scorecardresearch

चिंतनधारा : बुवाबाजीच्या उच्चाटनाचा मार्ग कोणता?

जे लोक  बुवाबाजीबाबत सजग असतील त्यांना गावोगाव याचा प्रचार व प्रबोधन करावे लागेल आणि त्याकरिता लोक ऐकतील असे स्थान व मार्ग योजावे लागतील.

thoughts of rashtrasant tukdoji mahara
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

राजेश बोबडे

बुवाबाजी वाढली अशी बोंब मारताना ती कुणी वाढविली, तर माणसानेच, स्वार्थी माणसाने! म्हणून तिचे उच्चाटनही मनुष्यालाच करावे लागेल, असे सांगून बुवाबाजीच्या उच्चाटनाचा सोपा मार्ग सांगताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, जे लोक  बुवाबाजीबाबत सजग असतील त्यांना गावोगाव याचा प्रचार व प्रबोधन करावे लागेल आणि त्याकरिता लोक ऐकतील असे स्थान व मार्ग योजावे लागतील. त्यांना एका ठिकाणी जमवण्याकरिता लोकांना जो आवडतो असा सर्वसाधारण मार्ग शोधावा लागेल व त्याची लोक आतुरतेने वाट पाहतील, अशी योजना आखावी लागेल. नाहीतर गोंधळासारखे लोक जमवले की बुवाचीच टिंगल व्हायची आणि फक्त टिंगल करणाऱ्यांचीच पार्टी जमावयाची. तेथील ब्रह्मज्ञान म्हणजे करमणूकच ठरेल!

असे नको असेल तर, त्याकरिता काही आस्तिक मार्गानी लोकांना बसवावे लागेल. त्यात ‘देवबिव कुछ नही’ म्हटल्याने ‘तुमभी कुछ नही फिर!’ असेही म्हणणारे काही बहादूर निघतील; त्याकरिता देवाच्या भावनेने समाज जुळवावा लागेल आणि मग त्याला आपले म्हणणे समाजाला समजेल अशा भाषेत सांगावे लागेल. ‘बंधूनो! आपण काय करावयास पाहिजे व काय करू नये,’ असे सांगताना आपण लोकांना जसे घडवू पाहतो, तशीच आपली वागणूक असेल, याकडेही लक्ष द्यावे लागेल. तरच लोक तुमच्याकडे पुढारी म्हणून पाहतील. अन्यथा ‘वा! सुंदर बोलतो, पण ती तेवढीच कला त्याला येते बुवा! एरवी त्याचा त्याग व त्याचे चरित्र मामुली माणसाप्रमाणेच आहे’ असे समजून लोक निघून जाऊ लागतील. हा प्रयोगही निष्प्रभच ठरण्याचा धोका निर्माण होईल.

हे सर्व लक्षात घेऊन आपल्याला समाजाला काय सांगायचे ते सांगावे लागेल. त्यात प्रथम साधू जगात असतात की नाही, हे सांगावे लागेल आणि जर असतात तर ते कसे असतात हेही सांगावे लागेल. तसेच त्यांच्यापासून आम्ही काय शिकावयास पाहिजे हे सांगावे लागेल. त्यात ते काय देऊ शकतात व काय देऊ शकत नाहीत, त्यांची पूजा करावी की नाही व करावी तर कशी करावी, नमस्कार कसा करावा, त्यांना भेट द्यावी तर कशी द्यावी, चोरून द्यावी की जाहीर हे सांगावे लागेल. जे आम्ही देतो त्याचा हिशेब काही असतो की नाही व त्याची विल्हेवाट योग्य रीतीने लागते की नाही, याविषयी जागरूक राहण्याची शिकवणही द्यावी लागेल. साधू कसा असतो, त्याच्यात कोणते गुण असणे अपेक्षित असते, कोणत्या निकषांची पूर्तता केली तरच तो योग्य ठरू शकतो, याचेही मार्गदर्शन करावे लागेल. ते विदेही असतात की माणसासारखे, त्यांना आम्ही श्रेष्ठ का मानावे, हे सुद्धा सांगावे लागेल. अखेर साधूंचा जगात काय फायदा आहे, भोंदूलोक त्यांचा कसा विपर्यास करतात, लोभीलोक स्वार्थासाठी खऱ्या साधूंच्याही विरोधात कसे उभे राहतात, हेही सांगावे लागेल. हा विचार समाजापुढे मांडण्याचे कार्य हाती घ्यावे लागेल, असे महाराज म्हणतात.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 00:02 IST

संबंधित बातम्या