चुकलो भुजबळ साहेब, आम्ही तुम्हाला ओळखण्यात खरेच चुकलो. तुम्ही ओबीसींच्या कल्याणासाठी सत्तेत आहात. त्यांना न्याय मिळावा म्हणून तुम्ही मंत्रीपद घेतले. गरिबांच्या पोटाची भूक शमावी म्हणून तुम्ही रेशनचे खाते मागून घेतले असेच आम्हाला आजवर वाटत होते. मात्र तुमचे ‘माझ्या मुलाबाळांचे काय’ हे वक्तव्य वाचून आमच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. ओबीसी हा तसा राज्यातला कष्टकरी समाज. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही तुमचे अवघे राजकीय आयुष्य वेचले. मरेपर्यंत लढेन हा तुमचा शब्द आम्ही मनात साठवून ठेवला. किती आशेने बघत होतो आम्ही तुमच्याकडे. आता तुम्ही निराशा केली असे आम्हाला अजिबात म्हणायचे नाही. आमचीच आशा भाबडी होती त्याला तुम्ही तरी काय करणार? अशी आशा बाळगणे ही पुन्हा आमचीच चूक.

तुम्ही मंत्रीपदावर असलात की कष्टकर्‍यांच्या घरात रोज दिवाळी असते असा आमचा भ्रम होता. तुम्हाला मात्र पुतण्याच्या घरातील दिवाळीची चिंता लागून होती हे कळलेच नाही आम्हाला. आमच्या भ्रमनिरासाला तुम्हाला जबाबदार धरणे योग्य नाही. त्यामुळे ही आमचीच चूक. सारेच कुटुंबकबिल्याला सत्ता कशी मिळेल याचा विचार करत असताना तुम्ही मात्र तुमच्याऐवजी एखाद्या सामान्य कार्यकर्त्याचा विचार कराल असे आम्हाला वाटत होते. त्यातही आमची निराशा झाली. खरे सांगू का साहेब, आम्ही तुम्हाला समजूनच घेऊ शकलो नाही. उठता, बसता, खाता, पिता तुमच्या डोक्यात केवळ जनतेच्या कल्याणाचेच विचार घोळत असतात असेही आम्हाला वाटत होते. हे सर्व करताना केवळ तुमची मुलेबाळे तुमच्या डोळ्यांसमोर असतात हे आमच्या मठ्ठ डोक्यात कधी आलेच नाही. तुरुंगवारी वगैरे केल्यानंतर तुम्ही मोठ्या कष्टाने मिळवलेले मंत्रीपद हे तुमचा कौटुंबिक वारसा पुढे नेण्याच्या अटीवर घेतले आहे याची आम्हाला अजिबात कल्पनाच आली नाही. मराठ्यांच्या पक्षातला एकमेव लढवय्या ओबीसी नेता म्हणूनच आम्ही तुमच्याकडे बघत होतो. हा लढा कोणत्याही सामान्य कार्यकर्त्याऐवजी तुमचा कर्तबगार पुतण्याच पुढे नेऊ शकतो व त्यासाठीच त्याला मंत्रीपद आवश्यक याची पुसटशी जाणीवही कधी आम्हाला झाली नाही. तुमचे नेतृत्व गोड मानून आम्हीच डोळे घट्ट मिटून घेतले होते. त्यामुळे हा तुमचा दोष नाहीच भुजबळ साहेब.

खरे दोषी आम्हीच आहोत. तुमच्या पक्षातली पाटील, तटकरे, पवार यासारखी घराणी कुटुंबातील सार्‍यांची राजकीय सोय लावून घेत असताना तुम्ही तरी मागे का राहावे हा प्रश्नरूपी युक्तिवाद आता कुठे लक्षात येऊ लागला आमच्या. तुमच्या पुतण्याने तुमच्याच सावलीत राहून मंत्रीपदासाठी आवश्यक असलेले कर्तृत्व सिद्ध केले आहे हे आम्हाला आजवर कधी कळलेच नाही. राजकारणात एका हाताने द्यायचे असते व दुसर्‍या हाताने लगेच घ्यायचे असते. आश्वासनावर अवलंबून राहिले की कधी दोन्ही हात रिकामे होतील हे सांगताच येत नाही. याची जाण आम्हाला या वक्तव्यामुळे आली. मंत्रीपद हे वारशाने चालत येणारे पद हेही आम्हाला ठाऊक नव्हते. तेव्हा आता एकच करा भुजबळ साहेब. तुम्हाला खासदारकी व पुतण्याला मंत्रीपद नाकारणार्‍या या कृतीविरुद्ध पेटून उठा. होऊन जाऊ द्या एकदाचा एल्गार! हा ओबीसींवरचा घोर अन्याय, असे म्हणत आम्ही तुमच्या पाठीशी उभे ठाकू. तुम्हाला समजून घेताना ज्या असंख्य चुका आमच्याकडून झाल्या त्याबद्दल खुल्या दिलाने एकदा माफ करून टाका फक्त!