‘साधनेच्या दृष्टीने देव देवळात असेल, पण कार्यरूपाने तो सर्व माणसांत आहे. माणसाचे सत् (सत्त्व) हे त्याच्या प्रतिष्ठेला कारणीभूत आहे’ असा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विश्वास असल्याने सत्कार्य म्हणजे काय याची व्याख्या स्पष्ट होती : सत् म्हणजे इमानदारी. हिमालयातील तपस्वी कठोर तपश्चर्या करून जे बल मिळवितो ते सामथ्र्य एक शेतकरी शेतात इमानदारीने खपूनदेखील मिळवू शकतो आणि एक शिपाई देशाच्या सरहद्दीवर जागरूकतेने लढूनदेखील त्याच पुण्याचा धनी होऊ शकतो. उद्योगी माणसाचा देव इमानदारीच्या उद्योगात आहे. ज्याचे जे काम असेल त्याने तेच इमानदारीने करण्यात सत् आहे, भक्ती आहे. सत् हेच परमात्म्याचे स्वरूप आहे, ही भावना आज घराघरांत पोहोचविण्याची जरुरी आहे. सत् किंवा भक्ती ही बाजारात मिळू शकत नाही. देव-धर्म माणसाला दुबळे बनविण्यासाठी नाहीत. देवाचे सामथ्र्य तुमच्या कर्तव्याला जागृत करते. देशाला ज्या वेळी ज्या गोष्टींची गरज असेल त्या गोष्टींना प्रोत्साहन देणे हीच धर्माची धारणा असू शकते. पुजाऱ्याला देवळात जे महत्त्व आपण देत आलो, तेच महत्त्व गाव स्वच्छ राखणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यालादेखील आहे आणि त्याची ती प्रतिष्ठा आपण राखली पाहिजे. मनुष्याला देवत्वाकडे नेणे, निदान खराखुरा मानव बनविणे हेच खरे धर्मकार्य आहे!
धर्मकार्याबद्दलची ही सुस्पष्टता धर्मभेद फोल का आहेत, याचेही उत्तर देणारी ठरते. ‘‘जो सन्मार्गाकडे ओढला जातो त्याचे पूर्वसंस्कार फार चांगले आहेत असे मानले पाहिजे. तो कोणत्या धर्माचा, पंथ संप्रदायाचा आहे हे पाहण्याची गरज नाही. तुम्ही सर्व आपापल्या धर्माप्रमाणे चला. सत् हे सर्वच धर्माना मान्य आहे हे विसरू नका. कोणालाही धर्मान्तर करण्याची गरज नाही, गरज आहे ती धर्माचरण करण्याची, हे लक्षात ठेवा. आपला भारत देश एक विशाल बगीचा आहे. यात सर्वच प्रकारची झाडे डौलाने नांदत आहेत, फुलत आहेत. सर्व झाडे एकाच जातीची असावीत, याची आवश्यकता नाही. पण सर्वच शिस्तीत असावीत, इतरांना सुखदायक असावीत. मी कोणत्याही पक्षाचा नाही. सर्व लोक इमानदार व्हावेत, हाच माझा पक्ष आहे. सर्व लोक इमानदार होतील असे संस्कार सर्वावर, विशेषत: मुलाबाळांवर केले पाहिजेत. सर्वात सहकार्याची भावना वाढविली पाहिजे.’’
अंधभक्तीऐवजी संस्कारग्रहण, हे सूत्र ठसवताना महाराज म्हणतात, ‘‘मी अलीकडेच ऐकले की एक बुवा लोकांना शिकवीत आहे की, ‘पाप कितीही करा, पण मंत्र घेतला की उद्धार नक्की होईल!’ लोकांना असे सोयीचे पाठ देणारेच बुवा हवे आहेत. असे लोक समाजाचे शत्रू मानले पाहिजेत. असा कोणी बुवा दिसेल तर त्याची शेंडी धरून त्याला बाहेर हाकलून लावा. मनुष्य हा खराखुरा बनला पाहिजे, यासाठी आवश्यक ते जो सांगेल तोच खरा महात्मा असे मी समजतो.’’
राजेश बोबडे
