‘एखाद्या व्यक्तीला जमीनदोस्त करावयाचा दुष्ट हेतु धूर्तांच्या मनात आला म्हणजे ते प्रथम त्याची साधेल तितकी नालस्ती करतात व चार लोकांत तो नालस्त ठरला म्हणजे मग ते त्याचा सर्वजण संमतीने नाश करतात. तात्पर्य, नालस्ती हे नाशाचे प्रथम रूप आहे… नालस्ती व नाश ही दोन अस्त्रे जिवंत व्यक्तीप्रमाणे समाजांवर व मयत ऊर्फ ऐतिहासिक व्यक्तींवरही सोडली जात असतात’, असा प्रारंभ करून राजवाड्यांनी ‘शिवाजीची साक्षरता’ या शीर्षकाचा लिहिलेला लेख अतिशय महत्त्वाचा आहे.
मुख्य म्हणजे या लेखामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरील एका निराधार आक्षेपाची किंवा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला विकृत भावनेतून चिकटवलेल्या एका त्रुटीची त्यांनी परखड चिकित्सा केली होती, तसे करताना खुद्द राजांनी ‘बहुत काय लिहिणे’ हे समाप्तीचे वाक्य स्वहस्ताने लिहिलेले एक पत्र उद्धृत केले होते आणि मराठ्यांचा इंग्लिश बखरकार ग्रांट डफ याला ‘धूर्त गप्पीदास’ असल्याचे मासलेवाईक प्रमाणपत्र बहाल केले होते.
‘शिवाजीसंबंधाने परदेशी लेखकांनी कित्येक गप्पा (अफवा) उठविलेल्या आहेत. शिवाजी व्यसनी होता, अशी गप्प उठविण्याची सोयच नव्हती; तेव्हा तो निरक्षर होता; हीच गप्प नमूद करून त्याच्या महतीला कमीपणा आणण्याचा प्रयत्न कित्येक धूर्तांनी केेलेला आहे. ज्याला ओ का ठो करता येईना त्या गांवढ्याच्या हातून उत्तम राज्यव्यवस्था कसची उभारली जाते, असा हेतु या असत्य प्रवादात गर्भित आहे. डफचे हे विधान एकंदर सर्व इंग्लिश लेखकांच्या मताचे उत्तम दर्शक आहे.
या विधानाला डफने कोणत्याहि बखरीचा विशिष्ट आधार दिलेला नाही व अवांतर आधार दिल्याचा जो आव आणला आहे, तो लेचापेचा आहे…‘शिवाजीला लिहितावाचता येत नव्हते’ हे पूर्ण निषेधात्मक निगमन (Deduction) ‘फार थोड्या मराठ्यांना लिहितावाचता येते’ या सिद्धांतापासून काढता येत नाही, हे एखादा नवशिक्या तर्कशास्त्रज्ञही सांगू शकेल. कारण डफचा आधारभूत सिद्धांत सार्वदेशिक नाही, एकदेशी आहे. शिवाय हा एकदेशी सिद्धांत डफच्या वेळेच्या मराठ्यांना लागू पडावा, असा डफचा खराखोटा अनुभव होता. तो त्याच्यापूर्वी दोनशे वर्षे होऊन गेलेल्या शिवकालीन मराठ्यांना लागू नाही, कारण शिवकालीन मराठ्यांच्या साक्षरतेचा किंवा निरक्षरतेचा डफला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष काहीएक अनुभव नव्हता.’
डफ मराठ्यांच्या भूतकालीन साक्षरतेबाबत किंवा निरक्षरतेबद्दल स्वानुभवांच्या आधारावर काहीही बोलू शकत नव्हता आणि तरीही त्याने शिवरायांना निरक्षर ठरवण्याचा घाट घातला, यामुळे रागावलेल्या राजवाड्यांनी पुढे त्याची ऐशीतैशी करीत लिहिले, ‘डफ स्वत: किती अशिक्षित होता, हे मात्र त्याच्या विचारसरणीवरून ताडता येते.
स्कॉटलंडमध्ये पाचचार इयत्ता शिकून, हिंदुस्थानात धूर्ततेच्या जोरावर नशीब काढण्याला आलेल्या व अर्धवट शिकलेल्या लेखकाच्या हातून असली गचाळ विधाने लिहिली जावीत, हे यथार्थच आहे!’ आणि पाठोपाठ त्यांनी डफचे म्हणणे ऐतिहासिक तथ्याशीही कसे पूर्णपणे विसंगत आहे, ते सोदाहरण स्पष्ट केले. त्यांनी म्हटले, ‘दोनशे वर्षांपूर्वी मराठा जातीतील पुष्कळ लोकांना नुसते नव्हे, तर उत्तम लिहितावाचता येत असे, हे सिद्ध करता येण्यासारखे आहे. द्रौपदीस्वयंवर रचणारा अवचितसुत काशीकवि जातीचा मराठा होता व त्याला लिहितावाचता येत होते, असे तोच स्वत: सागंतो. तुकारामाने स्वहस्ताने लिहिलेला एक कागद विनायक लक्ष्मण भावे यांच्याजवळ आहे.
तुकारामाच्या वेळचे कानोबा, संताजी जगनाडा, नावजी माळी व शिवाजी कासार यांनी लिहिलेले अभंग त्यांच्या वंशजांजवळ अद्याप आहेत. परशरामबास, हरिबास, मुरारि मुल्लबारा वगैरे शिवकालीन मानभाव कवि बरेच व्युत्पन्न असून जातीने ते मराठे होते. सारांश, शिवाजीच्या वेळच्या बर्याच मराठ्यांना चांगले लिहितावाचता येत असे, इतकेच नव्हे, तर त्यांच्यापैकी कित्येकजण ग्रंथकर्तेसुद्धा होते; तेव्हा दोनशे वर्षांपूर्वीच्या मराठ्यांना लिहितावाचता येत नसे, हा डफने मांडलेला पूर्ण निषेधात्मक सिद्धांत मुळातच सर्वथैव खोटा आहे, असे म्हणणे अपरिहार्य आहे. डफच्या गप्पेचे समर्थन होऊच शकत नाही!’
anand47.hardikar@gmail.com
