राजेश बोबडे

नि:स्पृह कार्यकर्ते व प्रचारकांशिवाय कोणत्याही देशाचा, संस्थेचा विकास किंवा कार्य असंभव आहे, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मत होते. कार्यकर्ते, प्रचारकांच्या दोलायमान अवस्थेविषयी महाराज म्हणतात, ‘‘मनुष्याच्या जीवनात मार्ग दोन असू शकतात, पण लक्ष्य किंवा ध्येय हे दोन प्रकारचे असूच शकत नाही. वरवर पाहता ध्येय अनेक असल्याचे दिसत असले तरी, वास्तविक त्यातील एकच ध्येय प्रमुख असते, विशेष असते. अर्थात त्या विशेष ध्येयाला अनुसरूनच त्याचा स्वभाव घडतो. मनुष्य आपल्या स्वभावाप्रमाणेच ध्येय निवडतो. एकूण ध्येय व स्वभाव यात कुठे तरी एकत्वाचा धागा असतो आणि तसे असले तरच ते ध्येय त्या मनुष्याला साध्य होऊ शकते, मग ते बरे असो अथवा वाईट असो. ध्येय एका प्रकारचे आणि स्वभाव दुसऱ्याच जातीचा, असे असले म्हणजे जीवनात गोंधळ उत्पन्न होतो. ज्याचे लक्ष्य स्वार्थलोभी आहे तो दुसऱ्याला सुखी करण्याचे ध्येय साध्य कसा करू शकेल? ‘काखे घेऊनिया दारा, म्हणे मज संन्यासी करा’ अशी त्याची स्थिती होईल! याचे कारण असे आहे की, दोन व्यापक किंवा ठोस वस्तू एका जागेत राहू शकत नाहीत.’’

‘‘भोगविलास किंवा स्वार्थपरायणता ही अशी वस्तू आहे की लाभाने लोभ सारखा वाढतच राहतो; त्याला काहीच मर्यादा नसते आणि सेवेलासुद्धा अंत असू शकत नाही. सेवाभावी माणूस सेवेसाठी आपले सर्वस्व खर्च करतो. आपला प्राण पणाला लावून कितीही कार्य केले तरी त्याची तृप्ती म्हणून होत नाही. तेव्हा स्वार्थ आणि सेवा या दोन गोष्टींना एकाच जीवनाला पूर्णपणे व्यापता कसे येणार?’’ महाराज म्हणतात, ‘‘आजकाल कार्यकर्ते पैसा आणि सेवा यांची सरमिसळ करून दोन्ही मिळविण्याची भाषा करताना दिसतात. परमार्थ आणि स्वार्थ एकाच पात्रात घेऊन आपण खाऊ शकू, असा भ्रम कित्येकांच्या मनात गोंधळ घालतो. मनुष्य आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा इच्छितो, तद्वतच तो उन्नतिमार्ग आणि पुण्यकार्य म्हणून सेवेतही पुढे जाऊ इच्छितो. परंतु या दोन गोष्टी साधतील कशा? पैशांच्या मागे लागणारा सेवेत अपुराच राहील! सेवेचे ध्येय मुख्य ठरवून अशा व्यक्तीला आपले धनार्जनाचे ध्येय त्याच्यापुढे बळी तरी द्यावे लागेल किंवा आपल्या सेवेला व्यापाराचे स्वरूप देऊन आपले पैशाचे ध्येय तरी साध्य करावे लागेल!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘‘‘चिडिया चावल ले चली, बीच में मिली दाल। दादू दो-दो ना मिले, एक ले एक डाल।’ हे वचनच अशा वेळी नजरेपुढे ठेवल्याशिवाय भागायचे नाही! यासाठी तुम्ही देशात ज्या गोष्टीचा प्रचार करू इच्छिता, जे फळ यावे म्हणून प्रतीक्षा करता, त्याच प्रवृत्तीला कोणत्याही प्रलोभनाशिवाय प्रोत्साहन द्या! ज्यांना त्याच गोष्टी नि:स्वार्थ वृत्तीने करण्याचे मान्य असेल अशांना साहाय्य करून पुढे आणा! असे केले तर आपल्या उद्दिष्टांची पूर्तता आपण करू शकू. नाहीपेक्षा गणपती करायला गेले आणि माकड पैदा झाले, अशी गत व्हायची!’’