मानवाच्या उत्क्रांतीत आणि त्याच्या गुणावगुणांत जनुकीय अनुक्रम अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा अनुक्रम निश्चित करण्याच्या क्रांतिकारक प्रयोगाचे सह-नेतृत्त्व करणारे जीवशास्त्रज्ञ जॉन क्रेग व्हेंटर यांचे नुकतेच निधन झाले. हृदयरोगापासून अल्झायमर्सपर्यंत अनेक गंभीर विकारांची कारणे निश्चित करणे आणि त्यावरील उपचार शोधून काढण्याचा मार्ग त्यांच्या या प्रयोगामुळे सुकर झाला. प्रयोगाला ‘जीवनग्रंथ’ अशा शब्दांत गौरविण्यात आले, पण विज्ञानात अंतिम सत्य काहीच नसते, याचे भान असणार्‍या व्हेंटर यांनी एवढ्या मोलाच्या योगदानाचेही वर्णन, ‘आम्हाला काही प्रमाणात यश मिळाले आहे. परंतु, मानवी जिनोमचा अनुक्रम जाणून घेण्यात अद्यापही अपेक्षित प्रगती साध्य झालेली नाही. हा या जीवनग्रंथाचा पहिला खर्डा आहे,’ अशा नम्र शब्दांत केले.

सॉल्ट लेक सिटी येथे जन्मलेल्या व्हेंटर यांनी विद्यार्थीदशेतील सर्वाधिक काळ बोटीतून विहरण्यात किंवा सर्फिंग बोर्डवरून लाटांवर स्वार होण्यात घालवला. साहजिकच प्रगतिपुस्तकात नेहमीच ‘क’ आणि ‘ड’ श्रेणी मिळत असे. आपले असे वर्तन ‘अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर’चा (एडीएचडी) भाग होते, असे निरीक्षण त्यांनी मोठेपणी व्यक्त केले. स्वत:च्याच डीएनएचा अभ्यास करून ‘एडीएचडी’ला कारणीभूत ठरणारे जनुकांचे प्रकार शोधून काढले.

व्हेंटर यांना वैद्यकशास्त्राविषयी स्वारस्य निर्माण झाले ते व्हिएतनाम युद्धामुळे. त्यांना इच्छेविरोधात नौदलात ‘मेडिकल कॉर्प्समन’ म्हणून सेवा बजावणे भाग पडले. युद्धातील क्रौर्याचे त्यांच्या मनावर एवढे विपरीत परिणाम झाले की त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र यातूनच त्यांची वैद्यकशास्त्राविषयीची ओढ वाढली. ते शास्त्रज्ञ म्हणून घडले सॅन दिएगोमध्ये. १९७० च्या दशकात त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पदवी आणि फिजिओलॉजी व फार्माकोलॉजीमध्ये डॉक्टरेट मिळवली. जिनोमिक्सच्या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांचे नेतृत्व केले आणि नोबेल पारितोषिक विजेते हॅमिल्टन स्मिथ यांच्यासह अनेक मातबरांबरोबर संशोधन केले.

पुढे त्यांनी ‘सेलेरा जिनोमिक्स’ या कंपनीची स्थापना केली. १९९८ मध्ये त्यांनी ‘होल-जिनोम शॉटगन सिक्वेन्सिंग’ नावाच्या एका वेगवान नवीन तंत्राचा वापर करून मानवी जीनोमचा अनुक्रम निश्चित (जिनोम सीक्वेन्सिंग) करण्याचा एक खासगी प्रयत्न सुरू केला. त्याच वेळी ‘ह्युमन जिनोम प्रोजेक्ट’मध्येही याच स्वरूपाचे प्रयोग सुरू होते. दोन वर्षांनी व्हेंटर आणि ‘ह्युमन जिनोम प्रोजेक्ट’ने जाहीर केले की त्यांनी संयुक्तपणे जिनोमचा पहिला मसुदा तयार केला आहे- ‘जीवनग्रंथ’ म्हणून नावाजलेला प्रयोग तो हाच.

मार्च २००४मध्ये त्यांनी एक सागरी जीनोम संकलन प्रकल्प हाती घेतला. सागरी सूक्ष्मजीवांमधील आनुवंशिक वैविध्यांचे मूल्यांकन करून निसर्गाच्या मूलभूत प्रक्रियांमधील त्यांची भूमिका समजून घेणे हा या प्रकल्पाचा उद्देश होता. ४ मार्च २००४ रोजी या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. यात व्हेंटर यांनी त्यांच्या खासगी मालकीच्या नौकेतून कॅनडातील हॅलिफॅक्स येथून प्रवास सुरू केला आणि जगप्रदक्षिणा करून जानेवारी २००६ मध्ये ते अमेरिकेत परतले. त्याच वर्षी त्यांनी ‘जे. क्रेग व्हेंटर इ्स्टिटट्यूट’ या ना नफा तत्त्वावरील संस्थेची स्थापना केली. ही संस्था संश्लेषित जीवशास्त्रात (सिंथेटिक बायोलॉजी) संशोधन करते.

बुधवारी (२९ एप्रिल) ७९ व्या वर्षी त्यांचे कर्करोगामुळे निधन झाले. सत्तरीत विमान उड्डाणाचे प्रशिक्षण घेणार्‍या व्हेंटर यांनी कधीही वयाला शिक्षण, प्रशिक्षण, संशोधनात अडथळा मानले नाही. अखेरच्या टप्प्यापर्यंत ते कार्यरत होते.