अमरावतीत मुद्रणालयांची संख्या तशी खूप. आता तर या व्यवसायाचा पूर्णपणे कायापालट झाला आहे. तरीही इतिहासाची साक्ष देणारी काही अजूनही तग धरून आहेत. त्यातले एक सुभाष मुद्रणालय. स्वातंत्र्यपूर्व काळातले. तेव्हाच्या लढ्यात स्वातंत्र्यसैनिकांना मदत करणारे. डॉ. शिवाजीराव ऊर्फ दाजी पटवर्धनांची येथे उठबस. एकदा ते टांग्यात मोठमोठे गठ्ठे घेऊन आले. ते खाली उतरवल्यावर त्यांनी मुद्रणालयाच्या मालकांना आदेश दिला. कटर मशीनजवळ या. मग नंतरचे चार तास त्या मशीनचा वापर एकाच कामासाठी होत राहिला. गठ्ठ्यातून आणलेला दाजींचा तोपर्यंतचा सारा पत्रव्यवहार, छायाचित्रे व इतर महत्त्वाच्या कागदांचे बारीक बारीक तुकडे करणे. यातून तयार झालेल्या कागदाच्या ढिगाला स्वत: दाजींनीच आग लावली. मुद्रणालयाच्या बाहेर. रस्त्यावर. ‘माझ्या मागे मला कुठलाही इतिहास शिल्लक ठेवायचा नाही’ हे त्यांचे शब्द. दाजी असे होते. स्वभावाने फटकळ पण बाणा करारी. अन्यायाविरुद्ध पेटून उठायचे, मग तो कुणावरही झालेला असो. त्यांचा स्वभाव आक्रमक. त्यामुळे काँग्रेसमध्ये असताना ते समर्थक म्हणून ओळखले गेले सुभाषचंद्र बोसांचे. दाजी मूळचे कर्नाटकातले. वैद्यकशास्त्रातील पदवी मिळाल्यानंतर काही काळ ते विवेकानंदांबरोबर बेलूरच्या मठात राहिले. मग देशात गांधीयुग सुरू झाले. वध्र्याजवळचे सेवाग्राम हे त्याचे केंद्र बनले व दाजींची पावले इकडे वळली. ते विदर्भात आले व थेट अमरावती गाठली.
टिळकभक्त दादासाहेब खापर्डेंच्या विनंतीला मान देत दाजींनी बडनेर्यात दवाखाना थाटला पण नावापुरताच. त्यांचे सारे लक्ष स्वातंत्र्य चळवळीकडे. १९३० ला झालेल्या जंगल सत्याग्रहात ते पुसदला सामील झाले. कारागृहात गेले. बाहेर आल्यावर त्यांनी अमरावतीत लाठीमारासाठी सज्ज असलेला ब्रिटिश पोलीस अधिकारी नेल्सनचा घोडा अडवला. आजही अनेक जण ही आठवण सांगतात. स्वातंत्र्य मिळाले. आता काय करायचे? राजकारणात तर जायचे नाही. मग विनोबांनी त्यांना सल्ला दिला. गांधींचे अपूर्ण राहिलेले कुष्ठरोगी सेवेचे काम पुढे न्या. तोवर दत्तपूरची महारोगी सेवा समिती कार्यरत झाली होती. तिचे प्रमुख मनोहर दिवाणांच्या मदतीने दाजींनी अमरावतीत संस्था सुरू केली, केवळ चार कुष्ठरोग्यांना सोबत घेत. तपोवन तिचे नाव. आजवर आलेल्या अनेक चढ-उतारांचा सामना करत ही संस्था आज बर्यापैकी तग धरून आहे. सुरुवातीला हे कुष्ठरोग्यांचे नंदनवन उभे करायचे कुठे असा प्रश्न दाजींसमोर होता. त्यांच्या मदतीला धावले लाला जयस्वाल. त्यांनी चारशे एकर जागा एका क्षणात ‘विदर्भ महारोगी सेवा मंडळा’ला दान केली. इथून सुरू झालेला हा प्रवास आजवर थांबलेला नाही हे महत्त्वाचे. आता सुमारे बाराशे एकर जागा, वर्हाडात ठिकठिकाणी असलेली आठ उपकेंद्रे या माध्यमातून कुष्ठरोग्यांनी फुलवलेला मळा चांगलाच बहरला आहे. दाजी होते तोवर तपोवनमध्ये कुष्ठरोग्यांची प्रचंड गर्दी असे. दोन हजार कुष्ठरोगी, त्यांचे कुटुंब, बर्या झालेल्या रोग्यांच्या हाताला काम मिळावे म्हणून सुरू करण्यात आलेले अनेक उद्योग. त्यांच्या मुलांसाठी शाळा. आजही हे सारे सुरू आहे. कुष्ठरोग्यांची संख्या थोडी घटली. आता तपोवनमध्ये सहाशे लोक राहतात. इतिहासात डोकावले तर कुष्ठरोग्यांना सन्मानाने जगता यावे म्हणून दाजींनी सरकारविरोधात दिलेला लढा कधीही विसरता येण्यासारखा नाही. ते स्वभावाने थोडे तापट. जो कुणी सरकारचा प्रतिनिधी तपोवनमध्ये येई त्याला खूप सुनवायचे. वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. ते दाजींना खूप मानायचे. अमरावतीला आले की ते व रा. सू. गवई दोन तास तपोवनात जाऊन बसत. ‘जाताना कान साफ करून घेऊ, आता खूप शिव्या ऐकायच्या आहेत,’ अशी गमतीशीर आठवण गवईंनी एका लेखात नमूद करून ठेवली आहे.
वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असतानाच्या काळात दाजींचा सरकारशी संघर्ष तीव्र झाला. त्यांनी दाजींच्या मागण्यांकडे साफ दुर्लक्ष केले. अगदी त्यांच्या दोन्ही कार्यकाळांत. एकदा वसंतदादा अमरावतीला आले. त्यांच्या भेटीसाठी विश्रामगृहात गेलेल्या पद्मश्री दाजींना चक्क भेट नाकारण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या दाजींनी सर्वांसमोर खूप आकांडतांडव केले. हा वाद तेव्हा राज्यभर गाजला. ए. आर. अंतुलेंनी मात्र त्यांचा मान राखला. कुष्ठरोग्यांच्या प्रश्नांसाठी गवईंच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. यातून अनुदानवाढ झाली. १८९८ चा कुष्ठरोग्यांना असमान लेखणारा कायदा रद्द झाला. तरीही दाजी समाधानी नव्हतेच. सरकारने आणखी मदत करावी, कुष्ठरोग्यांकडून निर्मित वस्तू खरेदी कराव्यात यासाठी त्यांनी १९८२ ला विनोबांना विचारून सत्याग्रह सुरू केला. सरकार लक्ष देईना. संतापलेल्या दाजींनी संस्थेत एक ठराव केला. सरकारने संस्था ताब्यात घ्यावी व कुष्ठरोग्यांची जबाबदारी स्वीकारावी. सरकारला मुदत दिली. काहीच हालचाल न झाल्याने दाजी १९ ऑक्टोबर ८४ ला संस्थेतून बाहेर पडले. नेसत्या वस्त्रानिशी. ते तडक चांदूरला गेले व एका वकील स्नेह्याकडे राहू लागले. हीच संधी साधून सरकारने संस्थेवर प्रशासक बसवला. चांदूरला दाजी दोन वर्षे होते. १९८६ च्या मार्चमध्ये त्यांनी प्रायोपवेशन सुरू केले. ७ मे रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
तपोवन १९८४ ते २००८ अशी १९ वर्षे सरकारच्या मालकीचे होते. या काळात अनेकांनी या संस्थेच्या जमिनी बळकावल्या. कुष्ठरोगी ओरडत राहिले पण कुणी लक्ष दिले नाही. दाजी गेले पण त्यांना मानणारा मोठा वर्ग अमरावतीत तेव्हाही होता आजही आहे. प्रसिद्ध मराठे कुटुंब, ॲड. अळशी, सुभाष गवई अशी अनेक नावे संस्थेशी जोडली गेली होतीच. त्यांनी सरकारकडे पाठपुरावा सुरूच ठेवला. अखेर २००८ ला संस्था पुन्हा या दाजी समर्थकांच्या हाती आली. तोवर या नंदनवनाचे माळरान झाले होते. सुरुवातीला ॲड. अळशी अध्यक्ष झाले. नंतर दाजींच्या कन्या अनुताई वाघ काही काळ अध्यक्ष होत्या. तरीही संस्था मूळ पदावर येईना. मग सर्वानुमते सुभाष गवईंच्या हाती सूत्रे सोपवण्याचा निर्णय झाला. गवई प्राचार्य आहेत. त्यांचे लहानपण दाजींसोबत गेले. सूत्रे स्वीकारल्यावर त्यांनी जो कामाचा झपाटा सुरू केला त्यामुळे तपोवन पुन्हा उभारी घेऊ लागले आहे. अमरावतीत वर्ग दोनच्या अधिकार्यांसाठी प्रशिक्षण प्रबोधनी आहे. नुकतेच नोकरीला लागलेले अधिकारी येथे प्रशिक्षणासाठी येतात. गवईंनी या प्रशिक्षणार्थींच्या तुकड्यांना तपोवनशी जोडले. त्यातून एक अनुबंध तयार झाला. आता हेच अधिकारी शासकीय कार्यालयांत रुजू झाले की संस्थेकडे ऑर्डरी नोंदवतात. कार्यालयीन सजावटीच्या सर्व वस्तू तपोवनातील कुष्ठरोगी तयार करतात. याशिवाय चादरी, सतरंज्या, जाजम, बँडेजच्या पट्ट्या, गॉज, चपला इत्यादी. याच्या विक्रीतून होणारी उलाढाल दोन कोटींच्या घरात. गेल्या वर्षी ५५ लाख रुपये निव्वळ नफा झाला. त्यामुळे काम करणार्या कुष्ठरोग्यांचे वेतन वाढवता आले, असे गवई अभिमानाने सांगतात.
गवई संस्थेचा प्रचार, प्रसार करण्यातही अग्रेसर आहेत, त्यामुळे देणगीचा ओघही वाढला आहे. तीन वर्षांपूर्वी वर्षाला दीड लाख मिळत. आता महिन्याला साडेतीन लाख मिळतात. दाजी असतानापासून एक नियम संस्थेने केला होता. तपोवनाचा सचिव कुष्ठरोगीच हवा. त्याप्रमाणेच एका ज्येष्ठाची नेमणूक केली जाते. कुष्ठरोग्यांची मुले येथील शाळेत शिकतात. सोबत आदिवासी विद्यार्थी. त्यांच्यासाठी मोठे वसतिगृह उभारले आहे. तेथे अगदी शिस्तीत काम चालते. अमरावतीतील अनेक नामवंत या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. विदर्भात काम करणार्या सर्व कुष्ठरोगी संस्थांनी एकत्र यावे. एकाच संस्थेमार्फत सर्व सेवा प्रकल्प चालवले जावेत अशी दाजींची इच्छा होती. त्यांनी त्यासाठी बरेच प्रयत्न केले पण यश आले नाही. ही खंत ते शेवटपर्यंत बोलून दाखवत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही त्यांनी शरीर व मनातले सत्याग्रहीपण कायम ठेवले. असा सत्याग्रही विरळाच! आम्ही इंग्रजांना हाकलून लावले. मग परदेशी देणग्या कशाला घ्यायच्या म्हणत त्यांनी जगातील अनेक देणगीदारांना नकार कळवला. इतरांनी त्या सर्रास स्वीकारल्या. केवळ राजेंद्रप्रसादांच्या आग्रहामुळे त्यांनी पद्मश्री स्वीकारली. त्यांचे उर्वरित आयुष्य कुष्ठरोग्यांसाठी लढण्यातच गेले. हा रोग झाला की शरीरातल्या संवेदना संपून जातात. अगदी आगीत पाय जळला तरी कळत नाही. अशा स्थितीतील रुग्णांच्या मनातल्या संवेदनांना उभारी देण्याचे काम तपोवन आजही करत आहे.
devendra.gawande@expressindia.com
