ज्येष्ठ अभिनेते अतुल कुलकर्णी यांचा ‘द कॉक्रोच मोमेंट’ हा लेख वाचला. मुळात अण्णा चळवळ ही राजकीय हेतू आणि सत्ता मिळवण्यासाठी कशी होती आज त्या आंदोलनात भाग घेतलेल्या लोकांनी कबूल केलेलं आहे.‘किती लोकपाल नियुक्त केले आहेत’ किंवा ‘लोकपाल ही संस्था किती सक्रिय आहे’ हे प्रश्न खुद्द हजारे किंवा ‘आप’ कोणीही विचारत नाही. त्यामुळे त्या आंदोलनाचा संदर्भ आणि कॉजपाची तुलना करण्याची गरज नाही.

आज बरीच विचारवंत, कलाकार मंडळी कॉजपाला मैदानांत उतरण्याचे सल्ले देताहेत. मात्र आज जमिनीवरचे वास्तव भयाण आहे. शेतकरी आंदोलनात (२०२०-२१) किती शेतकरी मरण पावले, डॉ संग्राम पाटील यांनी जेव्हा व्यवस्थेला प्रश्न विचारले तेव्हा त्यांच्यावर केस करून किती कोर्टाच्या फेर्‍या माराव्या लागल्या, हे विसरून चालणार नाही. आज एक विरोधी मोर्चा काढायचा म्हणजे किती धोकादायक आणि जिकिरीचे झाले आहे ते आज मैदानात उतरणार्‍या कार्यकर्त्यांना ठाऊक आहे.. चिन्मयी सुमित, प्राजक्त हनमघर आणि खूप कमी कलाकार सोडले किती कलाकार विधायक कामासाठी रस्त्यावर उतरायला तयार आहेत? शिवाय, भारतातही भारतातही MeToo, FarmersProtest सारख्या हॅशटॅग्सनी प्रत्यक्ष राजकीय दबाव निर्माण केला. त्यामुळे ऑनलाइन आंदोलनाला कमी लेखणे योग्य नाही.

मागच्या पिढीने ‘भावनेत वाहून जाऊ नका’ हे सांगताना स्वत:च्या पिढीच्या political romanticism कडे थोडे कमीच पाहिले आहे. ‘कॉजपा’साठी जमिनीवर उतरवता येतील अशा ठोस कृतींची यादी त्यांनी तयार करून द्यावी.

लेखात व्यक्त केलेली भीती निश्चितच खरी आणि समजण्यासारखी आहे. राज्यसत्तेकडून होणारी प्रतिक्रिया, पाळत ठेवण्याची यंत्रणा, ऑनलाइन अभिव्यक्तीवर नियंत्रण आणि कथानकावर पकड ठेवण्याचे प्रयत्न हे वास्तव आहेत. पण हाच अनुभव आजच्या तरुणांना अधिक राजकीयदृष्ट्या जागरूक आणि सजग बनवत आहे. ‘थोडं शांत राहा, आधी मजबूत संघटनात्मक रचना उभी करा’ हा सल्ला व्यवहार्य आणि योग्य असू शकतो; मात्र ‘जेन झी’तल्या अनेकांना असे वाटते की व्यवस्था अनेकदा अशी रचना उभी करण्यासाठी आवश्यक तेवढी मोकळीकच देत नाही.

मला असे वाटते की निष्कर्ष काढण्याची घाई करू नये..कारण कॉजपा काही अण्णा आंदोलनासारखी राजकीय हेतूने केलेली चळवळ नाही. ‘जेन झी’ कडे डिजिटल नेटवर्किंग, वैचारिक स्पष्टता आणि जागतिक दृष्टिकोन आहे. ही पिढी फक्त ‘फॉलो’ करून थांबत नाही, तर क्राउडफंडिंग, डिजिटल मोहिमा, फॅक्ट-चेकिंग यांचा वापर करून प्रत्यक्ष बदल घडवते.

– मयुर कोठावळे, पवई (मुंबई)

हेच निवडून कसे येतात?

सीजेपी (कॉक्रोच जनता पार्टी) या आभासी पक्षाने चार-पाच दिवसांतच दोन कोटींवर पाठीराखे मिळवून समाजमाध्यमांवरील लोकप्रियतेत सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षांनाही मागे टाकल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या. भारतात निर्माण झालेल्या या समाजमाध्यमी आंदोलनाची दखल देशविदेशातील माध्यमांना बातम्या, अग्रलेख, स्तंभ यांतून घ्यावी लागत असल्याचे बघितल्यावर एकप्रकारे झुरळाचे विश्वरूपदर्शन घडले. असंतोषातून सीजेपीला ज्या वेगाने प्रतिसाद मिळतो आहे ते पाहता, सत्ताधार्‍यांनी सत्तेचा वापर करून प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमांतून निर्माण केलेल्या खोट्या लोकप्रियतेच्या फुग्याला टाचणी लागून जनमत पूर्णपणे विरोधात असतानाही यांचे उमेदवार निवडून कसे येतात, अशी शंका निर्माण होते. जनमत विरोधात असल्यामुळेच निवडणुका येनकेन प्रकारेण जिंकण्यासाठी निवडणूक आयोग, तपास यंत्रणा, न्यायव्यवस्थेचा गैरवापर होत असल्याबाबत विरोधक वारंवार करत असलेल्या आरोपांनाही पुष्टी मिळते.

– किशोर बाजीराव थोरात, नाशिक

निवडणुका इन्स्टाग्रामवर होत नाहीत!

‘झुरळझोंबी!’ हे शनिवारचे संपादकीय (२३ मे) वाचले; पण केवळ एका राष्ट्रीय पक्षाला फॉलोअर्सच्या संख्येत मागे टाकले म्हणून ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने खूप काही मोठे केले असे नाही. निवडणुका इंस्टाग्राम वर होत नाहीत त्यासाठी तळागाळापर्यंत संपर्क आवश्यक असतो. बर्‍याच ‘सोशल मीडिया स्टार’नी आपले नशीब निवडणुकीत अजमावले आहे आणि पुष्कळ जणांना पराभव चाखवा लागला आहे. त्यामुळे, हा फक्त ट्रेंड आहे! काही दिवसांनी लोक विसरतील की कोणी एकाने ‘कॉक्रोच जनता पार्टी’ स्थापली होती.

– ओमकार मुंजाजी शिंदे, परभणी</strong>

विनोद, व्यंग, टीकेतून लोकशाही…

‘झुरळझोंबी !’ हा संपादकीय लेख (२३ मे) वाचला. लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष जितका मजबूत असतो, तितकाच सक्षम आणि जागरूक विरोधी पक्ष असणे आवश्यक असते. कारण सत्तेला प्रश्न विचारणारा आवाज नसला, तर लोकशाही हळूहळू एकांगी बनू लागते. गेल्या काही वर्षांत बेरोजगारी, शिक्षणातील असमानता, भ्रष्टाचार, पेपरफुटी यांसारख्या प्रश्नांमुळे तरुणांमध्ये असंतोष वाढत गेला; पण हा असंतोष मांडण्यासाठी प्रभावी व्यासपीठ मिळत नव्हते. अशा वेळी समाजमाध्यमांवर उभा राहिलेला ‘कॉक्रोच जनता पार्टी’सारखा प्रयोग हा त्या दडपलेल्या भावनांचा उद्रेक ठरतो. या संपादकीयात ‘झुरळे’ या प्रतीकातून सामान्य तरुणांची जिद्द आणि टिकून राहण्याची वृत्ती प्रभावीपणे मांडली आहे. आजची तरुण पिढी रस्त्यावर उतरण्यापेक्षा डिजिटल माध्यमातून आपली भूमिका मांडत आहे आणि हीच नव्या प्रकारची लोकशाही चळवळ ठरत आहे. लोकशाहीत विनोद, व्यंग आणि टीका यांना स्थान असणे हे आरोग्यदायी समाजाचे लक्षण आहे. सत्तेला सतत लोकांचा वचक वाटत राहिला, तरच ती जनतेला जबाबदार राहाते. त्यामुळे हा लेख लोकशाहीतील आवश्यक संतुलनाची आठवण करून देणारा आहे.

– डॉ.दत्ता कुंटेवाड, तळा (रायगड)

‘झुरळे’ बाहेर पडणारच!

‘झुरळझोंबी!’ हे संपादकीय (२३ मे) वाचले. आर्थिक विषमता, बेरोजगारी, आत्महत्या याला सरकार जबाबदार आहे. पण सरकार यावर काही बोलायला तयार नाही. उलट, आज सत्ताधार्‍यांच्या विरोधात कोणी काही बोलले तर त्याला तुरुंगात टाकले जात आहे. सरकार देशातील बेरोजगारी तरुणांच्या प्रश्नावर जर तोडगा काढत नसेल तर देशातील बेरोजगार ‘झुरळे’ बाहेर पडणारच.

– लक्ष्मण डोलारे, सावरगांव (धाराशिव)

प्रत्यक्ष बदलाची मागणी

देशात आज जिकडे तिकडे अपारदर्शक कारभार आणि कधीही उघड न होणारा भ्रष्टाचार यांची अनागोंदी दिसते. सामान्य माणसाच्या मूलभूत गरजाही सहज पूर्ण होत नाहीत. रोजगारासाठी युवकांची धावपळ सुरू आहे, पण स्थैर्य नाही. शिक्षण महाग झाले आहे; आरोग्य सेवा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे लोकांचे जीवन अधिकच कठीण झाले आहे. अनेक ठिकाणी इंधनासाठी रांगा लागतात, पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. आजची तरुणाई केवळ घोषणांनी समाधानी राहणारी नाही; ती प्रत्यक्ष बदलाची मागणी करत आहे. ही पिढी वेगळ्या प्रकारचे जगण्याचे स्वप्न पाहाते. जात, धर्म, पंथ, भाषा या जुनाट चौकटींपलीकडे जाऊन अधिक समताधिष्ठित, मानवतावादी आणि वैश्विक समाजव्यवस्था निर्माण करण्याची आकांक्षा त्यांच्या मनात आहे. या आकांक्षेला शब्द देण्याचे आणि समाजातल्या अंधारावर प्रकाश टाकण्याचे काम ‘झुरळझोंबी’सारख्या संपादकीयाने केले आहे.

– प्रा. प्रियदर्शन भवरे, जालना</strong>

संविधानानुसारच वागा…

‘झुरळझोंबी!’ हे शनिवारचे संपादकीय वाचल्यावर स्पष्ट दिसून येते की आपल्या समाजात गेली अनेक वर्षे असंतोष दडपला गेला होता. पण तरीही वाटते की, शेजारच्या देशात घडले तसे काहीही विपरीत आपल्याकडे- सुजाण सुदृढ लोकशाही मुरलेल्या भारतासारख्या देशात- कधीही घडणार नाही. सरकारने व जनतेने आपापली कामे सचोटीनेच केली पाहिजेत तरच ते फायदेशीर होईल. कोणत्याही पक्षाचे सरकार असो त्यांनी भारतीय संविधानानुसार जनतेच्या हक्क आणि कर्तव्यांची यथायोग्य काळजी करून स्वातंत्र्य समता आणि समानता, बंधुता कायम ठेवून देशाचे हित जपण्यासाठी सतत झटणारे असलेच पाहिजे. नाही तर जनताच नवीन मार्ग निवडते. देशाला अहिंसक मार्गाचा इतिहास आहे. जनता कायम जागरूक असली पाहिजे हेच देशाच्या हिताचे आहे.

– कबीर चंदनशिवे, डोंबिवली