scorecardresearch

चिंतनधारा: त्यासि म्हणावा अवतार!

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भाविकाने प्रश्न केला की, ‘‘महाराज आपण अवतार कुणाला मानता?’’ त्यावर महाराज म्हणतात, ‘‘जगात अवतरणाऱ्या प्रत्येक जीवाला मी अवतार मानतो.

rashtrasant tukdoji maharaj share experience during a tour in 1949
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (संग्रहित छायाचित्र) फोटो-लोकसत्ता टीम

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भाविकाने प्रश्न केला की, ‘‘महाराज आपण अवतार कुणाला मानता?’’ त्यावर महाराज म्हणतात, ‘‘जगात अवतरणाऱ्या प्रत्येक जीवाला मी अवतार मानतो. परंतु काही अवतार स्वत:च्या पोटापाण्याचे असतात, काही अवतार आपल्या कुटुंबाचे असतात तर काही अवतार आपल्या गावाचे, प्रांताचे, देशाचे असतात. पण सर्व विश्वाला मान्य असा व सर्वाना आपलेसे करील असा अवतार जगात अद्याप यावयाचा आहे. ही सर्व सृष्टी एकाच आत्म्याचे प्रतिबिंब आहे, हे जर खरे असेल तर, असा अवतार होणे असंभव आहे, असे वाटत नाही.’’

‘‘अणुबॉम्बने मोठा परीघ नेस्तनाबूत करता येतो. ही शक्ती एका पुरुषाच्या संशोधनाने प्रकट होऊ शकते, त्याचप्रमाणे ही सर्व विश्वाची घडी मानवतेने चालविण्याइतकी शक्ती कोणत्याही व्यक्तीत असणे शक्य नाही, असे मानणे मला तरी पटत नाही. माझा विश्वास आहे की, या अनेक प्रचारकांनी जर इकडे कल वळवला, कल बदलविणारी शक्ती निसर्गात निर्माण झाली, तर ही गोष्ट अशक्य नाही, पण वास्तविक हा अद्भुत चमत्कार नसून मानवी प्रगतीची परिसीमा आहे. परंतु विद्रूप चमत्काराद्वारे जनतेत संघटना होणे व माणसाला कायमचे सुख मिळणे ही प्रकृतीची योजना नाही आणि म्हणून मागे कुणी काय चमत्कार केले आणि आजचेही चमत्कार करणारे किती लोकांना मानवी उत्कर्षांप्रत नेऊ शकतात, ही गोष्ट मला तरी अजून कळलेली नाही. सरळ, सत्यनिष्ठ जो दिसेल त्याला आपला समजणारा, दुसऱ्याची सुखदु:खे आपली समजणारा, प्रयत्नशील, निर्भय, मृत्यूलाही न भिता परजन्म व इहजन्म आपले घर- अंगण समजणारा व जगातील देवापासून तो माणसापर्यंत सर्व व्यक्तींना सारख्या भावाने पाहणाराच मी महान साधू मानतो. अशाच साधूवर माझा अखंड विश्वास राहो, अशी मी देवाला नेहमी प्रार्थना करतो.’’

rashtrasant tukdoji maharaj share experience during a tour in 1949
चिंतनधारा: चमत्कार तेथे नमस्कार
rashtra sant tukdoji maharaj massage
चिंतनधारा: पतनशील पांडित्य
rashtrasant tukdoji maharaj
चिंतनधारा : साधुसंतांनी आपले मार्ग सेवेकडे वळवावे
rashtrasant tukdoji maharaj
चिंतनधारा : श्रद्धेला वळण लावण्याची जबाबदारी

‘‘मीदेखील चमत्कार करणारा माणूस आहे, असे मानणारे हजारो लोक असतील व आहेत. परंतु हे त्यांचे अज्ञान आहे, असेच मी त्यांना सांगत आलो आहे. या पुढेही मला सरळ मनुष्य होऊ द्या म्हणजे मी कृतार्थ होईन, ही जाणीव माझ्या जवळच्या सर्व लोकांमध्ये मी निर्माण करतच असतो. त्यापैकी बरेच लोक कुणाचे तरी, कोणत्या तरी संप्रदायाचे वा कोण्यातरी चमत्कारिक बुवांचे अनुयायी असल्यामुळे त्यांचे संस्कार माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवू देत नाहीत; तरीपण माझा प्रयत्न त्यांना हे सारे समजावे, असाच आहे. अंतरंगात तत्त्व पटून रुची प्राप्त झाली व तिकडे जीवभाव वळला, अशा ईश्वत्त्वनिष्ठेसच मी साक्षात्कार समजतो. पण लोक काळाबाजारही करू शकतात, पापदृष्टीही ठेवू शकतात, असत्यही बोलू शकतात व माझ्या गुरूंनी साक्षात्कार करवून दिला, असेही म्हणू शकतात.’’ महाराज ग्रामगीतेत लिहितात-

त्यासि म्हणावा अवतार।

जो करी सज्जन-चिंता निरंतर।

दुष्ट बुद्धिचा तिरस्कार।

सदा जयासि सक्रिय।

राजेश बोबडे

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chintan dhara rashtrasant tukdoji maharaj says about avatar amy

First published on: 04-10-2023 at 02:09 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×