राजेश बोबडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लोक लोभाकरिता काय करतील याचे उदाहरण सांगताना म्हणतात, ‘‘एक जण माझ्याकडे येऊन ‘महाराज, आपण भजनपूजन करता व त्यामुळे आपण दूरदर्शी झाला असालच, म्हणून मला धन दाखवा’ म्हणाला. मी त्याला म्हणालो- ‘गडय़ा, जर असे दाखवण्याने धन दिसले असते तर मी लोकांना, चांगल्या संस्थांना मदत नसती का दिली? निदान स्वत:साठी महाल नसता का बांधला?’ तो म्हणतो, ‘तुम्हाला काय जरुरी आहे त्याची. ते आम्हा अभाग्यालाच पाहिजे.’ मी त्याला पुष्कळ समजावले, परंतु तो मानायला तयार नाही. वा रे मनुष्याचा स्वार्थ आणि लोभ! काय सांगावे या नराला? याच्यापुढे कोणत्या शहाण्याची गीता ठेवावी की हा असला लोभ सोडेल? मग तो म्हणे, ‘महाराज, काहीही करा बुवा, पण सांगा की एकदम द्रव्य कसे मिळेल?’ मी त्याला जेव्हा माणुसकीचा बोध सांगू लागलो, तेव्हा तो निराश होऊन उठून जाऊ लागला, पण त्याच्यावर परिणाम झाला नाही. मी त्याला म्हणालो, ‘बाबा, बुद्धीचा विकास कर, हाता-पायांनी कष्ट कर, नेकीने पैसा मिळव आणि जेवढा पैसा मिळेल त्यात आपली व्यवस्था कर.’ तो म्हणे, ‘नाही, तसे जर असते तर लोकांना एकदम एका दिवशी लाख लाख रुपये कसे मिळाले असते आणि मला का बरे आठच आणे?’ मी म्हणालो, ‘बाबा, ते आपापल्या बुद्धीच्या व कर्तव्याच्या जोरावर कमावत असतात.’ तो म्हणतो, ‘वा रे कर्तव्य! ते काय जास्त हातपाय हालवतात नि मी काय कष्ट कमी करतो? ते काही नाही महाराज, संतांच्या कृपेशिवाय आणि देवाच्या देणगीशिवाय काही व्हायचे नाही,’ असे म्हणून त्याने किती तरी बुवांचे खेटे घेतले, पण धन काही मिळेना! शेवटी कारखान्यात मजुरीला लागला व उदास राहून लोकांची प्रगती पाहून झुरू लागला, पण कामाची मात्र बोंब!’’ महाराज म्हणतात, ‘‘अशा लोकांची समजूत घालण्याकरिता एका दिवसाच्या प्रयत्नाने काय होणार? अशी किती तरी उदाहरणे आहेत, कारण मला याचा अनुभव माझ्या वयाच्या नवव्या वर्षांपासून तरी आहे. कारण मी वयाच्या दहाव्या वर्षीच घराच्या बाहेर पडलो आहे आणि भजनपूजनाचा नाद मला आठवत नाही एवढय़ा लहानपणापासून आहे. लोक साधूजवळ किती भावनेने (अपेक्षेने) येतात हे मला सांगवत नाही, एवढी कथा आहे ती! याचे (या अपेक्षांचे) खंडनास सुरुवात करण्यास जवळजवळ मला जेव्हापासून बाराखडी आली तेव्हापासून मी भजने लिहीत आहे. तेव्हा मला सांगा, प्रिय मित्रांनो, ही गोष्ट एवढय़ानेच भागेल काय, की आम्ही याची त्याची टीका केली की आमच्या समाजाचे कार्य आटोपले म्हणून?’’