अवनीश पाटील

विद्यापीठे ही केवळ पदव्या देणारी केंद्रे नसून ती ‘बुद्धिमत्तेची शहरे’ आहेत, ही संकल्पना मांडणारे निकोलस बी. डर्क्स हे जागतिक दर्जाचे विचारवंत आहेत. त्यांचे २०२४ मध्ये प्रकाशित झालेले ‘सिटी ऑफ इंटेलेक्ट: द युझेस अँड अब्युजेस ऑफ द युनिव्हर्सिटी’ हे पुस्तक केवळ एका प्रशासकाचे आत्मचरित्र नाही, तर उच्च शिक्षणाच्या बदलत्या प्रवाहांचा ऐतिहासिक दस्तावेज आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कलेसारख्या प्रतिष्ठित विद्यापीठांचे कुलगुरू म्हणून काम करताना त्यांना आलेले अनुभव आणि एक इतिहासकार म्हणून त्यांची दृष्टी, यांचा सुरेख संगम या ग्रंथातून उलगडतो. विशेषत: भारताशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे आणि अभ्यासाचे नाते त्यांच्या जडणघडणीत कसे महत्त्वाचे ठरले, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

निकोलस डर्क्स हे मूळचे अमेरिकी असले तरी त्यांचे भारताशी आणि विशेषत: दक्षिण भारताशी, अत्यंत जवळचे नाते आहे. त्यांच्या वडिलांना फुलब्राइट शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे डर्क्स यांचे बालपण काही काळ चेन्नई येथे गेले. त्यांचे वडील मद्रास ख्रिाश्चन कॉलेजमध्ये शिकवत असत. या काळात डर्क्स यांना भारतीय संस्कृतीची आणि इतिहासाची भुरळ पडली. विशेष म्हणजे, त्यांनी चेन्नईमध्ये असताना ‘मृदंगम’ हे दाक्षिणात्य वाद्या वाजवण्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले.

हे नाते केवळ बालपणापुरते मर्यादित राहिले नाही, तर ते त्यांच्या शैक्षणिक कारकीर्दीचा गाभा बनले. डर्क्स यांनी शिकागो विद्यापीठातून दक्षिण आशियाई इतिहासात पीएचडी मिळवली. त्यांनी तमिळनाडूतील पुदुकोट्टई या संस्थानावर आधारित ‘द हॉलो क्राउन’ हे प्रसिद्ध पुस्तक लिहिले. याशिवाय, ‘कास्ट्स ऑफ माइंड’ या त्यांच्या ग्रंथात त्यांनी ब्रिटिश वसाहतवादाने भारताची जातिव्यवस्था कशी दृढ आणि रूपांतरित केली, याचे सखोल विश्लेषण केले आहे. भारताचा इतिहास, वसाहतवाद आणि समाजशास्त्र यांचा अभ्यास करणारा एक इतिहासकार म्हणून त्यांची जागतिक ओळख निर्माण झाली.

एका व्यासंगी प्राध्यापकाचा आणि संशोधकाचा प्रशासक किंवा कुलगुरू होण्याचा प्रवास सोपा नसतो. डर्क्स यांनी कोलंबिया विद्यापीठात आर्ट्स अँड सायन्सेसचे डीन म्हणून आणि त्यानंतर २०१३ ते २०१७ या काळात यूसी बर्कलेचे कुलगुरू म्हणून काम पाहिले. त्यांच्या पुस्तकात त्यांनी या संक्रमणाचे वर्णन केले आहे. एकीकडे संशोधनात रमणारा इतिहासकार आणि दुसरीकडे विद्यापीठातील राजकारण, आर्थिक तरतुदींतील कपात आणि विद्यार्थी आंदोलने सांभाळणारा कुलगुरू अशी दुहेरी कसरत त्यांना करावी लागली.

आपल्या ग्रंथात डर्क्स यांनी बर्कले विद्यापीठातील त्यांच्या कार्यकाळातील वादळी प्रसंगांचे वर्णन केले आहे. २०१३ ते २०१७ हा काळ अमेरिकी विद्यापीठांसाठी अत्यंत अस्थिरतेचा होता. बर्कले हे १९६० च्या दशकातील ‘फ्री स्पीच मूव्हमेंट’चे माहेरघर ठरले. मात्र, डर्क्स यांच्या कार्यकाळात उजव्या विचारसरणीचे वक्ते आणि डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी यांच्यात टोकाचा संघर्ष झाला. एक इतिहासकार म्हणून डर्क्स यांना मुक्त संवादाचे महत्त्व पटत होते, परंतु एक कुलगुरू म्हणून विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि कॅम्पसमध्ये शांतता राखणे हे मोठे आव्हान होते. सरकारी निधीत होणारी कपात आणि वाढती फी यांवरून होणारी आंदोलने त्यांनी हाताळली. या वेळी त्यांनी सार्वजनिक विद्यापीठांचे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष केला.

कुलगुरू म्हणून काम करतानाही डर्क्स यांनी आपला जागतिक दृष्टिकोन सोडला नाही. कोलंबिया आणि बर्कलेमध्ये असताना त्यांनी भारताशी शैक्षणिक देवाणघेवाण वाढवण्यावर भर दिला. भारतात ‘अशोका युनिव्हर्सिटी’सारख्या नवीन खासगी विद्यापीठांच्या स्थापनेत आणि मार्गदर्शनात त्यांनी रस दाखवला. भारतात उच्च शिक्षण अनेकदा केवळ अभियांत्रिकी, वैद्याकीय किंवा व्यवसाय यापुरते मर्यादित मानले जाते. डर्क्स यांनी भारतीय शिक्षण पद्धतीत कला, समाजशास्त्र आणि विज्ञान यांच्या एकत्रित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या मते, भारतीय विद्यार्थ्यांनी केवळ तांत्रिक कौशल्ये न शिकता, चिकित्सक विचार आणि जागतिक भानही आत्मसात केले पाहिजे.

बर्कले विद्यापीठाचा अनुभव सांगताना डर्क्स धोक्याची घंटा वाजवतात की, विद्यापीठांमधील वाढता राजकीय हस्तक्षेप आणि शासकीय निधीची वानवा गुणवत्तेसाठी घातक ठरू शकते. याशिवाय, २१व्या शतकातील आव्हाने पेलण्यासाठी ज्ञानशाखांमधील भिंती पाडून आंतरशाखीय दृष्टिकोन स्वीकारणे आणि आयआयटीसारख्या संस्थांनी परदेशी विद्यापीठांसाठी केवळ ‘फीडर स्कूल्स’ न राहता स्वत: जागतिक दर्जाची संशोधन केंद्रे म्हणून पुढे आणणे काळाची गरज आहे, असा हा ग्रंथ ठामपणे सांगतो. सरतेशेवटी, विद्यापीठे ही लोकशाही मूल्यांचे रक्षण करणारी आणि मुक्त संवादाची बौद्धिक शहरे बनावीत, हाच या पुस्तकाचा मुख्य संदेश आहे.

avnishpatil@gmail.com

सिटी ऑफ इंटलेक्ट

लेखक – निकोलस बी. डर्क्स

प्रकाशक – केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस

पृष्ठे – ३५८ किंमत – ३०८३ रु.