– प्रवीण साहनी (ज्येष्ठ संरक्षणतज्ज्ञ)
मे २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या, चार दिवसांच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेदरम्यान, आपल्या अभियंत्यांनी पाकिस्तान हवाई दलाला प्रत्यक्ष घटनास्थळी (ऑन साइट) तांत्रिक साहाय्य पुरवले होते, या गोष्टीला चीनने अधिकृत दुजोरा दिला आहे. ६-७ मेच्या रात्री झालेल्या हवाई लढाईत, ज्या जे-१०सी लढाऊ विमानाने भारतीय हवाई दलाचे ‘राफेल’ हे लढाऊ विमान पाडल्याचे सांगितले जाते, त्या विमानाशी संबंधित तांत्रिक कामांची जबाबदारी सांभाळणारे चिनी अभियंते ‘झांग हेंग’ यांनी चीनच्या सरकारी वाहिनीवर ही माहिती उघड केली.
हा खुलासा ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या वर्षपूर्तीच्या दिवशी करण्यात आला. ही वेळ महत्त्वपूर्ण होती, कारण तेव्हा भारत पाकिस्तानवरील आपला विजय साजरा करत होता. चीनने या संधीचा फायदा घेत भारताला हे कळवले की, जे-१०सी लढाऊ विमानांनी अपेक्षित परिणाम साधावा यासाठी त्यांच्या अभियंत्याने पीएएफच्या वैमानिकांसोबत प्रत्यक्ष काम केले होते. पीएएफने आपल्या पीएल-१५ क्षेपणास्त्राचा वापर करून, कथितरीत्या १४३ किमी एवढ्या अंतरावरून राफेल विमान पाडले. हे पीएएफने ‘मल्टी डोमेन ऑपरेशन्स’ (एमडीओ) या आपल्या युद्धतंत्राद्वारे केले.
अशा प्रकारे, या खुलाशाचा अर्थ असा होता की, चीन केवळ पाकिस्तानच्या लष्कराला शस्त्रास्त्रे, सॉफ्टवेअर, अंतराळविषयक क्षमतांसारख्या ‘नॉन-कायनेटिक’ (अप्रत्यक्ष) क्षमतांचे प्रशिक्षण आणि अत्याधुनिक युद्धसामग्री एवढेच पुरवणार नाही, तर या युद्धसामग्रीची निर्मिती करणारे स्वत:चे अभियंते पाकिस्तानच्या लष्कराला या युद्धसामग्रीची देखभाल करण्यासाठी तसेच प्रत्यक्ष युद्धातील मदतीसाठी प्रत्यक्ष उपलब्ध असतील, याचीही काळजी घेईल. हे थोडे वेगळे आहे. साधारणपणे असे अपेक्षित असते की, पाकिस्तानला गरज आहे तर त्याचे वैमानिक आणि अभियंते चीनमध्ये जाऊन जे-१०सी विमानाचे आणि त्याबरोबर पीएल १५ क्षेपणास्त्राचा वापर करण्याबाबतचे प्रशिक्षण घेतील.
चिनी अभियंत्यांनी घटनास्थळी पीएएफला दोन प्रकारे मदत केली. वातावरणातील उष्णता ५० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यामुळे, पीएएफच्या लढाऊ विमानाने लढाईसाठी उड्डाण करण्याआधी, त्यांनी जे-१०सी मधील इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि सॉफ्टवेअर, म्हणजेच रडार आणि जॅमिंगसाठीची इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर प्रणाली व्यवस्थित काम करत असल्याची खात्री केली. शिवाय, भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानाला शत्रूच्या लढाऊ विमानाची उपस्थिती कळू नये म्हणून जे-१०सी चे रडार बंद ठेवण्यात आले होते, त्यामुळे दुसर्या एईडब्ल्यू अँड सी (एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल) विमानाद्वारे डेटा मिळवून तो सॉफ्टवेअर लिंकद्वारे जे-१०सी च्या वैमानिकाकडे पाठवण्यात आला, जेणेकरून तो आपले पीएल-१५ क्षेपणास्त्र सोडू शकेल. हे एक अत्यंत संवेदनशील काम होते, ज्यासाठी (अ) शत्रूकडून लिंक जॅम केली जाणार नाही आणि (ब) सायबर-हल्ल्यामुळे कोणताही बिघाड न होता, एईडब्ल्यू अँड सी विमान तसेच जे-१०सी लढाऊ विमानामधील लिंकद्वारे डेटा क्षणार्धात पोहोचवला जाईल, या दोन गोष्टी आवश्यक होत्या. थोडक्यात, पीएएफचे वैमानिक लढाईवर लक्ष केंद्रित करत असताना, चिनी अभियंत्यांनी लढाईसाठी साहाय्य केले.
यावरून हे स्पष्ट होते की, चीन पाकिस्तानला फक्त नवीन शस्त्रेच देणार नाही, तर त्यांचा वापर करून पाकिस्तान प्रत्यक्ष युद्धात उत्तम कामगिरी कशी करेल यासाठी चीनचे अभियंते पाकिस्तानला मदत करतील. चीन आपले पाचव्या पिढीचे ख35 अ लढाऊ विमान पाकिस्तान हवाई दलाला देणार आहे, अशाही बातम्या आहेत. ही एक अतिशय निर्णायक गोष्ट आहे. कारण भारतीय हवाई दलाला या दर्जाची पाचव्या पिढीची लढाऊ विमाने मिळवण्यासाठी काही वर्षे लागतील. चीन ‘रॉकेट फोर्स कमांड’ नावाच्या नव्याने स्थापन केलेल्या पाकिस्तानच्या लष्करी संघटनेला हायपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रेदेखील देणार आहे. ही क्षेपणास्त्रेदेखील भारताला दीर्घकाळ उपलब्ध होणार नाहीत.
पाकिस्तान आणि चीनच्या लष्कराममधील या देवाणघेवाणीची युक्रेन युद्धाशी तुलना होऊ शकते. जिथे नाटोचे विशेषज्ञ युक्रेनच्या सैन्याला लढाईसाठी मदत करत आहेत, आणि युक्रेन प्रत्यक्ष लढाई करत आहे. तथापि, भारतीय सैन्याला पाकिस्तान-चीनच्या आव्हानाला तोंड देणे शक्य होणार नाही, कारण भारतीय लष्करी क्षमता रशियन लष्कराच्या क्षमतेच्या जवळपासही नाही. आणि नाटोच्या क्षमतेमधला मोठा वाटा उचलणारी अमेरिका जगभरात अनेक युद्धे लढत आहे आणि अनेक अमेरिकी लष्करी अधिकार्यांच्या मते, पश्चिम पॅसिफिकमध्ये चिनी सैन्याला हरवण्याची क्षमता त्याच्यात नाही.
पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूर संपवलेले नसणे, नवनित्य (न्यू नॉर्मल) परिस्थितीत ते ‘स्थगित’ केलेले असणे, यामुळे पुढच्या काळातील संघर्ष अत्यंत धोकादायक ठरू शकतो. मुख्य म्हणजे ही वस्तुस्थिती भारताच्या समस्या अधिकच वाढवणारी आहे. मोदींच्या नवनित्य (न्यू नॉर्मल) परिस्थितीत चार घटक आहेत, ते म्हणजे
(अ) दहशतवादी कृत्याला युद्धजन्य कृत्य मानले जाईल,
(ब) भारत दहशतवादी आणि त्यांचे प्रायोजक (म्हणजेच पाकिस्तानी सैन्य) यांच्यात कोणताही भेद करणार नाही,
(क) भारत पाकिस्तानच्या अण्वस्त्र वापराच्या धोक्याच्या रेषेकडे दुर्लक्ष करेल, आणि
(ड) भारत वाट न पाहता कृती करेल.
या चारही घटकांकडे एकत्र पाहिले की स्पष्ट होते की पाकिस्तानने भारतावर मोठा दहशतवादी हल्ला केला तर त्याचे रूपांतर मोठ्या युद्धात होऊ शकते. आणि हे नियोजित नसेल, तर ते जे अचानकपणे उद्भवू शकते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात हा संघर्ष थोपवून धरण्यासाठी कोणतीही तरतूद नाही आणि भारत शस्त्रसंधीसाठी बाहेरील मध्यस्थीची वाट पाहणार नाही, यामुळे पाकिस्तानला पुढाकार घ्यायला भाग पाडले जाऊ शकते. कारण भारत अफगाणिस्तानातील तालिबान सरकारच्या संगनमताने बलुचिस्तानमधील आपल्या भूमीवर दहशतवाद करत असल्याचाही पाकिस्तानचा आरोप आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर आणि धोकादायक आहे, कारण भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडे अण्वस्त्रे आहेत. पाकिस्तानची भौगोलिक रचना अरुंद असल्याने, त्यांचे बहुतेक अण्वस्त्र प्रकल्प आणि पायाभूत सुविधा भारताच्या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात येतात, ज्यामुळे युद्धाच्या स्थितीत धोका वाढतो.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर नक्की काय घडले, हे एकदा स्पष्ट झाले की चार दिवसांच्या त्या युद्धात आपले अभियंते प्रत्यक्ष घटनास्थळी तांत्रिक साहाय्य पुरवत होते, ही बाब चीनने का उघड केली, हे समजणे कठीण जात नाही. भारताने आपल्याला नियंत्रित करता येणार नाही किंवा जिंकणे शक्य होणार नाही, असे कोणतेही युद्ध छेडू नये, यासाठी भारताला सूचक इशारा देण्याचा तो एक चिनी मार्ग होता.
pravin@forceindia.net
