महेश सरलष्कर

रायपूरमध्ये फेब्रुवारीत होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनातील ठराव उदयपूरमधील राहुल गांधींच्या एककल्ली विचारांपेक्षा वेगळा असला तर, विरोधकांच्या एकजुटीचे दार किलकिले तरी होऊ शकते..

Rameshwaram Cafe Bomb Blast Case
रामेश्वर कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणाच्या सूत्रधारासह एकाला अटक; एनआयएची मोठी कारवाई
Maharangoli of bharadhana at Godaghat to welcome the new year
नववर्ष स्वागतासाठी गोदाघाटावर भरडधान्याची महारांगोळी, सोमवारी युध्दकलेचे प्रात्यक्षिक
63 year old woman duped of rs 80 lakh after threatened with ed name zws
ईडीची धमकी देत ज्येष्ठ नागरिक महिलेची ८० लाखांची फसवणूक, सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल- वाचा काय प्रकार आहे … 
An attempt was made to perform black magic in the graveyard by tying photos of girls in Sangli
सांगली: मुलींचे फोटो गाठोड्यात बांधून स्मशानभूमीत करणीचा अघोरी प्रकार

‘भारत जोडो’ यात्रा आणखी पंधरा दिवसांनी संपेल. त्यानंतर काँग्रेसमधील वातावरण थंड झाले तर, या यात्रेचा कोणताही राजकीय लाभ मिळणार नाही. त्यामुळे या पुढील यात्रा वा मोहिमा राजकीयच असाव्या लागतील. ‘भारत जोडो’देखील राजकीय यात्रा होती; पण काँग्रेसने जाणीपूर्वक तिला बिगरराजकीय ठरवले. कदाचित काँग्रेसलाच ‘भारत जोडो’च्या राजकीय यशाबद्दल शंका असेल. गेल्या आठ-दहा वर्षांत वेगवेगळय़ा टप्प्यांवर राहुल गांधींना अपयश सहन करावे लागले होते. ‘भारत जोडो’ यात्रेतील ते इतर यात्रेकरूंपैकी एक असल्याचे सांगितले जात असले तरी, ही यात्रा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काश्मीपर्यंत जाणार आहे. यात्रा अपयशी झाली असती तर, ते राहुल गांधींचे अपयश मानले गेले असते. त्यामुळे ‘भारत जोडो’ यात्रेबाबत काँग्रेसने सावध पवित्रा घेतला, राहुल गांधींसमोर एक प्रकारे ढाल उभी करण्याची दक्षता घेतलेली दिसली. पंजाबमध्ये पोहोचलेली ही यात्रा अपेक्षेपेक्षा यशस्वी झालेली आहे, हे मान्य केले पाहिजे. वेगवेगळय़ा राज्यांमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी यात्रेसाठी पैसै खर्च केले असतील, पक्षाच्या कार्यकर्त्यांना जमवले असेल, कदाचित गर्दी झालेली दाखवलीही असेल; पण अशा दीर्घ पल्ल्याच्या यात्रेमध्ये उत्साही वातावरण सातत्याने ‘मॅनेज’ करता येत नसते. या यात्रेला लोकांनी दिलेल्या प्रतिसादामध्ये थोडा तरी तथ्यांश असणार. राहुल गांधींसाठी सार्वजनिक आयुष्यातील हे पहिले यश म्हणता येईल. या यात्रेला बदनाम करण्यात भाजप कमी पडला, सर्व प्रकारच्या ट्रोलला ही यात्रा पुरून उरली, हेही दिसून आले.

‘भारत जोडो’ यात्रेद्वारे काँग्रेसने महत्त्वाचा टप्पा पार केला असे मानता येईल. पण या देशव्यापी यात्रेमुळे संघटनेमध्ये खूप मोठी ऊर्जा निर्माण होईल आणि पक्ष हनुमान उडी घेईल अशी अपेक्षा काँग्रेसच्या केंद्रातील नेत्यांनीही बाळगली नव्हती. राज्या-राज्यांतून यात्रा पुढे गेल्यावर ‘मागचे सपाट’ होण्याची शक्यता होती. आंध्र प्रदेश वा उत्तर प्रदेशमध्ये तीन दिवसांच्या यात्रेमुळे काँग्रेसची संघटना मजबूत सोडा, पायावरदेखील उभी राहू शकणार नव्हती. प्रादेशिक स्तरावर नेत्यांमध्ये भांडणे सुरूच राहतील. पण यात्रेमुळे कार्यकर्त्यांना नवी उमेद मिळाली, याचा अनुभव पक्षाच्या केंद्रीय नेत्यांना तरी आलेला आहे. भाजपविरोधातील लढाई समान पातळीवर लढली जात नाही. ही लढाई लढायची असेल तर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली पाहिजे आणि भाजपविरोधात लढू शकतो, हा आत्मविश्वास दिला पाहिजे, हे पक्षाच्या दिल्लीकर नेत्यांना समजले असल्याचे त्यांच्याशी झालेल्या अनौपचारिक चर्चातून कळू शकते. तरीही काँग्रेसच्या मुख्यालयात राष्ट्रीय महासचिवांची उपस्थिती कमी असते. तिथे पक्षाध्यक्षांची गैरहजेरी जाणवत राहते. मुख्यालयात नेते दिसले तर कार्यकर्ते दिसतील. ‘भाजपच्या मुख्यालयात तरी कुठे कोण नेते दिसतात’, असे कोणी म्हणू शकेल. पण, भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका सातत्याने होत असतात. अजेंडय़ांचा पाठपुरावा केला जातो, तो ब्लॉक स्तरापर्यंत पोहोचला की नाही याची खात्री करून घेतली जाते. काँग्रेसमध्ये वातावरणनिर्मिती झाली तर पुढे सर्व काही करणे शक्य होईल. म्हणजेच काँग्रेसच्या पुढील यात्रा वा मोहिमा राजकीय असाव्या लागतील.

राज्याराज्यांतील यात्रा

बिहार, ओदिशा, पश्चिम बंगाल अशा वेगवेगळय़ा राज्यांमध्ये ‘भारत जोडो’ला समांतर यात्रा काढल्या जात आहेत. कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना केंद्रीय नेतृत्वाकडून राजकीय कार्यक्रम द्यावा लागतो. २०१९च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसने कार्यकर्त्यांना कार्यक्रमच दिलेला नव्हता. ‘भारत जोडो’नंतर राज्या-राज्यांतील यात्रा कार्यकर्त्यांना व्यग्र ठेवतील. ‘भारत जोडो’ यात्रेमुळे राजकीय पक्षांशी निगडित नसलेल्या नागरी समाजातील लोक काँग्रेसकडे आकृष्ट झाले. या यात्रेकडून एवढेच अपेक्षित होते. आता पुढच्या टप्प्यात पक्षातील ब्लॉक स्तरावरील कार्यकर्त्यांला राजकीय कामात गुंतवावे लागेल, त्यांना राजकीय संदेश द्यावा लागेल. हा हेतू कदाचित पुढील दोन महिने चालणाऱ्या ‘हाथ से हाथ जोडो’ मोहिमेतून होईल. ही मोहीम ‘भारत जोडो’ यात्रेचा पुढचा टप्पा असेल. या मोहिमेतून काँग्रेसच्या पक्षबांधणीला आणि राजकीय प्रचाराला सुरुवात होईल असे दिसते. राहुल गांधींच्या खुल्या पत्रामधून काँग्रेसचा राजकीय अजेंडा स्पष्ट होतो. ‘भारत जोडो’ यात्रेचे सार या पत्रामध्ये आलेले आहे. काँग्रेसचे माध्यम विभागप्रमुख जयराम रमेश यांनी पत्रकार परिषद घेऊन हे पत्र प्रसारमाध्यमांसमोर मांडले. त्यांचे म्हणणे होते की, ‘भारत जोडो’ यात्रेतून राजकीय संदेश देण्याचा काँग्रेसने प्रयत्न केला नाही. यात्रेचे स्वरूप बिगरराजकीय आणि सामाजिक राहिले. पण, आता मात्र काँग्रेस यात्रेतील संदेश राजकीय स्वरूपात मांडेल. भाषा राजकीय असेल, निवडणुकीच्या लढाईची असेल! म्हणजेच ‘हाथ से हाथ जोडो’ ही २६ जानेवारीपासून दोन महिने चालणारी मोहीम प्रामुख्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी असेल.

 ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये भाजपच्या राजकारणाला प्रत्यक्ष प्रत्युत्तर दिले गेले नाही. यात्रेचा तो उद्देशही नव्हता. ‘हिंसेच्या, द्वेषाच्या आणि विभाजनवादी राजकारणाला आम्ही विरोध करत आहोत, आमचे म्हणणे पटत असेल तर आमच्या यात्रेत तुम्ही सहभागी व्हा,’ असे काँग्रेसने लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला होता. ‘तुम्हाला भाजपविरोधात ताकद उभी करायची असेल तर आम्ही पाठिंबा देऊ’, असे काँग्रेसने अप्रत्यक्ष सांगितले. पण ही काही निवडणुकीच्या राजकारणाची भाषा नव्हे. त्यासाठी थेट राजकीय प्रश्न मांडावे लागतात. कदाचित दोन महिन्यांच्या मोहिमेत राजकीय मुद्दे काँग्रेसकडून ऐरणीवर आणले जातील. त्यासाठी काँग्रेसला कार्यकर्त्यांना कामाला लावावे लागेल.

काँग्रेसची ही राजकीय मोहीम सुरू असताना फेब्रुवारीमध्ये पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन होईल. इथे संमत होणारा राजकीय ठराव आगामी लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचा अजेंडा असेल. हा ठराव उदयपूरमधील राहुल गांधींच्या एककल्ली विचारांपेक्षा वेगळा असला तर, विरोधकांच्या एकजुटीचा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे. उदयपूरमध्ये राहुल गांधींनी प्रादेशिक पक्षांवर धारदार टीका केली होती, या पक्षांकडे वैचारिक स्पष्टता नाही, ते राष्ट्रीय राजकारण करू शकत नाही. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने विरोधी एकजुटीचे केंद्र फक्त काँग्रेसच असू शकेल, असे राहुल गांधींचे म्हणणे होते. काँग्रेसच्या या कडव्या भूमिकेमुळे प्रादेशिक पक्ष लांब जात असल्याचे दिसले. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव  ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झाले नाहीत. पण, दिल्लीमध्ये दोन आठवडय़ांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी आपली भूमिका मवाळ केलेली दिसली. बिगरभाजप पक्षांनी केवळ भाजपला विरोध करून फायदा होणार नाही. पर्यायी अजेंडा लोकांपुढे मांडला तर प्रतिसाद मिळेल, असे राहुल गांधी म्हणाले. तो पर्यायी अजेंडा काय असेल, हे अजून स्पष्ट झालेले नाही. पण, काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे फक्त काँग्रेसने पर्यायी अजेंडा तयार करून चालणार नाही, तो इतर विरोधी पक्ष स्वीकारणार नाहीत. बिगरभाजप पक्षांनी एकत्रितपणे पर्यायी अजेंडा तयार करावा लागेल. राहुल गांधींनी एक प्रकारे प्रादेशिक पक्षांच्या एकजुटीसाठी सांधा जुळवून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसला. या नव्या तडजोडीच्या भूमिकेचे प्रतििबब पक्षाच्या रायपूरमध्ये होणाऱ्या अधिवेशनात पडलेले दिसू शकेल. ‘भारत जोडो’ यात्रेनंतर पुढील टप्प्यामध्ये काँग्रेस निवडणुकीच्या राजकारणासाठी मोहिमेवर जात असेल तर, वेगवेगळय़ा समाजासाठी काँग्रेस काय देणार हे सांगावे लागेल. भाजपच्या ओबीसी राजकारणाला काँग्रेस कसे उत्तर देणार? दलितांपुढे काय ठेवणार? मुस्लीम अनुनयाच्या भाजपच्या आरोपाला कसे तोंड देणार? मोजक्या बडय़ा उद्योजकांच्या मक्तेदारीला विरोध करताना ठोस आर्थिक धोरण लोकांसमोर ठेवणार का? अशा अनेक अवघड प्रश्नांची उत्तरे काँग्रेसला लोक आकर्षित होऊ शकतील इतक्या सोप्या राजकीय भाषेत द्यावी लागतील. बाकी, भाजपविरोधात ट्रोलधाडीशी वेगळा संघर्ष करत राहावे लागेलच.

mahesh.sarlashkar@expressindia.com