. आमच्या मराठवाड्याला दुष्काळ नवा नाही. त्यामुळे बांधावरून फिरणे नित्याचेच. त्यापेक्षा फुलांच्या नाजूकपणात समृद्धी दडली आहे असा संदेश गावोगाव पोहचवणे मला महत्त्वाचे वाटले. याला कुणी निझामशाहीची आठवण म्हणत असेल तर त्याच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. शेवटी एकच सांगतो. ‘परिस्थिती कशीही असो, फुलासारखे उमलत राहा. आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदात जगून पाहा.’