अन्वयार्थ : सदोष कोविड धोरणाचा भडका | china zero covid strategy coronavirus in china lockdown in china | Loksatta

अन्वयार्थ : सदोष कोविड धोरणाचा भडका

‘शून्य कोविड’ धोरणामुळे पुढील काही महिने कंपनी संकुलातच राहावे लागणार असल्याचे कळाल्यानंतर त्यांच्या संतापाचा कडेलोट झाला

अन्वयार्थ : सदोष कोविड धोरणाचा भडका
(संग्रहित छायाचित्र)

कोविड-१९ महासाथीचा उद्भव नि:संशय चीनमधला. ही महासाथ उग्र बनली, त्या वेळी चीनमधील बाधितांची संख्या अर्थातच इतर देशांच्या मानाने वेगाने वाढणारी होती. कालांतराने हा विकार वाहणारा करोना विषाणू जगभर फैलावला आणि बाधित व मृतांचे भीषण आकडे विशेषत: इटली, इराण, ब्रिटन, अमेरिका, ब्राझील व भारत या क्रमाने प्रसृत होऊ लागले. त्या वेळी चीनमध्ये एक चमत्कार नोंदवला जात होता. येथील बाधितांचा आकडा ८० हजारांच्या आसपास जाऊन गोठला! तो वाढला किती हे ठाऊक नाही. खाली किती व कसा आला, ते कुणी पाहिले नाही. परंतु एकंदरीत या घडामोडीचा मथितार्थ, चीनने साथीवर नियंत्रण किती समर्थपणे मिळवले आणि त्यासाठी नियम-निर्बंधांचा दट्टय़ा किती सक्षमपणे चालवला या स्वरूपाचा काढला गेला. प्रत्यक्षात चीनकडून हे आकडे दडवले जात होते आणि खरी माहिती बाहेरच्या जगात कोणालाच मिळत नव्हती. चीनच्या बाबतीत आणखी उल्लेखनीय बाब म्हणजे, चीनमध्ये निर्मित एक-दोन कोविड प्रतिबंधक लशी जगात अनेक ठिकाणी कुचकामी ठरत होत्या आणि अजूनही अन्य देशांमध्ये निर्मित लशींना चीनची दारे बंदच आहेत.

या परिस्थितीत साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शून्य-साथ किंवा झिरो-कोविड हे अव्यवहार्य धोरण राबवले गेले आणि त्यासाठी कडकडीत व प्रदीर्घ टाळेबंदीचा अघोरी मार्ग निवडला गेला. व्यक्तिस्वातंत्र्य, संचारस्वातंत्र्य, संपर्कस्वातंत्र्य, उद्यमस्वातंत्र्य यांची गळचेपी करणारे हे धोरण एका मर्यादेपलीकडे आणि मुदतीनंतर अजिबात परिणामकारक ठरत नाही, याचा साक्षात्कार जगभरातील अनेक देशांना झाला. अपवाद चीनचा. त्यामुळे विरोधाभास असा, की ज्या देशाने सर्वप्रथम करोनावर विजय मिळवल्याचे वाटत होते, तो देश आजही या साथीच्या कचाटय़ातून बाहेर पडण्यासाठी धडपडतो आहे. चीनचे नेतृत्व प्रखर राष्ट्राभिमानी वगैरे असल्यामुळे आणि त्याच्याकडून चुका घडण्याची अजिबात शक्यता नसल्यामुळे बहुधा असेल; पण ‘आपण चुकलो’ हे मान्य करून उपाययोजना बदलण्याचे धोरण त्यांनी स्वीकारलेले नाही! तरीही हा संदेश तेथील जनतेमध्ये पुरेसा झिरपलेला दिसत नाही. त्यामुळेच, चीनच्या झेंगजू शहरातील फॉक्सकॉन कंपनीतील कामगारांचे बंड या विसंवादाचे निदर्शक ठरले. अमेरिकेच्या अ‍ॅपल कंपनीसाठी अल्प मुदतीत आणि प्रचंड संख्येने मोबाइल हँडसेट बनवून देणारी कंपनी असा ‘फॉक्सकॉन’चा नावलौकिक. झेंगजूतील जवळपास तीन लाख कामगार क्षमतेच्या फॉक्सकॉन प्रकल्पाला ‘आयफोन सिटी’ असे संबोधले जाते.

चीनच्या उत्पादक क्षमतेचे ही कंपनी हे जणू प्रतीक. पण नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवडय़ात या कंपनीत झालेल्या बंडाच्या निमित्ताने चीनच्या कामगार धोरणातील ठिसूळपणाही जगासमोर आला. अत्यंत दाटीवाटीच्या संकुलांमध्ये कामगारांना कोंबून व डांबून ठेवणे, तुरळक आहार आणि तुटपुंज्या वेतनाच्या जिवावर त्यांचे कामाचे तास वाढवून अधिकाधिक उत्पादन करवून घेणे हे प्रकार तेथे सुरू होते. ऑक्टोबर महिन्यात या जाचाला कंटाळून तेथील काही कामगारांनी पळ काढला. त्यांतील काहींना प्रलोभने दाखवून पुन्हा कंपनीत आणून नंतर डांबले गेले. ‘शून्य कोविड’ धोरणामुळे पुढील काही महिने कंपनी संकुलातच राहावे लागणार असल्याचे कळाल्यानंतर त्यांच्या संतापाचा कडेलोट झाला. फॉक्सकॉनमधील कामगारांचे बंड हे केवळ चीनच्या कोविड धोरणाचाच नव्हे, तर कामगार धोरणाचाही विचका झाल्याचे दर्शवते.

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 04:29 IST
Next Story
लालकिल्ला : भाजपची गुजरातसाठी चाणाक्ष खेळी?