ख्रिस्तोफर नोलन यांचे चाहते त्यांच्या ‘द ओडिसी’ या सिनेमाची आतुरतेने वाट बघत होते. आधीच ओडिसी हे महाकाव्य, त्यात नोलनसारखा दिग्दर्शक ते पडद्यावर कसे मांडतो ही उत्सुकता अगदी स्वाभाविक होती. २५० दशलक्ष डॉलर्स एवढं बजेट असलेला हा सिनेमा आल्यावर तो बघणं, त्याच्यावर चर्चा हे सगळं जगभर घडणं ओघानेच आलं. पण आता सिनेमापेक्षाही त्याचा अनुवाद ज्यांनी केला आहे, त्या एमिली विल्सन यांच्या प्रतिक्रियेमुळेच चर्चा जास्त रंगली आहे. होमरच्या ‘द इलियड’ आणि ‘द ओडिसी’ या दोन्ही जगप्रसिद्ध महाकाव्यांच्या इंग्रजी अनुवादासाठी एमिली विल्सन प्रसिद्ध आहेत. ‘द ओडिसी’चं इंग्रजीत भाषांतर करणार्या त्या पहिल्या महिला भाषांतरकार आहेत. त्याशिवाय त्या पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात प्राध्यापक असून अभिजात साहित्याच्या अभ्यासक म्हणून ओळखल्या जातात.
‘‘द ओडिसी’च्या भाषांतराच्या सुरुवातीला त्यांनी ओडिसियसबद्दल तो केवळ एक सैनिक नव्हता, तर ‘एक अद्भुत रणनीतीकार आणि अत्यंत चाणाक्ष माणूस’ होता असं म्हटलं आहे. त्यामुळे नोलन या व्यक्तिरेखेकडे वळले आणि पुढे हा सिनेमा घडला. पण ओडिसी हा सिनेमा पाहिल्यानंतर माझी काहीशी निराशा झाली अशी एमिली विल्सन यांची प्रतिक्रिया आहे. ‘लंडन रिव्ह्यू ऑफ बुक्स’साठी लिहिलेल्या ‘ॲन अनकॉ्प्लिलकेटेड मॅन’ या दीर्घ लेखात, त्या म्हणतात, महाकाव्याचे महानपण ज्यात आहे, त्या गोष्टी चित्रपटातून काढून टाकल्या गेल्या आहेत. नोलन यांनी माझ्या भाषांतरातील किमान पहिली ओळ तरी वाचली आहे, हे समजून मला बरं वाटलं होतं. या पटकथेचा कोणताही भाग मी लिहिला असता, तर मला लाजच वाटली असती.’’
त्यांच्या मते, ‘‘नोलनच्या ‘ओडिसी’मध्ये हे काव्य महान आहे, असं वाटतच नाही. काळ, स्मृती, इतिहास, युद्ध किंवा एखाद्या योद्ध्याचं गौरवशाली पुनरागमन यांबद्दल यात काहीही पटण्यासारखं मांडलेलं नाही. तो एका अशा ॲक्शन हिरोचा साधा सिनेमा वाटतोे, ज्याला ॲक्शन हिरो असण्याबद्दलच वाईट वाटते.’’ त्यांच्या मते नोलनने मूळच्या कथानकातील टोकदारपणा घासून गुळगुळीत केला आहे आणि पाश्चात्त्य साहित्यातील सर्वात धूर्त नायकाला एका अपराधी भावनेने ग्रासलेल्या सामान्य सैनिकात बदलले आहे. नोलन मोठ्या कल्पनांच्या अपूर्ण संचाचे तुकडे एका भोवर्यात फिरू देतो, ज्याला आपण धरून राहू शकू असा ठोस मानवी अनुभवाचा आधार नाही, असं त्या म्हणतात.
संवाद लिहिणं हे नोलनचं कामच नाही, हे यातून दिसतं, असं त्यांना वाटतं. त्या म्हणतात, ‘‘सिनेमातली भाषा सपाट आहे. अर्थात तरीही मी सिनेमा पूर्णपणे कंटाळवाणा आहे, असं म्हणणार नाही. कारण मूळ साहित्यकृतीच इतकी उत्कृष्ट आहे की ती पूर्णपणे बिघडवणं अशक्य आहे.’’
या टीकेमुळे आता हे मूळ महाकाव्य वाचलं पाहिजे, असं वाटून लोक आवर्जून जाऊन एमिली विल्सन यांचं ‘द ओडिसी’चं भाषांतर विकत आणत आहेत. त्यांच्या पुस्तकाच्या प्रती मोठ्या संख्येने विकल्या जात आहेत. एमिली यांनीच ‘लंडन रिव्ह्यू ऑफ बुक्स’मधल्या आपल्या परीक्षणात हा उल्लेख केला आहे. ‘यूएसए टुडे’नुसार, ‘लिबी’ (Libby) या ई-बुक सेवा पुरवणार्या मंचावरून हे पुस्तक घेणार्यांच्या संख्येत २१७ टक्के वाढ झाली आहे आणि स्पॉटिफायवर ‘ओडिसी’ ऑडिओबुक ऐकणार्यांच्या जागतिक संख्येत ३०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ‘ओडिसी’ने जगभरात ६४० दशलक्ष डॉलर्सहून अधिक कमाई केली असून तो व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत यशस्वी ठरला आहे. आपल्याकडे असं एखाद्याच्या पुस्तकावर आधारित सिनेमाच्या बाबतीत झालं असतं, तर त्या व्यक्तीकडून सिनेमाचं असं प्रांजळ परीक्षण आलं असतं का?
