scorecardresearch

उलटा चष्मा: उर्फीच्या ऊर्मी..

संस्कृतिरक्षणाचा वसा घेतलेल्या चित्राताईंशी वाद सुरू झाल्याने उर्फीला एवढा आनंद झाला की अख्ख्या कॉलनीभर तिने बर्फी वाटली.

उलटा चष्मा: उर्फीच्या ऊर्मी..
उर्फी जावेद आणि चित्रा वाघ वाद

संस्कृतिरक्षणाचा वसा घेतलेल्या चित्राताईंशी वाद सुरू झाल्याने उर्फीला एवढा आनंद झाला की अख्ख्या कॉलनीभर तिने बर्फी वाटली. ‘अडकल्या एकदाच्या जाळय़ात’ असे स्वत:शीच म्हणत उर्फीने आनंदाने एक गिरकी घेतली. आपल्या वागण्यावर ताईंचा कंपू व्यक्त व्हावा, त्यातून वाद गाजू लागावा यासाठी कित्ती प्रयत्न केले पण छे:! मधल्या काळात ते एमपीचे एक मंत्री बोलते झाले पण त्याचा काय फायदा? शेवटी इंडस्ट्री तर मुंबईत आहे ना! वादंग इथेच हवे, तरच त्याचा फायदा. आता बघा कसे झरझर ‘टॉप’ला पोहोचता येईल, असा विचार मनात येताच तिला काल स्वत:हून घरी आलेल्या चार फॅशन डिझायनरांची भेट आठवली. एकेकाने तोकडय़ा कपडय़ांचे काय मस्त डिझाइन्स करून आणले होते, त्यातला एक ड्रेस तर अगदी वपर्यंत जात गाल झाकणारा होता. अगदी त्याच रंगाचा. पातळ आणि मुलायम. समजा ताईंना थोबाडीत मारण्याची संधी मिळालीच तर गालावर वळाऐवजी कमळाचे फूल उमटेल असा. वाद शिगेला पोहोचताना दिसला की तोच ड्रेस घालून सोशल मीडियावर व्यक्त व्हायचे. ताईंऐवजी स्वत:च स्वत:ला थोबाडून घेत कुणी कसेही वागले तरी मी कसा प्रेमाचा पुरस्कार करते हे दाखवून द्यायचे असे उर्फीने मनाशी ठरवून टाकले.

आणखी वाचा – Open Letter: चित्राताई वाघ, उर्फीवर कारवाई करण्यास एवढा उशिराचा मुहूर्त का?

मोबाइलमधले मेसेज पाहून तर खूशच झाली. मर्फी कंपनीने त्यांचे बंद पडलेले रेडिओचे उत्पादन पुन्हा सुरू करतानाच तिची आगामी वर्षभरातली वेशभूषा प्रायोजित करण्याचा निर्णय कळवला होता. शिवाय ‘उर्फी के साथ मर्फी’ अशा आशयाच्या जाहिराती मुंबईवर लावण्याचे ठरवले होते. दुसरा मेसेज ‘बिग बॉस’च्या निर्मात्याचा होता. अशा वादंगातूनच प्रगतीची दारे मोकळी होत जातात तेव्हा कोणत्याही ऑफरला नकार द्यायचा नाही हे तिने ठरवून टाकले. कपडे तोकडे चालतील पण ताईंशी वाद घालताना भाषेत तोकडेपणा येऊ द्यायचा नाही. ती सभ्यच असायला हवी तरच आम्ही ‘स्त्री स्वातंत्र्याची पुरस्कर्ती या नात्याने तुझ्या पाठीशी ठामपणे उभे राहू’ हा एका पुरोगामी दिग्दर्शकाने दिलेला निरोप तिला आठवला व मनातल्या शिव्या जाहीरपणे व्यक्त न करण्यातच शहाणपणा आहे यावर तिच्या मनाने शिक्कामोर्तब केले. वेगवेगळे कपडे घालून बघण्याची प्रॅक्टिस करत असताना तिला एकदम सुचले. ताई अचानक आपल्यामागे का लागल्या असतील? खरे तर त्यांचे काम पक्षाचे महिला संघटन वाढवण्याचे. त्यातही त्यांच्या प्रतिस्पर्धी सुषमाताई, रुपालीताईंसारख्या तगडय़ा. तरीही का बरे वळवला असेल आपल्याकडे मोर्चा? उत्तर सापडेना, तशी तिने ट्विटरवर ताईंचे सगळे ट्वीट पुन्हा एकदा वाचले. त्यातल्या एका शब्दावर ती थबकली. ‘नंगटपणा’ याचा नेमका अर्थ काय? ताईंनी का वापरला असेल हा शब्द? शेजारच्या फ्लॅटमध्ये एक मराठी कुटुंब राहते. त्यांना विचारावे म्हणून उर्फीने बेल दाबली. दार उघडताच समोर आलेल्या काकूंनी हा शब्द उच्चारताच धाडकन् दार बंद केले!

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-01-2023 at 03:28 IST

संबंधित बातम्या