अतुल सुलाखे

तेलंगणाहून विनोबा पवनारला परत आले. त्यांच्यासमोर भूदानाच्या रूपाने सामाजिक समत्वाचा नवा मार्ग विस्तारला होता. साम्ययोगाचे आर्थिक आणि सामाजिक रूप भूदानातून गवसेल याची विनोबांना पूर्ण खात्री होती. साम्यवाद्यांचा विरोध नव्हे तर साम्ययोगाची प्रस्थापना हे त्यांचे ध्येय होते. शत्रूवर प्रेम करून त्याची दुष्ट बुद्धी नष्ट करणारी समाजरचना साम्ययोगाशिवाय उभी राहणार नव्हती.

Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप
japan, a peaceful country, export weapons of mass destruction
विश्लेषण: शांत, युद्धविरोधी जपानकडून विध्वंसक शस्त्रे निर्यात पुन्हा का सुरू होतेय?

अशातच पहिली पंचवार्षिक योजना जाहीर झाली. शासनव्यवस्था जनतेला दिलासा देणार नाही याची विनोबांची खात्री झाली. सरकारला शेतीपेक्षा उद्योगांची निर्मिती अधिक महत्त्वाची होती. खेडय़ांना उपेक्षित ठेवून या देशाचा विकास होणार नाही ही गांधीजी आणि विनोबा या दोहोंची विचारसरणी होती. त्यामुळे साहजिकच विनोबांचा अपेक्षाभंग झाला.

विनोबांची नाराजी नेहरूंपर्यंत पोहोचली. नियोजन मंडळासमोर आपले विचार ठेवण्यासाठी विनोबांना दिल्लीला येण्याचे निमंत्रण नेहरूंनी दिले. विनोबांनी ते स्वीकारले पण दिल्लीला पायी येणार असल्याचा आपला निश्चय कळवला. १२ सप्टेंबर १९५१ रोजी विनोबा दिल्लीच्या दिशेने मार्गस्थ झाले. पायी जाण्याचे मुख्य कारण भूदान होते. प्रत्येक ठिकाणी काही तेलंगणसारखी परिस्थिती नव्हती. त्यांच्या दृष्टीने भूदान म्हणजे केवळ जमीन देण्या-घेण्याचा कार्यक्रम नव्हता तर तो अिहसक क्रांतीचा मार्ग होता. गांधीजींच्या पश्चात अवघ्या तीनच वर्षांत अिहसात्मक क्रांतीच्या चक्राला विनोबा गती देत होते.

या पदयात्रेत ते लोकांशी संवाद साधत. भूदानाचे तत्त्वज्ञान लोकांना अगदी सोप्या भाषेत सांगत. ‘सूर्य घरोघर जातो त्याचा प्रकाश राजाला मिळतो तितकाच सफाई कर्मचाऱ्यालाही. परमेश्वर आपल्या वस्तूंची कधी विषम वाटणी करत नाही. त्याने हवा, पाणी, प्रकाश आणि आकाश यांच्या वाटणीत भेदभाव केला नाही. मग जमीनच तेवढी मोजक्या लोकांच्या हाती राहावी असे तो कसे करील? म्हणून मला वाटते की तुम्ही तुमच्या जमिनीवरील मालकी सोडायला हवी.’

विनोबांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. तेलंगणच्या यात्रेत विनोबांना रोज सरासरी २०० एकर जमीन मिळाली होती. दिल्ली यात्रेत हा आकडा सरासरी ३०० एकरांचा होता. खरे तर यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नव्हते आणि नाही. कारण इथल्या जनतेने नेत्यांचा शब्द कधी खाली पडू दिला नाही. धन हवे धन. जीव हवा जीव, पण ही गुलामी नको अशी त्यांची स्वातंत्र्यलढय़ातील धारणा होती.आता विनोबा सुराज्यासाठी जमीन मागत होते. आपल्याकडून जमीन घेऊन हा माणूस स्वार्थासाठी ती वापरणार नाही. तिचे फेरवाटप करून या समाजाचे हितच करेल हे लोकांना नव्याने सांगण्याची गरज नव्हती. त्यामुळे भूदानाला गती येणार हे उघड होते.

श्रद्धा आणि बुद्धी यांच्या ऐक्यातून समाजरचनेचे भव्य रूप नजरेसमोर ठेवून जीवन वेचणे हा सत्पुरुषांचा स्वभाव असतो. माउलींना ‘ब्रह्मविद्येचा सुकाळु’ करायचा होता. नामदेवांना प्रेमस्थापना करायची होती. नाथ जबाबदार समाजाचे स्वप्न पाहात होते. तुकोबा अखिल विश्वात साम्यस्थापना कशी होईल हे पाहात होते तर समर्थाना आनंदवनभुवन हवे होते. याचप्रमाणे, विनोबांना समग्र साम्ययोग जागवायचा होता.

jayjagat24 @gmail.com