‘कोण हे विद्यानंद बापट. यांना तर पुण्याच्या गल्लीतले कुत्रेही ओळखत नाहीत. यांना आता दाखवूनच द्यायचे पक्ष काय आहे ते. अशी भाषा वापरणे बंद करत असाल तरच मी प्रबोधन करायला तयार आहे.’ वरिष्ठांच्या सूचनेवरून शहर विभागातील कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांचा अभ्यास वर्ग घेण्यासाठी आलेल्या एका ज्येष्ठ व जुन्याजाणत्या नेत्याने हे वाक्य उच्चारताच बैठकीत सन्नाटा पसरला. सभागृह वातानुकूलित असूनही गॉगल लावून बसलेल्या प्रमुखांसह अनेकांनी ते डोळ्यावरून काढत कपाळावर सरकवले. यामुळे सुखावलेले ज्येष्ठ परत बोलू लागले.

‘गेल्या १२ वर्षांत सत्तेच्या मदतीने तुम्ही पक्षाचा नुसता संघटनात्मक विस्तार केला, पण वैचारिक विस्ताराचे काय? एक साधा, सरळ पण स्पष्ट व वैचारिक भूमिका घेणारा बापट तुम्हाला नडू शकतो. त्यावरून तुमची यथेच्छ खिल्ली उडवली जाते, हे चांगले लक्षण कसे समजायचे?’ यासरशी एक कार्यकर्ता पटकन उभा राहात म्हणाला ‘अहो, तो फारच अगम्य बोलतो. परवा आमच्या आवाजाला गर्दभ ध्वनी म्हणाला. मुळात ते गदर्भ आहे. आपलेच नेते विधिमंडळात तसे म्हणाले होते. असे चुकीचे शब्द वापरणार्‍याचा समाचार घ्यायचा नाही तर आणखी काय करायचे?’ ऐकून सर्वांनी टाळ्या वाजवल्या. तसे ज्येष्ठ चिडले.

‘अरे टाळ्या कसल्या वाजवता मूर्खासारखे. त्याने वापरलेला गर्दभ हाच शब्द योग्य. त्याने तुमच्या आवाजाला गाढवाच्या आवाजाची उपमा दिली हेही तुम्हाला कळत नसेल तर कठीण आहे. तो स्वत:च्या आवाजाला हंसध्वनी म्हणाला. हा शास्त्रीय संगीतातला एक राग आहे. कसे रे तुम्ही विद्येच्या माहेरघरातले कार्यकर्ते?’ ऐकून शांतता पसरली. ती भेदत दुसरा उभा राहिला व म्हणाला ‘तो बापट असल्यामुळे आमची गोची झालीय. नाही तर केव्हाच त्याला दिमागी नक्षल ठरवले असते. त्याला ‘डीजे नक्षल’ म्हणायचे का?’ यावर ज्येष्ठ जवळजवळ संतापलेच.

‘तुमच्या डोक्यात डीजेचा आवाज म्हणजे धर्माचा आवाज असे समीकरण फिट बसले आहे. हा आवाज जेवढा वाढेल तेवढा धर्मप्रसार होईल ही तुमची समजूतही चुकीची. अरे, आम्ही मोठ्या कष्टाने वाढवलेला पक्ष तुम्ही कुठे घेऊन चाललात? सत्तेच्या उन्मादात तुम्ही वैचारिक प्रतिवादाचे शस्त्रच त्यागले. त्यामुळे तुमचे हसे व्हायला लागले. जंतर-मंतरनंतर तर अधिक वेगाने. येता-जाता पुराणातले दाखले देता, मात्र त्यात नेमके काय नमूद आहे ते वाचतसुद्धा नाही तुम्ही.’ हे ऐकून पुन्हा शांतता पसरली. मग तिसरा उठला. ‘अहो पण तो धार्मिक असण्याला मानसिक स्लखन म्हणाला.’ यावर ज्येष्ठांचा पारा चढला. ‘अरे बाबा तो शब्द स्खलन आहे, स्लखन नाही. पुण्यात राहून साधे मराठी येत नाही तुम्हाला. ती त्याची भूमिका असेल.

तुम्ही धार्मिक असणे कसे योग्य ते पटवून द्या ना त्याला. निघतो एखादा बापट वेगळा. त्याचा धसका घेण्यापेक्षा त्याचे मुद्दे खोडून काढा ना! तुमची अशी फजिती होत राहिली तर बापट मोठा होईल व तुम्ही लहान.’ हे ऐकून उपस्थितांमध्ये चुळबुळ सुरू झाली. मग शहराचे प्रमुखच उभे राहिले. ‘तुमचा मान राखून एकच सांगतो. विषावर उतारा विषाचाच एवढेच आम्हाला ठाऊक आहे. त्यामुळे आम्ही नारायणपेठेत जाऊन त्या बापटाच्या घरासमोर सलग दहा दिवस डीजे वाजवणार. बघा तो कसा रत्नागिरीला पळून जातो ते.’ हे ऐकून ज्येष्ठांनी कपाळावर हात मारला व पुन्हा कधीही या प्रबोधनाच्या भानगडीत पडायचे नाही असे पुटपुटत ते तिथून बाहेर पडले.