रामेश्वर नाईक,कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष
मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून मदत मिळवणे ही पूर्वी एक अत्यंत गुंतागुंतीची आणि वेळखाऊ प्रक्रिया होती. या प्रक्रियेमुळे अनेकदा उपचार सुरू होण्यास उशीर होत असे. मात्र, या पारंपरिक प्रक्रियेत आता आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. रुग्णांना आता मुंबईच्या वार्या करण्याची गरज उरलेली नाही.
आरोग्य हीच खरी संपत्ती, पण जेव्हा एखादे गंभीर आजारपण उंबरठ्यावर येते, तेव्हा केवळ शरीरच नाही तर संपूर्ण कुटुंब आर्थिक विवंचनेने खचून जाते. अशा कठीण प्रसंगात, जेव्हा मदतीचे सर्व दरवाजे बंद वाटू लागतात, तेव्हा ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ हा केवळ एक स्रोत लाखो कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरत आहे. ही केवळ एक यंत्रणा राहिलेली नाही, तर संवेदनशील नेतृत्व आणि जनसामान्यांच्या सहभागातून उभी राहिलेली एक लोकचळवळ झाली आहे. या परिवर्तनामागे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, संवेदनशील विचार आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर दिलेला भर यांचा महत्त्वाचा वाटा आहे. राज्यातील कोणताही गरजू रुग्ण उपचारांअभावी वंचित राहू नये, हा त्यांचा संकल्प आहे.
पूर्वी या निधीच्या माध्यमातून मदत मिळवणे ही एक अत्यंत गुंतागुंतीची आणि वेळखाऊ प्रक्रिया होती. रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना अर्ज करण्यासाठी मुंबई गाठावी लागत असे, शेकडो कागदपत्रांची पूर्तता करावी लागत असे आणि मंजुरीसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत असे. या प्रक्रियेमुळे अनेकदा उपचार सुरू होण्यास उशीर होत असे. मात्र, या पारंपरिक प्रक्रियेत आता आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली असून जिल्हास्तरावर सहायता कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. यामुळे आता रुग्णांना मुंबईच्या वार्या करण्याची गरज उरलेली नाही. आता रुग्णालयांमार्फत थेट ऑनलाइन अर्ज सादर केला जातो, कागदपत्रांची डिजिटल पडताळणी केली जाते आणि अवघ्या काही तासांत मंजुरी मिळून रक्कम थेट रुग्णालयाच्या खात्यात जमा केली जाते. या पारदर्शकतेमुळे मदत मिळण्याबाबतची अनिश्चितता आता कायमची दूर झाली आहे.
या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध आरोग्य योजनांचे एकत्रीकरण हा एक मैलाचा दगड ठरला आहे. ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’, ‘आयुष्मान भारत’ आणि ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ यांच्यात समन्वय साधण्यासाठी ‘आरोग्य वॉर रूम’ संकल्पना राबवण्यात येत आहे. यामुळे निधीचा अपव्यय टाळून योग्य लाभाथ्र्याला नेमकी मदत मिळणे शक्य झाले आहे. सोबतच, १८००-१२३-२२११ या चोवीस तास उपलब्ध टोल-फ्री हेल्पलाइनच्या माध्यमातून ‘रुग्ण मित्र’ ही सेवा अहोरात्र कार्यरत आहे. एका फोनवर रुग्णांना डिजिटल लिंक मिळते, ज्याद्वारे जवळील रुग्णालय, रक्तपेढी आणि रुग्णवाहिकेची माहिती सहज उपलब्ध होते. माहितीच्या अभावामुळे होणारा गोंधळ आता इतिहासजमा झाला आहे. खर्या अर्थाने ही योजना लोकांची तेव्हा झाली, जेव्हा समाजाचा सहभाग यात वाढू लागला. नेरुळ येथील एका ८२ वर्षीय आजोबांनी आपल्या आयुष्यभराची पुंजी या निधीसाठी दान केली, हे उदाहरण या योजनेच्या सामाजिक स्वीकाराचे मोठे द्योतक आहे.
समाजातील विविध घटक आज स्वेच्छेने योगदान देत आहेत. ‘रुग्णांनी सेवा शोधण्याऐवजी सेवा रुग्णांपर्यंत पोहोचणे’ या भावनेतून आयोजित केली जाणारी मुख्यमंत्री आरोग्य शिबिरे ग्रामीण आणि दुर्गम भागांतील नागरिकांसाठी वरदान ठरत आहेत. महागड्या उपचारांसाठी शासकीय यंत्रणा, कॉर्पोरेट संस्था आणि रुग्णालय यांचा ‘त्रिपक्षीय करार’ ही नावीन्यपूर्ण संकल्पना राबवून रुग्णांवरील आर्थिक भार कमी केला जात आहे.
या सर्व प्रयत्नांचे फलित आकडेवारीतूनही स्पष्टपणे दिसून येते. १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या आर्थिक वर्षात राज्यातील तब्बल ४० हजार ७७६ रुग्णांना ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. मेंदूविकार, कर्करोग, हृदयरोग यांसारख्या गंभीर आजारांवरील उपचारांसाठी दिलेली ही मदत केवळ आर्थिक नसून अनेक जीव वाचल्याचे प्रमाण आहे.
पेपरलेस प्रक्रिया, रिअल-टाइम मॉनिटरिंग आणि थेट बँक हस्तांतरण यामुळे नागरिकांचा मुख्यमंत्री सहायता निधी कक्षावरील विश्वास वृद्धिंगत झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही यंत्रणा आज खर्या अर्थाने माणुसकीच्या बळावर उभी राहिलेली एक प्रभावी लोकचळवळ म्हणून उदयास आली आहे, जी महाराष्ट्रातील प्रत्येक गरजवंतासाठी आधाराचा भक्कम स्तंभ ठरली आहे.
संकेतस्थळाची वैशिष्ट्ये
अर्ज स्थितीची ट्रॅकिंग : यापुढे रुग्णांना अर्जाची माहिती त्यांच्या मोबाइलवर एसएमएस, लिंकद्वारे रिअल टाइम मिळणार आहे.
टप्प्याटप्प्याने निधी वितरण : अर्जाच्या मंजुरीनंतर ३० टक्के रक्कम तात्काळ, उर्वरित ७० टक्के रक्कम अंतिम मंजुरीनंतर वर्ग केली जाणार आहे.
रिअल-टाइम वॉर रूम मॉनिटरिंग : मंत्रालय स्तरावर वॉर रूमद्वारे सतत देखरेख, निर्णय प्रक्रियेत गती मिळणार आहे.
तात्काळ मंजुरी (कार्यालयीन आठ तासांत मंजुरी) : उपचारासाठी लागणार्या आर्थिक साहाय्याची मंजुरी केवळ कार्यालयीन आठ तासांत दिली जाईल.
पूर्णपणे पेपरलेस प्रक्रिया : कागदपत्रांची देवाणघेवाण किंवा कार्यालयीन धावपळीशिवाय डिजिटल पद्धतीने संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल.
रुग्णालयामार्फत थेट ऑनलाईन अर्ज : रुग्णांना स्वत: अर्ज करण्याची गरज नाही. रुग्णालयातूनच अर्ज सादर होतील.
कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी : आधार, उत्पन्न प्रमाणपत्र, शिधापत्रिका इ. तात्काळ डिजिटल पडताळणी होईल.
थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) : मंजूर निधी थेट रुग्णालयाच्या खात्यात जमा पारदर्शकता वाढणार आहे.
तीन हजारांपेक्षा अधिक रुग्णालयांचे जाळे : राज्यातील सरकारी व खासगी मिळून ३,००० रुग्णालयांचा समावेश असणार आहे.
हेल्पलाइन व डिजिटल मार्गदर्शन : टोल-फ्री १८०० १२३ २२११ व व्हॉट्सॲपद्वारे मार्गदर्शन मिळणार आहे.
मोबाइल ॲपद्वारे रुग्णालयांचा शोध : योजनेमधील जवळील रुग्णालय, रक्तपेढी, रुग्णवाहिका सहज शोधण्याची सुविधा मिळेल.
मुख्यमंत्री आरोग्य शिबिर व्यवस्थापनाअंतर्गत ऑनलाइन प्रणालीच्या साहाय्याने आरोग्य शिबिरे घेतली जातात. रुग्णांना तात्काळ आणि सुलभ मार्गदर्शन मिळावे यासाठी ‘रुग्ण मित्र’ ही चोवीस तास उपलब्ध टोल-फ्री हेल्पलाइन (१८०० १२३ २२११) सुरू करण्यात आली आहे. या सेवेद्वारे रुग्णांना डिजिटल लिंक मिळते, ज्यातून त्यांच्या परिसरातील मान्यताप्राप्त रुग्णालये, रुग्णवाहिका सेवा आणि रक्तपेढ्यांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होते. त्यामुळे उपचारासाठी आवश्यक माहिती मिळविण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद झाली आहे. लोकसहभाग वाढविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांसाठी स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या माध्यमातून संस्था नोंदणी करून शासनाबरोबर
भागीदारी करू शकतात. तसेच मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) संस्था आणि रुग्णालय यांच्यातील त्रिपक्षीय करारामुळे महागड्या उपचारांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया अधिक सक्षम झाली आहे. विशेषत: कर्करोगासारख्या गंभीर आजारांसाठी हा उपक्रम मोठा दिलासा देणारा ठरत आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाकरिता विकसित करण्यात आलेल्या ऑनलाइन प्रणालीमध्ये राज्यामध्ये कार्यरत असणार्या आरोग्यविषयक विविध योजनांचे एकत्रीकरण करण्यात येत आहे. येत्या काळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष केवळ आर्थिक मदतीचा स्रोत न राहता, रुग्ण, रुग्णालये आणि शासन यांना एकत्र आणणारे प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे.
