चौर्‍यांयशीच्या शिलालेखाचे चित्रकथी शैलीतले वर्णन पुढे चालू ठेवत राजवाड्यांनी लिहिले, ‘मूळ शिला चौकोनी असून सध्या तिचा उजवेकडील वरचा आणि खालचा असे दोन्ही कोपरे फुटून गेलेले दिसतात. परंतु अक्षरे फुटून गेल्याचे किंवा वाक्ये तुटल्याचे काहीच चिन्ह दिसत नाही तेव्हा कदाचित सध्या जशी शिला दिसत आहे, तशीच ती पूर्वीपासून असेल, असेहि मानण्याकडे प्रवृत्ति होतेे… शिळेवरील सर्व अक्षरे सारख्या आकाराची नाहीत. काही अक्षरांचा व्यास १/८ इंच, काहींचा १/४ इंच, काहींचा १/२ इंच व काहींचा ३/४ इंच आहे. शक ११९५ (इसवी सन १२७३)पासून शक ११९९ (इसवी सन १२७७)पर्यंत पाच वर्षे जसजशी वर्गणी आली, तसतशी वर्गणीदारांची नावे खोदली गेली, त्यामुळे अक्षरांचा आकार एका सांचाचा राहिला नाही…’

शिलालेखातील मजकुराच्या भाषेबद्दलचे आपले निरीक्षण नोंदवीत राजवाड्यांनी पुढे लिहिले, ‘प्रशस्तीतील (संस्कृत) श्लोकाखेरीज शिळेवरील बाकी सर्व मजकूर तत्कालीन मराठीत आहे. ज्ञानेश्वरांनी आपली ज्ञानेश्वरी शक १२१२त (इसवी सन १२९०) लिहिली; तिच्या आधी १२ पासून १७ वर्षे ही शिला खोदली जात होती म्हणजे ज्ञानेश्वरीच्या भाषेची मापक ह्या शिलालेखाची भाषा समजणे रास्त आहे…’

या माहितीपूर्ण विवेचनानंतर राजवाड्यांनी ‘त्या’ शिलालेखावरील २९८ ओळींचे जसेच्या तसे शब्दांकन वाचकांसमोर ठेवले आणि त्या ओळींमधील मजकुराचा उलगडा व्हावा म्हणून तब्बल ४१९ संदर्भटिपाही दिल्या. त्याशिवाय आणखी १३ स्पष्टीकरणात्मक टिपणेही जोडली. त्यांचे महत्त्व समजावे म्हणून दोनच टिपणांचा इथे नमुन्यादाखल उल्लेख करतो. विठ्ठलाच्या स्तुतिपर श्लोकाच्या निमित्ताने राजवाड्यांनी लिहिले, ‘ह्यावरून स्पष्ट आहे की शक ११९५त विठोबाचे आताप्रमाणेच असंख्य भक्तजन होते. ज्ञानेश्वर व नामदेव ह्यांच्यापासून पुढे विठोबाचे माहात्म्य वाढले, असा प्रकार नाही. ११९५त ज्ञानेश्वर लहान पोर होते; ते वयांत आल्यावर विठोबाच्या असंख्य भक्तजनांत शिरले व आपल्या तपस्तेजाने भक्तशिरोमण्यांत अग्रगण्यत्व पावले. भक्तिमार्गी भक्तजनांची छाप ज्ञानमार्गी ज्ञानेश्वरावर बेमालूम बसली…’

‘चौर्‍यांयशीचा शिळा’ या नावामागे फक्त एखाद्या धनलोभी बडव्याने पसरवलेली अफवा हेच एकमेव कारण नसावे, असे गृहीत धरून राजवाड्यांनी पर्यायी कारणेहि स्पष्ट केली. त्यांनी लिहिले, ‘दुसरे कारण असे की, ह्या शिलालेखाच्या प्रारंभी शकाचा जो ११९५चा आकडा आहे, त्यातील ९५ अनभ्यस्त वाचकाला ८४ सारखे दिसतात. पाचाचा आकडा अर्धवट उमटल्यामुळे चारासारखा दिसतो व १२व्या शतकातील नवाचा आकडा सध्याच्या आठासारखा दिसतो. त्यामुळे शक ११८४ची शिळा अथवा संक्षेपाने चौर्‍यांयशीची शिळा असे नाव प्रचलित झाले. या कारणात बराच सयुक्तिकपणा दिसतो. तिसरे कारण म्हणजे शिळेवर प्रथम चौर्‍यांएशी वर्गणीदारांची नावे खोदली गेली म्हणून दगडाची तशी ख्याति झाली; परंतु एकंदर नावे पाहता ती दुपटीहूनहि जास्त आहेत, त्यामुळे हे कारण सयुक्तिक दिसत नाही’

  • आनंद हर्डीकर
    anand47.hardikar@gmail.com