अन्नपाकिटे पोहोचविणार्‍या चिनी कवी वॅन्ग जायबिंग यांच्या काव्यसंग्रहाला दोन आठवड्यांपूर्वी चीनमधील परमोच्च साहित्य पुरस्कार मिळाला. याच वर्षी ‘आय डिलिव्हर पार्सल्स इन बीजिंग’ हे हू अन्यान यांचे आत्मकथनही आंतरराष्ट्रीय खूपविक्या पुस्तकांच्या यादीत शिरले. सध्या गाजतेय ते सिओ हे या कवी-लेखकाचे पुस्तक. तर चिनी कामगारांचे आयुष्य पुस्तकांमधून मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय पातळीवर का येत आहे, ते का गाजत आहे, याची चर्चा करणारा लेख. त्याबरोबर सिओ हे या विसाहून अधिक कारखान्यांत तूटपुंज्या पगारावर काम करणार्‍या लेखकाची मुलाखत.

https://tinyurl.com/j6hkhvs7 *   https://tinyurl.com/5xpaw66d

कथेतील मंगळ-अमंगळ

विनिता प्रभाकर या भारतीय वंशाच्या प्राध्यापिका गेल्या दोन दशकांपासून अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये महाविद्यालयात इंग्रजी साहित्य शिकवतात. गेल्या दीड आठवड्यापासून सगळ्याच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांत त्या झळकतायत. असे काय केले त्यांनी? तर ओटेशा मॉशफेग या लेखिकेच्या पॅरिस रिव्ह्यूमध्ये प्रकाशित झालेल्या ‘बेटरिंग मायसेल्फ’ या कथेला त्यांनी निवेदनाचा एक प्रकार म्हणून अभ्यासक्रमात शिकवायला ठेवले. आता या कथेतील नायिका मद्यप्रेमी-धूम्रप्रेमी आणि मुक्तछंदी असली, तरी कथा भरपूर गाजलेली असल्याने प्रभाकर यांनी ती निवडली. या कथेच्या निमित्ताने प्रभाकर यांना आपली नोकरी गमवावी लागली. त्यानंतर अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून त्यांनी महाविद्यालयाविरोधातच दावा ठोकला. आता त्यानंतर महिन्याच्या आरंभापासून त्यांच्यावर बातम्या आणि मुलाखती सुरू झाल्या आहेत. प्रभाकर यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून पॅरिस रिव्ह्यूने आपल्या संकेतस्थळावरील मॉॅशफेग यांची गोष्ट या सगळ्या गदारोळात मोफत वाचनासाठी उपलब्ध करून दिली आहे. मूळ प्रकरण समजावून सांगणारे वृत्त, निबंध आणि मंगळ-अमंगळ वादात अडकलेली कथा खालील दुव्यांवरून वाचता येईल.

https://tinyurl.com/3vy5az3u   *   https://tinyurl.com/4y55 jtmy  *  https://tinyurl.com/2h98cvz8  

आठ कथांचा संच…

अमेरिकेतील इमर्सन विद्यापीठाच्या साधारण तीनेक महिन्यांनी प्रसिद्ध होणार्‍या ‘प्लाऊशेअर’ मासिकातील कथा बुक-नेटमध्ये बर्‍याचदा दिल्या जातात. त्याचे कारण हे मासिक नव्या लेखकांच्या उत्तम साहित्यासाठी ओळखले जाते. करोनाच्या आधीपासून या मासिकाने ॲशली ली ब्राऊन या नावाने वार्षिक कथास्पर्धा सुरू केली. ज्यातील पारितोषिक रक्कम मोठी नसली, तरी कथा बर्‍याच निकषांवर तावून-सुलाखून निघालेल्या असतात. यंदा पारितोषिकाचे आठवे वर्ष. ज्युलिआना लामी या लेखिकेच्या ‘माय कण्ट्री ऑफ थिव्ज’ या कथेला यंदा पारितोषिक मिळाले. शिरस्त्याप्रमाणे उन्हाळ अंकात प्रकाशित झालेल्या या कथांसह आधीच्या सात विजेत्या कथा इथे मोफत वाचता येतील.   *   https://tinyurl.com/yspchwym