डॉ. गर्सन डी. कुन्हा यांच्या लेखातील दुसरा प्रक्षोभक मुद्दा होता, शिवाजी महाराजांच्या वंशाबद्दलचा अथवा कुळाबद्दलचा. शहाजी अभिमानाने म्हणत असे, ‘आम्ही तो रजपूत’; पण ज्या राजपूत घराण्याशी भोसले कुलोत्पन्न आपला संबंध जोडू पाहतात, ते कुलच मुळी भ्रष्ट आहे, असा बिनबुडाचा सिद्धांत काही विद्वानांनी – विशेषत: कर्नल टॉडसारख्या राजस्थानच्या इतिहासाबद्दलच्या तज्ज्ञ व्यक्तीने – सूचित केला होता आणि त्याचाच डॉ. कुन्हांनी पुनरुच्चार केला होता. त्याबद्दल त्यांना धारेवर धरताना राजवाड्यांनी लिहिले, ‘शिवाजीचा संबंध इराणातील सासेसियन राजाशी व कुस्तुतुनियातील बायझंटाईन पातशहाशी पोहोचवणारी माहिती डॉ. कुन्हा यांनी टॉडच्या राजस्थानच्या तवारिखेतील भागातून घेतली आहे आणि ती तशी घेताना अनेक चुका केल्या आहेत.
पितृवंशाकडून व मातृवंशाकडूनही शिवाजीचा संबंध मेवाडच्या राजकुलाशी जुडतो, असे कुन्हा म्हणतो, परंतु शिवाजीचा मातृवंश म्हणजे यादवकुल मेवाडच्या सूर्यवंशातील नसून केरवलीतील सोमवंशापैकी आहे. शिवाजीचा पूर्वज बालजी होता, असेही हा विद्वान म्हणतो. हे दोन महत्त्वाचे प्रमाद केल्यावर पुढे हे विद्वद्वर्य इराणी व कुस्तुंतुनी पातशाहाशी शिवाजीचा संबंध मेवाडच्या राजकुलाद्वारे नि:संशय जुडतो, असे ठाम विधान करतात. परंतु ज्याच्या जिवावर आपण हे ठाम विधान करतो, तो टॉड स्वत: यासंबंधाने संशयितवृत्ति आहे, हे या गृहस्थाला विसरणे सोईचे दिसले, असे म्हणावे लागते.’
यानंतर राजवाड्यांनी आपला मोर्चा वळवळा कर्नल टॉडकडे. ‘ॲनल्स ॲण्ड ॲण्टिक्विटीज ऑफ राजस्तान’ या द्विखंडात्मक ग्रंथामुळे राजस्थानी इतिहासाच्या क्षेत्रातील सर्वमान्य संकलक-संशोधक म्हणून बडी असामी ठरलेल्या जेम्स टॉडशी पंगा घेणे म्हणजे फार मोठे धाडसाचे काम होते, पण शिवरायांबद्दलच्या आदराने व अभिमानाने भारावून गेेेेलेल्या राजवाड्यांनी ते आव्हान स्वीकारले. टॉडच्या विवेचनातील अनेक त्रुटींवर मार्मिक टीका करीत त्यांनी लिहिले, ‘कर्नल टॉडने या दाव्याबद्दल वाटणारी अनिश्चितता व्यक्त केली आहे. शिवाय त्याने मेवाडच्या राजांची इराणी उत्पत्ती दाखवताना ज्याचा आधार घेतला आहे, त्या लक्ष्मीनारायणाने आपली तवारीख हिजरी १२०४ म्हणजे इसवी १७८९मध्ये लिहिली होती. त्या तवारीखचे नाव ‘विसत्-अल्-घनाईम’ म्हणजे ‘गनिमांचा नक्षा’ असे आहे. गनिमांचा नक्षा म्हणजे मराठ्यांची टुरटुर. या टुरटुरीत मराठ्यांचा मुख्य वीर पुरुष जो शिवाजी, त्याचा वृत्तांत देण्याचा बहाणा केला आहे आणि तसे करताना शिवाजीचे वंशज ज्या मेवाडच्या घराण्याशी आपला संबंध जोडू पाहात, त्या घराण्याची नालस्ती करण्याचा प्रयत्न केला आहे. ’
‘लक्ष्मी-नारायण हा औरंगाबादेतला कनोजी ब्राह्मण मराठ्यांना शत्रुसमान लेखी, ही गोेष्ट ध्यानात घेतली पाहिजे. मराठ्यांना व शिवाजीला तो गनीम म्हणतो. मेवाडच्या राजांची इराणी उत्पत्ती सिद्ध करण्याला लक्ष्मीनारायणाने सबळ पुरावा असा काहीच दिलेला नाही. ‘मआसर-अल्-उमरा’ म्हणजे ‘उमरावांची तवारीख’ या त्याच्यापूर्वी झालेल्या एका तवारिखेतील उतार्यावर लक्ष्मीनारायणाची सर्व मदार आहे. ‘मआसर-अल्-उमरा’त तो उतारा साक्षात आहे की नाही, हे टॉडने पाहिलेले नाही; इतकेच नव्हे, तर तो ग्रंथही टॉडच्या अवलोकनात आला नव्हता. ग्रंथाचा काल, त्याची विश्वसनीयता वगैरे कोणतीच बाब त्याने तपासली नव्हती. धुतल्या तांदळाप्रमाणे शुद्ध मेवाडचा सूर्यवंश डागाळलेला दाखवलेला पाहण्यात एक प्रकारची मौज वाटून टॉडने लक्ष्मीनारायणाच्या उतार्याचा समावेश आपल्या ग्रंथात केला आणि ऐतिहासिक प्रामाण्य-अप्रामाण्याबद्दलचे आपले अज्ञानच प्रकट केले. मुसलमानांना, पोर्तुगीजांना, इंग्रजांना व लक्ष्मीनारायणासारख्या देशाभिमानशून्य पोटभरू इसमांना अत्यंत द्वेष्य असा जो शिवाजी, त्याची नालस्ती करण्याच्या भरात मेवाडच्या शुद्ध, निष्कलंक सूर्यवंशीय राज्यघराण्याचीही नालस्ती करणे भाग पडले. ‘मआसर-अल्-उमरा’तील लक्ष्मीनारायणाने दिलेल्या उतार्याखेरीज मेवाडच्या घराण्याची इराणी उत्पत्ती दुसर्या कोणत्याहि इतिहासग्रंथात आजवर दिलेली प्रसिद्ध नसताना असल्या भिकार, अविश्वसनीय उतार्यावर विसंबण्याचे धार्ष्ट्य टॉडने कसे केले असेल, ते त्याचे त्यालाच ठाऊक!’ आणि डॉ. कुन्हांबद्दल वेगळे काय बोलायचे, ते पडले टॉडबरोबरच तोंडघशी…
– आनंद हर्डीकर
