राजेश बोबडे
स्वातंत्र्यानंतर दिलेल्या एका व्याख्यानात खऱ्या सुशिक्षितांची व्याख्या करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात प्रचारमंत्र बिघडल्यामुळेच सर्व बाजूंनी भारताच्या शक्तिबुद्धीचा व पावित्र्याचा नाश झाला होता. भारतातील तेहतीस कोटी देव केवळ दगड होऊन पडले! आज त्या दगडांना देवत्व देण्याचे आपले सर्वाचे काम आहे व ते आपण धडाडीने आणि निर्लोभ वृत्तीने केले तरच भारताचा उद्धार होणार आहे! ‘सत्ते’ च्या जोरावर समाजातील अनेक रूढी मोडून काढता येतील, अनेक योजना आखून बहुजनसमाजास जागृत करता येईल, परंतु सत्तेबरोबरच किंबहुना त्याहूनही अधिक प्रमाणात ‘सेवा’ परिणामकारक होऊ शकेल! सत्तेने समाजाची घडी बदलता येईल आणि प्रचाराने समाजाची मनेच पालटून टाकता येतील. धार्मिक भावनेने भारल्या गेलेल्या खेडय़ात कायद्याच्या बडग्यापेक्षा सेवाभावनेचा प्रेमळ प्रचारच सखोल कार्य करू शकेल. हे काम आज प्रत्येक जाणत्या माणसाने केले पाहिजे. भारतातून अशिक्षितपणा अजूनही हद्दपार झाला नाही; अडाण्यांची संख्याही कमी नाही! माणसाचे हक्क, त्यांची कर्तव्ये, जीवनाचा हेतू, वागणुकीचे शास्त्र व आपली सुप्त शक्ती, यांची त्यांना कल्पना देखील नाही. त्यांच्यापैकी जे कोणी शिकून विद्वान होतात ते लागलीच एखाद्या नोकरीच्या किंवा अधिकाराच्या शोधात लागतात. मोठमोठे विद्वान आपल्या बुद्धिमत्तेने एखाद्या विशिष्ट तुकडीचे नेतृत्व स्वीकारुन पुढारी होतात व अशा स्थितीत त्यांनी शेकडो व्याख्याने दिली किंवा वाङ्मय निर्माण केले तरी त्यात निर्भेळ समाजहित क्वचितच साधले जाते. कारण समाजहितापेक्षा स्वत:चा सन्मान, सत्ता किंवा अन्य स्वार्थ त्यांच्या बुद्धीस मोहित करीत असते. शिक्षण हे इतरास ज्ञानदान करून सुधारणा घडवण्यासाठी आहे असे समजण्याऐवजी, ते इतरास तुच्छ किंवा भक्ष्य समजण्यासाठी आहे असेच समजणारे ‘सुशिक्षीत’ लोक समाजात प्रकर्षांने आढळून येतात.
मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.