राजेश बोबडे

क्रांतीचा मध्यबिंदू व ऐक्यसूत्राचे विवेचन करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘एकदा क्रांती झाल्यावरही तिला जसजसा काळ लोटत जातो, तसतशी समाजात विकृती होत जाते व ही विकृती झाली की एक मोठा कर्मठ पक्ष तयार होतो. तोच अनुभव घेण्याचे दिवस आजही भारतात कायम आहेत. या जगावर कोणीही आपला कायमचा ताबा ठेवू शकत नाही. कारण व्यक्ती, गाव, प्रांत व देश या सर्वाना एक ठरावीक आयुष्य असते व ते आपल्या आयुष्याच्या भरात तेव्हाच वाटेल ती क्रांती यशस्वी करू शकतात, जेव्हा त्यांचे सूत्र परस्परांशी संबंधित असते. ते जेव्हा विस्कळीत होते तेव्हा सर्वाचे जीवन कष्टी होऊन त्यातूनच फिरून क्रांतीचा उदय होतो.’’

bharat gogawale, sunil Tatkare
रायगडमध्ये तटकरे – गोगावले यांच्यात दिलजमाई
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Tarun Tejankit initiative by Loksatta to celebrate the creative achievements of the young generation
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!

‘‘आजचा तरुण क्रांतीच्या भरभराटीच्या काळातील पुढारी आहे. राष्ट्र हे त्याच्या बळावर जगवायचे आहे. त्याला या राष्ट्राला जिकडे न्यावयाचे असेल व जसे तयार करावयाचे असेल तसे ते आज होणार आहे. एवढेच की क्रांतीचे व राष्ट्राचे सूत्र सम्यकदृष्टी असलेल्या लोकांच्या हातात असेल तर ती क्रांती बरेच दिवस टिकेल आणि ते पुढारी दूरदृष्टीचे नसतील तर तेही यात संपतील व दुसरेच मार्ग निघतील. तेव्हा ही क्रांती सत्याच्या, न्यायाच्या व उज्ज्वल भारतीय संस्कृतीच्या मार्गाने डोळस वृत्तीने वाढो आणि आपल्या देशाच्या जीवनाचा मध्यबिंदू तरुणांना कळो,’’ अशी अपेक्षा व्यक्त करून महाराज म्हणतात, ‘‘आजच्या तरुणांनी तातडीने एक होऊन धर्माची व देशाची घडी एकरूपतेने बसवावी. क्रांतिसूर्याची किरणे आता घराघरांतून प्रकाशित आहेत. याचे हे लक्षण आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडून काही विधायक घडावे, अशी तळमळ आहे. अशा तळमळीने सर्व लोक जेव्हा बव्हंशाने एकत्रित येतील तेव्हाच स्वातंत्र्याची घडी स्थिर होईल.

अर्थात ती स्थिरतादेखील मध्यबिंदू ढळत नाही तोपर्यंतच राहणार हे उघड आहे. या क्रांतीच्या विजयातूनच सुखशांती उदयास येईल. जिवंत प्रचारातच क्रांतीचे सामथ्र्य आहे.’’ महाराज तरुणांना उद्देशून म्हणतात, ‘‘आजच्या जगात तुम्हाला जो क्रांतीचा ध्वज घराघरांतून उभारावयाचा आहे तो केवळ चार व्याख्याने झोडून उभारता येणार नाही. तुम्ही ज्या समाजात उभे आहात त्याचे अंतर्बाह्य स्वरूप ओळखून तुम्हाला आपला मार्ग आखला पाहिजे. समाजाच्या बुद्धीत व हृदयात परिवर्तन घडवून आणल्याशिवाय वरपांगी क्रांती करून प्रगती साधता येणार नाही व ती मूळ धरणेही शक्य नाही. समाजाच्या बुद्धीत व हृदयातच बदल करावयाचा तर तो केवळ लेख लिहून होणार नाही; त्यासाठी आदर्श प्रचारकांचीच भूमिका स्वीकारावी लागेल. समाजाला आजवर स्वार्थप्रेरित प्रचारकांनी जसे हीन बनविले, तसेच तुम्हाला त्याच मार्गाने फिरून उन्नत बनवता येईल. हे अगदी निश्चयाने समजा की जगातील घडामोडी नेहमीच प्रचारकांच्या भरवशावर चालत आल्या आहेत. कळत-नकळत जगाला बनविणे वा बिघडविणे प्रचारकांच्याच हाती असते.’’