उद्योग किंवा राजकीय क्षेत्रातील तालेवार घराण्यांचा इतिहास रंजक ठरतो. त्यातून भावी पिढ्यांना प्रेरणा मिळते. त्यांच्या कामाची पद्धत, कल्पकता यातून शिकता येते. अशा कर्तृत्ववान व्यक्ती एखाद्या गावावर आपल्या कामाने अमीट छाप सोडतात. ही अशीच कहाणी आहे, ज्यातून अलाहाबादचे (आताचे प्रयागराज) सांस्कृतिक विश्व समृद्ध झाले. हे बदल कसे घडले, त्यामागे असलेली व्यक्तिमत्त्वे आणि त्यांच्या योगदानातून हा वारसा ज्या वास्तूने पुढे नेला तो ‘घोष व्हीला’ याचा इतिहास याच कुटुंबातील अंजना बसू यांनी ‘द हाऊस द प्रेस बिल्ट’ या पुस्तकात ओघवत्या भाषेत मांडला आहे.

चिंतामणी घोष यांनी तिशीत असताना ४ जून १८८४ रोजी ‘दि इंडियन प्रेस’ची मुहूर्तमेढ अलाहाबाद येथे रोवली. तिथे ते एका वृत्तपत्रात आवक-जावक विभागात काम करत असताना, कुतूहलापोटी जादा वेळ थांबून छपाई विभागात जात. त्यांची आवड पाहून त्यांच्याकडे टंक-जुळारी म्हणून जबाबदारी आली. त्यातूनच पुढे ‘इंडियन प्रेस’ची स्थापना झाली.

सुरुवातीच्या काळात सकाळी नोकरी करून सायंकाळी छापखान्यात जाणे असा चिंतामणी घोष यांचा दिनक्रम असे. त्यावेळच्या परिस्थितीत संघर्ष करत त्यांनी नेटाने आणि जोमाने व्यवसाय पुढे नेला. रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘गीतांजली’ची छपाई प्रथम त्यांनीच केली. टागोर यांनी हे काम  सात दिवसांत पूर्ण करण्याची जबाबदारी घोष यांच्यावर सोपवली होती. त्यांनी अहोरात्र काम करत पाच दिवसांतच गुरुदेवांच्या हाती पुस्तक सोपवल्याचे लेखिकेने नमूद केले. यातून त्यांची कामाबाबतची निष्ठा दिसून येते. त्या काळातील तंत्रज्ञानाचा स्तर पाहता त्यांनी ते काम अतिशय अल्पावधीत पूर्ण केले हे निश्चित. टागोर हेदेखील घोष यांच्या कार्यतत्परतेने भारावून गेले. कष्ट उपसण्याची जिद्द ही त्यांच्या कुटुंबातच होती. त्यांचे संपूर्ण कुटुंबच उद्यमशील होते. केवळ प्रकाशन व्यवसायच नव्हे तर, मिठाई, गालिचा उद्योग, साखर कारखानदारी आणि अत्तर व्यवसायातही त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी लौकिक प्राप्त केला होता.

महावीर प्रसाद यांनी संपादित केलेले ‘सरस्वती’ नियतकालिक ‘इंडियन प्रेस’मध्ये छापले जात असे. हिंदी साहित्यात या नियतकालिकाने मोलाची भर घातली. व्यवसायाबरोबरच तत्कालीन सामाजिक स्थितीची चिंतामणी घोष यांना उत्तम जाण होती. त्यांचा त्यावेळच्या सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांशी सतत संपर्क होता. मोतीलाल नेहरू, पंडित मदनमोहन मालवीय यांच्यात घोष व्हिला येथे विविध सामाजिक विषयांवर चर्चा झडत. त्यांचे निवासस्थान हे शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांसाठी वैचारिक आदानप्रदानाचे केंद्रच झाले होते. त्याचा परिणाम कुटुंबातील लहान मुलांवर झाला. त्यांचे भावविश्व समृद्ध होत गेले. तत्कालीन एकत्रित कुटुंब पद्धतीत घरातील सौहार्दाचे वातावरण, खानपान, चित्रपट पाहतानाचे कुटुंबातील मुलांचे किस्से अशा रंजक गोष्टी बसू यांनी मांडल्या आहेत.

अलाहाबादचा कुंभमेळा म्हणजे त्यांच्यासाठी मोठी पर्वणीच असे. कुंभमेळ्यादरम्यान शहरातील वातावरण, लहान मुलांमध्ये त्याबाबतची उत्सुकता आणि घरातील वडीलधार्‍यांनी कथन केलेले अनुभव याविषयीची वर्णने या पुस्तकात आहेत. कुंभमेळ्याच्या काळात घर पाहुण्यांनी कसे गजबजून जात असे, याचे पुस्तकातील तपशीलवार दाखलेही वाचनीय आहेत. कालीपूजा तसेच दिवाळी हे कुटुंबातील दोन महत्त्वाचे सण. त्यादरम्यान घरात किती लगबग होत असे, हे लेखिकेने सांगितले आहे.

घोष कुटुंबाने आपले विचार केवळ व्यापार उदीम वाढवण्यापुरते संकुचित ठेवले नाहीत. त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू करण्यास प्रोत्साहन दिले. तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा विचार करता ही घटना मोठी मानली पाहिजे. मेजर बमन दास बसू यांनी घोष यांच्याशी शाळेला मदत करण्याबाबत संपर्क साधला. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत शाळेची उभारणी झाली. आजही ती शाळा ज्ञानदानाचे काम करत आहे. विश्व भारती विद्यापीठासाठी निधी उभारण्यात आला. रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘चांडालिका’ या नाटकाच्या प्रयोगासाठी सभागृहच बांधले गेले. त्यामुळे अलाहबादमधील सांस्कृतिक उपक्रमांत घोष कुटुंबाचा महत्त्वाचा सहभाग होता. त्यात प्रतिष्ठेच्या ‘प्रयाग संगीत संमेलना’चाही समावेश होता. ‘इंडियन प्रेस’चा कलकत्त्यातही विस्तार झाला. चिंतामणी घोष यांनी व्यवसाय वाढविताना दातृत्व दाखवत विविध संस्थांना तर मदत केली. दिलेल्या शब्दाचे ते पक्के होते. ‘इंडियन प्रेस’साठी ते ब्रिटनहून कागद मागवीत. व्यवसाय सुरळीत असताना महायुद्धाने जागतिक स्तरावर पुरवठा साखळी विस्कळीत झाली. त्यातून कागदाचे भाव घसरले होते. मात्र त्यांनी कमी पैसे न देता जो दर पूर्वी ठरला होता तोच देऊन कागद खरेदी केला. त्यावेळी नफा किंवा तोट्याचा विचार केला नाही. यातून दिलेला शब्द महत्त्वाचा असल्याचे त्यांनी दाखवून दिले.

अशा या द्रष्ट्या व्यक्तिमत्त्वाचा पुतळा पुढे प्रयागराज येथे उभारण्यात आला. तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्याचे अनावरण केले होते. चिंतामणी घोष यांना पद्मश्री (मरणोत्तर) पुरस्काराने गौरवण्यात आले. अनेक आव्हाने असताना व्यवसाय पुढे नेत अलाहाबादच्या सांस्कृतिक परंपरेत आपल्या कृतिशील योगदानातून मोलाची भर घालणार्‍या या महान व्यक्तिमत्त्वाने देशासाठी दिलेल्या योगदानाची ही यशोगाथा आहे. ती तरुण पिढीसाठी निश्चितच आदर्शवत ठरेल.

द हाऊस द प्रेस बिल्ट
लेखिका- अंजना बसू
प्रकाशक- रूपा पब्लिकेशन्स इंडिया प्रायव्हेट लि.
पृष्ठे- १५९, किंमत- ३९५ रु.

hrishikesh.deshpande@expressindia.com