एखाद्या सरदाराच्या नाकर्तेपणावर खापर फोडून मराठ्यांना उत्तरेतील ऐतिहासिक जबाबदारी झटकून टाकता येण्यासारखी नव्हती. ‘रघुनाथराव पुण्याला परतल्याच्या सुमारासच तिकडे पाठवण्यात आलेल्या दत्ताजीने व जनकोजीने काही काळ रजपुतान्यातील मवासांची व इतर संस्थानिकांची व्यवस्था लावण्यात खर्ची घातला. नंतर दिल्लीला जाऊन १७५९च्या जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत त्यांनी पेशव्यांच्या अपेक्षित मोहिमा अमलात आणण्यास प्रारंभ केला. पहिले काम होते, लाहोरचा बंदोबस्त करण्याचे. त्यासाठी दत्ताजी शिंदे १७५९च्या मार्चमध्ये तिकडे गेला व एप्रिलमध्ये सतलज नदीवर जाऊन पोचला. तेथून साबाजी शिंदे व त्रबिंक बापूजी या दोन सरदारांना लाहोरकडे पाठवून दत्ताजी स्वत: नजीबखानाला तंबी देण्याकरता व सुजाउद्दैल्यावर स्वारी करण्याकरता जून महिन्याच्या सुमारास कुंजपुर्‍यात आला. तेथे यमुना उतरून तो अंतर्वेदीत गेला व इटाव्याकडून नजीबखानास पायबंद घालण्याचा त्याने गोविंदपंत बुंदेल्याला हुकूम केला…’ ही माहिती सांगून राजवाड्यांनी नंतरची यशस्वी व्यूहरचना उलगडून दाखवली.

त्यांनी पुढे लिहिले, ‘१७९च्या सप्टेंबरपर्यंत अंतर्वेदीतील नजीबचा मुलूख घेऊन दत्ताजीने २२ ऑक्टोबरला शुक्रतालास गंगा नदी ओलांडली व खुद्द रोहिलखंडात प्रवेश केला. गोविंदपंत बुंदेल्यानेही याच सुमाराला गंगा उतरून जलालाबादेनजीक ठाणे दिले. वरून दत्ताजी व खालून गोविंदपंत यांच्या कचाटीत सापडल्यामुळे नजीबखानाची पुरती गाळण उडाली. तो, त्याचा मुलगा व त्याचे साथीदार-दुंदेखान, सादुल्लाखान व हाफीज रहिमत यांचा दोन-चार लढायांत पराजय झाला. नजीबखानाच्या पुलापर्यंत मराठ्यांनी रोहिल्यांचे गाव जाळले व त्या पुलाजवळच्या दोन नावा तोडून तो केवळ निरुपयोगी करून टाकला.’

ही अशी जबर तंबी मिळाल्यावर नजीबखानाने हफीज रहिमतखानाच्या द्वारे वरकरणी सलोख्याची बोलणी सुरू केली; पण आतून मात्र सुजाउद्दौल्याकडे तातडीने मदत मागितली. मराठे पुढेमागे आपलाही मुलूख बळकावणार, हे लक्षात आल्यामुळे सुजाउद्दौला रागाने दहा-बारा हजार सैनिक बरोबर घेऊन जलालाबादेला येऊन पोचला. त्या वेळी आसपासच असलेल्या गोविंदपंताने खरे म्हणजे सुजाउद्दौल्याला अटकाव करायला हवा होता, पण त्याने काहीही केले नाही. उलट सुजा नजीबच्या मदतीला येत असल्याचे समजल्यावर मराठ्यांची संख्येने खूप कमी फौज गंगेच्या अलीकडे यायला निघाली, त्या वेळी अनेक जण पाण्यात बुडून मेले, कित्येक वाहवले तर कित्येक मारले गेले. या प्रसंगाचे वर्णन करताना गोविंदपंताने खंत व्यक्त केली नाही, तर दत्ताजीची थट्टाच केली. राजवाड्यांनी त्याबद्दल साधार नोंदही केली.

‘मराठ्यांची फौज १७५९च्या नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला अशा माघारीच्या स्थितीत असतानाच बातमी आली की, अबदाली लाहोरास येऊन पोचला. १७५८ च्या मे महिन्यात रघुनाथरावाने तैमूरशहाला हाकलून दिल्यापासून अबदाली हिंदुस्थानात येणार होताच; परंतु बलुचिस्तानात नासिरजंगाने बंड केले होते, ते मोडून शिकारपूरच्या वाटेने इकडे येण्यास त्याला १७५९चा नोव्हेंबर महिना उजाडावा लागला… अबदालीच्या येण्यामुळे दत्ताजीच्या मनात नजीबखानाला पक्की तंबी पोहोचवण्याचे जे काम होते, ते तसेच ठेवून द्यावे लागले. तो लवकरच शुक्रतालास आला आणि तेथून पुढे कूच करून यमुना कुंजपुर्‍यावर उतरला, अबदालीशी टक्कर देण्याची तयारी करू लागला… त्याची आणि अबदालीची सन्निधता ७ डिसेंबरला जेमतेम दहा कोस राहिली. अशा वेळी दत्ताजीला (साथ देण्याऐवजी) गोविंदपंत येरंड्यांना भेटायला जाण्याची परवानगी मागू लागला. त्याचा राग येऊन दत्ताजी अबदालीला रेटण्यास एकटाच निघाला व गोविंदपंताला आपले कबिले, बुणगे दिल्लीकडे घेऊन जाण्यास त्याने सांगितले… दत्ताजी अबदालीची टेहळणी करत राहिला. दत्ताजीच्या व अबदालीच्या दोन-चार झटापटी होऊन २४ डिसेंबरी एक मोठे युद्ध झाले. त्यात मराठ्यांना यश आले; (परंतु ते अगदीच अल्पजीवी ठरले.) १७६० च्या जानेवारीत अबदाली अंतर्वेदीत शिरून रोहिल्याला मिळाला. तेथून त्याने दिल्लीचा रोख धरला. इकडे कुंजपुर्‍याहून दत्ताजीही दिल्लीस यमुनेच्या दक्षिणतीरी पोहोचला… १० जानेवारीला अबदालीचे व दत्ताजीचे दिल्लीजवळ बडाऊंच्या घाटी मोठे तुंबळ युद्ध झाले व त्यात मराठ्यांचा पराजय होऊन दत्ताजी शिंदे रणात राहिला (= धारातीर्थी मरण पावला)…’

– आनंद हर्डीकर