Premium

चिंतनधारा: प्रचारक म्हणजे वाहती गंगा!

गंगेला जसे स्मशान नि उद्यान सारखेच असते आणि तिचा खरा ओढा सागराकडे असतो, अगदी तसेच प्रचारकाचे असले पाहिजे.

tukdoji maharaj राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

धर्म असो वा शासनकर्ते, प्रत्येकालाच प्रचार व प्रचारकांची आवश्यकता असते. याचे मर्म प्रचारकांना समजून सांगताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात : आपले सेवाकार्य चुकीच्या मार्गाकडे न वळता, पवित्रतेने अखंड चालू राहावे यासाठी प्रचारकांना व उपदेशकांना आपली प्रचारात्मक भूमिकाच कायम ठेवावयास पाहिजे; लोकांना जागविणे, त्यांच्या भावना राष्ट्रीय व मानवधर्मीय विचारांनी तेवत ठेवणे, हेच त्याचे महत्कार्य आहे. गंगेला जसे स्मशान नि उद्यान सारखेच असते आणि तिचा खरा ओढा सागराकडे असतो, अगदी तसेच प्रचारकाचे असले पाहिजे. आपल्या स्वामींचा- महान सत्पुरुषांचा- सामायिक व तात्त्विक आदेश जनतेत पसरविणे; घराघरांतून ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ विचारांचा प्रचार करणे, भजन- भाषण, प्रार्थना- कीर्तन, उद्योग- व्यायाम, उत्सव- स्मृतिदिन इत्यादीतून जनतेत चांगल्या प्रवृत्तींची पेरणी करणे तसेच ज्यांची आवश्यकता असेल अशा गोष्टी हरतऱ्हेने समाजात निर्माण करण्याची खटपट करणे हेच प्रचारकांचे कर्तव्य, हाच त्यांचा धर्म वा चंदनासारखे झिजत मरणे हाच त्यांचा मोक्षमार्ग! हे आपले कर्तव्य नेटाने व जिव्हाळय़ाने पार पाडीत असता गंगेप्रमाणे स्वत: त्याला आपले आध्यात्मिक ध्येयही गाठता येईल व समाजसुधारणेच्या कार्याचा मध्यिबदू ‘नैतिकता’ हा ठेवल्याने त्याच्या कार्यात विकृतीही येणार नाही. प्रचारकांचे कर्तव्य व सामथ्र्य सांगताना महाराज म्हणतात, समाजात पुष्कळ प्रचारक असे दिसतील की ‘मोले घातले रडाया। नाही आसू आणि माया!’ परंतु नि:स्पृहपणे कार्य करणाऱ्या प्रचारकांचे मात्र असे असता उपयोगी नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यांनी आपली इतिकर्तव्यता मानवतानिष्ठ तात्त्विक दृष्टिकोनातून आजन्म सेवा करणे व स्वत:बरोबर जनतेची सर्वागीण उन्नती करण्यात आपल्या सर्व शक्ती खर्ची घालणे, यातच समजून चालले पाहिजे. प्रचारकांनी मानव हीच आपली जात, सेवा हाच आपला पक्ष, राष्ट्र हेच आपले घर व विश्वातील जनता हेच आपले दैवत समजून लोकांची मने आपल्या सत्कार्यानी भारून टाकावी आणि आपली राहणी व विचारसरणी सेवा मंडळाच्या धोरणानुसार ठेवून सर्वत्र श्रीगुरुदेवाचे शांतिसाम्राज्य पसरविण्याचा रात्रंदिवस प्रयत्न करावा. ‘‘श्रीगुरुदेव’’ या शब्दाशी सांप्रदायिकता, व्यक्तिगौरव किंवा कोणताही आकुंचित भाव न जोडता, ‘गुरुदेव ही नच व्यक्ति’ हे लक्षात ठेवून ‘‘तुझमें नही है पंथ भी, ना जात भी, ना देश भी। तू है निरामय एकरस, है व्याप्तभी अरु शेषभी’’ अशा श्रीगुरुदेवांचे आदिरूप अनुभवण्यास समर्थ व्हावे, निर्लोभवृत्तीने जनतेला जागृत व प्रगत करण्याचा असा बाणा ज्यांनी जाणून धारण केला आहे असेच लोक आजच्या गोंधळलेल्या व विनाशाकडे ओढल्या जाणाऱ्या जगात नवी ज्योत उजळून आदर्श विश्व आकारास आणू शकतील. हेच प्रचारकांचे सामथ्र्य आहे. आजचा जागतिक विचार व व्यवहार यांचा बरावाईट साचा हा पूर्वीच्या प्रचारकांनी निर्माण केलेल्या तशा प्रकारच्या संस्कारांचाच परिपाक आहे; आणि यातून रामराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरावयाचे असेल तर त्यासाठी प्रचाराद्वारे तसे वातावरण निर्माण करणे अत्यावश्यक आहे.
राजेश बोबडे

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chintan dhara rashtrasant tukdoji maharaj says while understanding the preachers amy