‘चिकुर्डे येथील धनगरणीकडच्या ताम्रपटाचे वर्ष शक ६५८हेच असावे’, असे आपले मत त्या ताम्रपटातील भाषेच्या जुनेपणाच्या आधारे मांडताना राजवाड्यांनी लिहिले, ‘शक ११२८मधील पाटणच्या मराठी शिलालेखाची जी मराठी भाषा आहे किंवा पंढरपूरच्या चौर्‍यांयशीच्या शिलालेखांतील जी मराठी भाषा आहे, तिच्याहून प्रस्तुत ताम्रपटाची भाषा अत्यंत जुनी भासते. इतकी जुनी की प्रस्तुत ताम्रपटाची भाषा पाटणच्या शिलालेखाच्या भाषेहून पाचचारशे वर्षांनी तरी जुनी आहे, असे दिसते… ह्या गोष्टीची सत्यता भाषाभिज्ञांच्या लक्षात परीक्षांनी येण्यासारखी आहे. ह्या भाषेच्या जुनेपणावरून शक ६५८ हेच वर्ष ह्या ताम्रपटाचे मी कायम करतो. ह्याहून बलवत्तर कारणें पुढे आल्यास, हें मत बदलण्यास अडचण पडणार नाही…’

ताम्रपटाचे साल निश्चित केल्यावर त्यामधील राजांच्या नावांचा खुलासा करीत राजवाड्यांनी लिहिले, ‘समस्तभुवनाश्रय विजयादित्य ह्यालाच जनमेजय चक्रवर्ती हें दुसरें नांव होतें, हें विधान मानलें म्हणजे असेंहि मानणें अवश्य होतें की, विजयादित्य हें नाव पदवीदर्शक असून विजयादित्याचें पाळण्यांतील नांव जनमेजय होतें. चालुक्यांचा सोमवंश असल्यामुळें त्यांची नांवें पांडववंशांतील परीक्षित, शतानीक, जनमेजय वगैरे पुरातन प्रसिद्ध राजांची असणे अगदी स्वाभाविक आहे… ताम्रपटांत विजयादित्याला हस्तिनापुरपरमेश्वर म्हटलेले आहे. चालुक्यांची मूळ नगरी अयोध्या होती, असें कित्येक ताम्रपटांत म्हटलेलें प्रसिद्ध आहे. परंतु येथें केवळ विजयादित्यासंबंधानेंच निर्देश करावयाचा असल्यामुळे हस्तिनापुर ऊर्फ अनागोंदी ह्या शहराचें स्वामित्व त्याच्या ठायीं प्रस्थापित केलें आहे. अनागोंदी ह्या शब्दाचा अर्थ कानडींत हस्तिपुर अथवा पीलखाना असा होतो… चालुक्यांची कुलदेवता वराहावतार जो विष्णु तो आहे. ह्या ताम्रपटांत विजयादित्य पाशुपत व पंचरात्र ह्या शैवपंथाचा पुरस्कर्ता वर्णिलेला आहे. ह्याचा अर्थ इतकाच की, शिवागमाकडेहि विजयादित्य कधीकधीं कृपाकटाक्ष फेंकीत असे…’

ताम्रपटाचे वाचन कसकसे अधिकाधिक माहिती देणारे ठरू शकते, याचा पाठ्यपुस्तकी धडा ठरू शकेल, असे विवेचन करीत राजवाड्यांनी पुढे लिहिले, ‘प्रस्तुत ताम्रपटांत कारिग्राम, वेनद्वाडग्राम, बलियवाड, चिकलवाड, देवुलंग्राम, आयितग्राम, स्ताणपग्राम व आमलकग्राम अशा आठ गावांचा उल्लेख आला आहे. पैकीं प्रस्तुतचें जें चिकुर्डें तेंच चिकलग्राम किंवा चिकलवाड- चिकलवाट- चिकलवाड- चिकल- चिकल्डें- चिकर्डें- चिकुर्डे. आयतवडें तेंच आयितग्राम ऊर्फ आयितवाड. बलवडें, दलवडें वगैरे गांवें व वाड्या चिकुड्र्याच्या आसपास आहेत. इतर गांवे व वाड्या ह्यासंबंधानें विशेष चवकशी करण्यास मला पुरेसा वेळ मिळाला नाही. ह्या आठांपैकीं कांही गांवें व वाड्या उजाड झाल्या असण्याचा संभव आहे. तथापि चिकुर्डे व आइतवडे या दोन गांवांवरून ताम्रपटांतील गावांचे सत्यत्व स्थापित होते… तसेंच कृष्णा व वारुवेण्णा ह्या मोठ्या नद्यांची नांवें ताम्रपटांत आली आहेत. पैकीं कृष्णा चिकुड्र्याच्या उत्तरेस व वारुवेण्णा ऊर्फ वारणा दक्षिणेस आहे. ‘वारणा’ ह्या शब्दाचे शक ६५८ मधील रूप ‘वारुवेण्णा’ होतें, ही बाब लक्षांत ठेवण्यासारखी आहे. तिमासा, त्रिसगडा अथवा त्रिसंगडा, वारा, सीमोले व आकास ह्या पांच स्थानिक नद्या किंवा ओढे ताम्रपटांत निर्देशिले आहेत. त्यांची प्रस्तुतचीं नांवें पटविण्याला मला वेळ सांपडला नाही, कारण चिकुड्र्यास मी गेलो तेव्हा जुलै महिन्यातला मुसळधार पाऊस होता…’

त्या ताम्रपटावरचे आपले स्वतंत्र भाष्य आटोपते घेताना राजवाड्यांनी नोंदवलेले निरीक्षण वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांनी लिहिले, ‘तत्कालीन ग्रामसंस्था, इनामदारांचे हक्क व लवाजमे, बलुतेदारांचे हक्क, ग्रामसीमेचे दगड, देवळें, घाट, विहिरी, पर्वत, उंचवटे, मातीचे ढीग, राजरस्ते वगैरेंचा नामनिर्देश येथें आलेला आहे. त्यावरून शक संवत् ६५८मध्ये तो प्रदेश सध्यांहूनहि विशेष भरभराटींत होता, असें दिसतें. चिनी प्रवासी व्हानसंग याने शक ५५१ ते ५६७पर्यंत हिंदुस्थानांत प्रवास केला व त्याकाळची देशस्थिति वर्णिली. तीच भरभराटीची देशस्थिति त्याच्यानंतर शंभर वर्षांनी शक ६५८मध्ये महाराष्ट्रांत होती, असें या ताम्रपटावरून दिसतें…’ आनंद हर्डीकर anand47.hardikar@gmail.com