राजेश बोबडे
गावाचा विकास म्हणजे गावास तीर्थरूप करणे होय; असे सांगून गाव सोडून तीर्थाटणास धावणाऱ्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रश्न करून म्हणतात ‘‘अरे! रिकामा कशाला फिरतोस, तुझे गावचि नाही का तीर्थ ?’’ आज खरोखरच आमच्या गावास हे तीर्थरूपत्व प्राप्त झाले आहे का ? नसल्यास आमचे कोणते प्रयत्न त्यासाठी अपुरे पडत आहेत याचा शोध घेणे आवश्यक आहे. वास्तविक पाहता ग्रामीण विकास कार्यक्रमांकडे आज सर्वाचे लक्ष आकृष्ट झाले आहे. पंचवार्षिक योजनांचे चरण आज देशात सुरू आहे. सर्वाचा भर ग्रामविकासावर आहे. सहयोगी-जीवन, ग्रामराज्य, रामराज्य, ग्रामकुटुंब आदी शब्द प्रयोगांद्वारे आम्ही आदर्श ग्रामाची अभिनव कल्पना करीत आहोत. त्यानुसार विभिन्न योजना गावात कार्यान्वित करण्यात येत आहेत. परंतु ‘‘मजे बढम्ताही गया, ज्यों-ज्यों दवा की’’ – असा कटू अनुभव आम्हास येत आहे. आमच्याजवळ योजना कमी नाहीत, योजक तर खंडीने वाढत आहेत. सर्वकाही आहे. धन आहे, सत्ताबळ आहे, मनुष्यबळ आहे, कार्यक्रम आहेत; परंतु आम्हास संकल्पित कार्यात यश मात्र येत नाही. योजनेचे खोबरे होत आहे याचे कारण काय ? हा एक प्रकारचा आमच्या भारताचा दैवदुर्विलास तर नाही ना ? कारण इतके सारे असूनही आम्हास नाईलाजाने असे म्हणण्याची पाळी येत आहे की – ‘‘कितनी हमारी मूढता, धनतो हमारे पास में, पर हम भिखारी बन गये बौधे गये परदास में। ह्ण- अशी आमची अवस्था का व्हावी? महाराज म्हणतात माझ्या मते याला एकच कारण आहे आणि ते हे की- ‘‘मोले घातले रडाया, तेथे नाही आँसू माया’’ – अशी आमची ग्रामीण विकासाच्या बाबतीत अवस्था झालेली आहे. ज्या ग्रामांचा आम्हास विकास साधावयाचा आहे, त्या गावांच्या सुख-दु:खाचा आम्हास प्रत्यक्षपणे काय अनुभव येतो? आम्ही त्याशी कितपत समरस होतो? या प्रश्नांच्या समाधानकारक उत्तरातच ग्रामीण विकासाचे कोडे सुटलेले आढळून येईल. दुर्दैवाने आमच्या डोळय़ांसमोर असे चित्र आहे की, विकास कार्यक्रम कार्यान्वित करण्याच्या बाबतीत जी उदासीनता निर्माण होते त्यात ग्रामीण जनतेच्या उपक्रमशीलतेचा अभाव नसून ज्या वैचारिक आधारावर ही उपक्रमशीलता निर्माण व्हायला हवी तिचा अभाव आहे. याकरिता सर्वप्रथम ग्रामीण मूल्य परिवर्तनाची नितांत आवश्यकता आहे. ‘ग्रामकुटुंबाची भावना’ हीच ग्रामीण विकासाची गुरुकिल्ली आहे. जोपर्यंत ही भावना खऱ्या अर्थाने उदय पावत नाही तोपर्यंत गावांचा सम्यक विकास होणे महाकठीण आहे. याकरिता ग्राम- कुटुंबाची भावना गावागावांतून निर्माण करण्याकरिता विचारवंतांनी व कार्यकर्त्यांनी आपल्या विचार-प्रचाराची गंगा गावागावांतून वाहविली पाहिजे तेव्हाच आपले गाव तीर्थस्थानासारखे होईल. म्हणूनच महाराज आपल्या भजनात म्हणतात..
‘‘अरे! रिकामा कशाला फिरतो,
तुझे गावचि नाही का तीर्थ?’’
गावी राहती गरीब उपवासी
अन्नसत्र लावितोसि काशी
हे दान नव्हे का व्यर्थ?
