‘कोल्हापूरच्या उत्तरेस चार मैलांवर चिकुर्डे नावाचे एक टुमदार गांव आहे. तेथे धाकू व माकू या नांवाचे दोन धनगर पाचपंचवीस वर्षांपूर्वी राहत. त्यांच्या घरातील एक बाई सध्या हयात आहे. तिच्याजवळ एक ताम्रपट होता. तो श्रीमंत आप्पासाहेब देशपांडे चिकुर्डेकर यांनी तिच्याकडून आणवला आणि वाचण्याकरिता काही वेळ माझ्या स्वाधीन केला. दोन दिवस माझ्याजवळ हा ताम्रपट होता. त्या अवधीत बाई माझ्याजवळून हलली नाही. इतकी ही बाई ह्या ताम्रपटाला जपते आणि जपण्याला कारणहि तसेच बलवत्तर आहे…’ अशी राजवाड्यांनी कोल्हापूरहून प्रकाशित होणार्या ‘विश्ववृत्त’च्या १९०७मधील एका लेखाची सुरुवात केली आणि मग त्या ताम्रपटाबद्दलची अधिक माहिती देत लिहिले, ‘हा ताम्रपट शक ६५८पासून (इसवी सन ७३६) ह्या धनगरणीच्या कुळांत वंशपरंपरेने अव्याहत या काळापर्यंत आहे. ताम्रपटाचा मूळ संपादक जो मंनेयराम गावुंडा तो ह्या बाईचा मूळ पूर्वज होय. चिकुर्डेकर धनगरांत गुरव, सीद व गांवडे ऊर्फ गावुंडा कुळींतील मंनेयराम गावुंडा होय. तो शक ६५८मध्ये चालुक्यचक्रवर्ति जो समस्तभुवनाश्रय विजयादित्य त्याच्या हत्तीचा महात (माहूत) होता. खुश होऊन विजयादित्याने सदर ताम्रपट मंनेयरामास बहाल करून दिला. ताम्रपट व बाई यांच्या साहचर्यावरून असे मानणे प्राप्त आहे की, शक ६५८पासून शक १८२८पर्यंतच्या ११७० वर्षे गांवडे धनगरांचे कूळ चिकुड्र्यास अव्याहत नांदत आहे…’
ताम्रपटाची ही प्राथमिक माहिती देऊन झाल्यावर राजवाड्यांनी प्रत्यक्ष ताम्रपटाचे वर्णन केले. ‘ताम्रपटाचे एकंदर पत्रे तीन आहेत. पत्र्यांची लांबी ८१/२ इंच, रुंदी ५१/२ इंच व जाडी १/१५ इंच आहे. तिन्ही पत्र्यांच्या कडा जाड आहेत. तिन्ही पत्रे २१/२ इंच व्यासाच्या एका कड्यांत गोवले आहेत. कड्याला एक मोहरेची चवकट आहे. चवकटीची लांबी २१/४ इंच व रुंदी ११/४ इंच आहे. चवकटीत वराहाची मूर्ती कोरलेली आहे. मूर्तीची लांबी १३/४ व रुंदी ११/८ इंच आहे. हा चालुक्यांचा वराहलांछनरूप शिक्का होय… तीन पत्रे मिळून पाठपोट ६ पृष्ठे होतात. पैकीं पहिले व सहावे पृष्ठ कोरे आहे. २/३/४ व ५ अशी चार पृष्ठे मजकूर आहे. पहिल्या पृष्ठावर १५, दुसर्या पृष्ठावर १५, तिसर्या पृष्ठावर १४ व चौथ्या पृष्ठावर १५ मिळून एकंदर ओळी ५९ आहेत. अक्षरे तत्कालीन चालुक्यांच्या काळची असून सर्व शाबूत आहेत. भाषा मराठी आहे. एकदोन ठिकाणी ‘लु’ हा कानडी प्रत्यय आला आहे. अठराव्या ओळीत ‘माड’ तसेच ‘गंड’ वगैरे एकदोन शब्द कानडी आहेत…’
ताम्रपटातील अन्य मजकुरावरून कालनिश्चिती करीत राजवाड्यांनी लिहिले, ‘ताम्रपटाचा काल भावसंवत्सर, वैशाख कृष्ण अष्टमी मंगळवार आहे. शक ५३९, ५९८, ६५८, ७१७, ७७६, ८३६, ८९६, ९५६, १०१६, १०७६ इतक्या दहा सालांना भाव संवत्सर आहे, पैकी वैशाख कृष्ण अष्टमीला मंगळवार अथवा भौमवार शक संवत् ६५८लाच तेवढा येतो. अर्थात हा ताम्रपट चालुक्यांच्या रियासतीत पडतो, हे उघड आहे. शिवाय प्रारंभीच्या वराहाच्या मंगलाचरणावरूनहि हा ताम्रपट चालुक्यांचा आहे, असे ठरते…’
‘विजयादित्याची कारकीर्द शक संवत् ६१९ श्रावणापासून शक संवत् ६५५ फाल्गुनपर्यंत चालली होती’, या डॉ. भांडारकरांच्या मताशी आपण सहमत नाही, हे स्पष्ट करीत पुढे लिहिले, ‘विजयादित्याचा प्रियतनय जो दुसरा विक्रमादित्य तो शक संवत् ६५६ माघांत राज्य करीत होता, असे लखमेश्वर येथील शिलालेखावरून अनुमान आहे. परंतु हा लखमेश्वर येथील शिलालेख इ.स. ९६७ नंतर एका जुन्या शिलालेखावरून नकल करून शिळेवर उतरून घेतलेला आहे. तेव्हा प्रस्तुत शक संवत ६५८तल्या ताम्रपटावर जेवढा विश्वास ठेववतो, तितका विश्वास ह्या इ.स. ९७६ नंतर कोरलेल्या नकली शिलालेखावर अर्थातच ठेववत नाही…’
anand47.hardikar@gmail.com
