एकीकडे महिला सक्षमीकरणाची, महिलांचा सन्मान करण्याची भाषा राजकीय व्यासपीठांवरून करत नेते मंडळीच महिलांचा अपमान कसा करतात, हे चित्र पुन्हा समोर आले आहे. त्या संदर्भातील महाराष्ट्र आणि तमिळनाडू या तुलनेत सुसंस्कृत, प्रगत मानल्या जाणार्या राज्यांमध्ये नुकत्याच घडलेल्या दोन घटना पाहता ही नेते मंडळी सभ्यपणाचे मुखवटे घालून वावरत असतात की काय, असे वाटावे. पहिली घटना राज्यातील. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरील एका सोशल मीडिया पोस्टमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उल्लेख ‘गुंगी गुडिया’ असा केला. बीडमधील कायदा-सुव्यवस्थेवर एका पत्रकाराने सुनेत्रा पवार यांना विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी किंवा तिथे उपस्थित नेत्यांनी उत्तर न दिल्याचा संदर्भ या टीकेला होता. हे कमी म्हणून की काय, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या टीकेचे समर्थन केले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसने केलेल्या टिप्पणीनंतर संतप्त झालेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रदेश काँग्रेस मुख्यालय, ठाणे व पुण्यातील काँग्रेस कार्यालयात गोंधळ घातला.
वास्तविक काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरोधात भाजपची नेते मंडळी गेली अनेक वर्षे अत्यंत वाईट शब्दांमध्ये शेरेबाजी करत आली आहेत. काँग्रेस नेतेही सोनियांच्या अपमानावरून भाजप नेत्यांना नेहमीच लक्ष्य करतात. साहजिकच सुनेत्रा पवारांबाबत असे घडताच सपकाळ यांनी दिलगिरी व्यक्त करीत वाद मिटवणे आवश्यक होते. पण त्यांनी तसे न करता उलट समर्थनच केले. अशा वर्तनाबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सपकाळ यांचे कान टोचले ते बरेच झाले. आपल्या पक्षाचे काय चालले आहे, त्यावर काम करायचा, पक्ष वाढवायचा प्रयत्न करण्याऐवजी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना उपमुख्यमंत्रीपदावर असलेल्या स्त्रीवर आपल्याच पक्षाकडून झालेल्या ‘गुंगी गुडिया’ या टिप्पणीचे समर्थन करून नेमके काय साधायचे आहे? १९६६ मध्ये ज्येष्ठ समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या संदर्भात ‘गुंगी गुडिया’ हे शब्द वापरले होते. आपल्या पंतप्रधानपदाच्या सुरुवातीच्या काळात इंदिरा गांधी फारशा प्रभावी वाटत नव्हत्या, असा संदर्भ त्याला होता. तेव्हा लोहियांवरही टीका झाली होती. पण पुढे जाऊन आपले नेतृत्व किती कणखर आहे, हे इंदिरा गांधींनी सगळ्या जगाला दाखवून दिले. बांगलादेशची निर्मिती, बँकांचे राष्ट्रीयीकरण, काँग्रेसला जनाधार मिळवून देणे यातून इंदिरा गांधी यांनी या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले होते. शिवाय फारसे न बोलणारे नेते कर्तृत्ववान असतात आणि बडबड करणारे पोकळ निघतात, हेदेखील देशाने अनेक वेळा पाहिले आहे. भारतासारख्या देशात पुरुषप्रधान संस्कृतीची अनेक दडपणे पेलत एखादी स्त्री सार्वजनिक अवकाशात वावरायला लागते, पदांबर बसते, तेव्हा असे शब्द हे तिला नामोहरम करण्याचेच शस्त्र असते. जो पक्ष त्यातून गेला आहे, त्याने तरी ते न वापरण्याचे भान बाळगणे अपेक्षित होते. पण काँग्रेसचे हे भान सुटले, ही त्या पक्षासाठी निश्चितच नामुष्कीची गोष्ट आहे.
हीच बाब तमिळनाडूमध्येही घडली. तमिळनाडूत माजी उपमुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांनी चित्रपट अभिनेत्री त्रिशा यांच्यावर अश्लील शेरेबाजी केली. उदयनिधी यांना ताबडतोब त्यांच्या निवासस्थानातून थेट पोलीस ठाण्यात नेण्यात आले. याविरोधात द्रमुकचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. उदयनिधी स्टॅलिन यांनीही आपण काही चुकीचे वक्तव्य केलेले नाही, असाच दावा केला.
पण अभिनेत्री त्रिशा यांची मुख्यमंत्री विजय यांच्याशी जुनी व्यावसायिक मैत्री आहे. त्या मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. त्यांचा राजकारणाशी थेट काहीही संबंध नाही. असे असताना तमिळनाडूतील राजकीय पक्ष सतत अभिनेत्री त्रिशा यांचा टीकेसाठी वापर करण्याचा प्रयत्न करतात. खरे तर सार्वजनिक क्षेत्रात वावरणार्या व्यक्तीचे वैयक्तिक आयुष्य ही त्याची खासगी बाब असते. त्याबद्दल माहिती आहे, म्हणून एखाद्या शस्त्रासारखा त्या माहितीचा वापर करणे हे नीतिमत्तेला अजिबात धरून नाही. या दोन्ही प्रकरणांमध्येही ्त्रिरयांचा असा राजकीय वापर करताना राजकीय नैतिकता गुंडाळून खुंटीवर टांगून ठेवण्यात आली. लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण मिळून ्त्रिरयांचा राजकीय पटलावरील वावर वाढेल, तो दिवस काही दूर नाही. तेव्हा त्यांना कशाकशाला तोंड द्यावे लागणार आहे, याची ही चुणूकमात्र आहे, एवढे खरे.
