सेवाग्राम आश्रमात नेहमीची कामे सुरू होती. गांधी हजर असल्यामुळे येणार्‍या जाणार्‍यांचा राबताही मोठा होता. तेवढ्यात कुणीतरी येऊन गांधींना सांगितले. एक वृद्ध इसम शेजारच्या शेतात लपलाय. अंगावरच्या जखमांनी विव्हळतोय. बहुदा त्याला महारोग झाला असावा. तुम्हाला भेटायचे म्हणतोय. ऐकताच गांधी हातातले काम सोडून शेतात धावले. त्या इसमाला आश्रमात आणण्यात आले. तेव्हा महारोगाविषयीची भीती समाजात भरपूर. त्यामुळे आश्रमातील कुणी त्याच्याजवळ फिरकेना. मग गांधींनीच प्राथमिक उपचार सुरू केले. त्याला थोडे बरे वाटल्यावर नाव विचारले. उत्तर आले परचुरे शास्त्री! संस्कृतचा हा प्रकांड पंडित अशा बिकट अवस्थेत बघून गांधींसकट सर्वांना धक्का बसला. महारोग झाल्यावर घरच्यांनी हाकलून दिले. मग जावे कुठे असा विचार करत ते गांधी मदत करतील या आशेने सेवाग्रामला येऊन पोहोचले. नंतर परचुरेंची शुश्रूषा हेच जणू गांधींचे ध्येय झाले. त्यांच्यासाठी स्वतंत्र कुटी तयार केली गेली. (जी आजही आहे)

एकदा नेहरू, पटेल काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण हे ठरवण्यासाठी आश्रमात आलेले. दोन तास उलटून गेले तरी गांधी समोर येईनात! पटेल चिडले. मग चौकशी केली तेव्हा कळले की ते परचुरे यांच्या सेवेत आहेत. नंतर गांधी आले. आधी पुण्याचे काम, मग राजकारण असे म्हणत चर्चा सुरू केली. ओशाळलेल्या पटेलांनी त्यांची क्षमा मागितली. अस्पृश्यता मानू नका, दीनदुबळ्यांची सेवा करा, ही गांधींची शिकवण होतीच. त्यात भर पडली महारोगी म्हणजे कुष्ठरोग्यांची. यातून प्रेरणा घेतली ती विनोबा भावे व मनोहर दिवाण यांनी. त्यांनी पवनारला महारोगी सेवा समितीची स्थापना करून या रोगाच्या निर्मूलनाचे काम हाती घेतले. नंतर इंग्रजांचा जाच वाढल्यावर या समितीचे काम दत्तपूरला हलवण्यात आले. दिवाण त्याचे प्रमुख झाले. त्यांना पहिला कुष्ठरोगी मिळाला तो वध्र्याजवळच्या देवळीचा. दिवाणांनी कार्याच्या प्रारंभासाठी गांधींना बोलावले. त्याला नकार देत ते म्हणाले. ‘ही संस्था बंद करण्याची वेळ येईल तो सुदिन. तेव्हा मी आनंदाने येईन.’ हळूहळू संस्था फुलू लागली.

शंभर एकर जागेवर रुग्णालय, शाळा, बाजार, टपाल कार्यालय, ग्रामपंचायतीचा दर्जा, हजारच्या वर कुष्ठरोगी, त्यांनी फुलवलेले शेतमळे. असा साज मोडक्यातोडक्या हातापायांनी सजवला. नंतर जेपींच्या सूचनेवरून इथे काम करायला बिहारमधून रविशंकर शर्मा आले. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा या संस्थेची कीर्ती देशभर पोहोचली होती. याच दत्तपूरपासून प्रेरणा घेत बाबा आमटेंनी आनंदवन तर शिवाजी पटवर्धनांनी तपोवन सुरू केले. १९५० नंतरची ३५ वर्षे संस्थेने सुवर्णकाळ अनुभवला. दरवर्षी येथे सर्वोदय संमेलने भरायची. त्यात सारे गांधीवादी जमायचे. इंदिरा गांधी पंंतप्रधान असताना येथे मोठी कुष्ठरोग परिषद भरवण्यात आली. त्यांनीच तिचे उद्घाटन केले. उपचारासाठी आलेल्या कुष्ठरोग्यांनी बरे झाल्यावर एकतर इथेच राबायचे किंवा वध्र्यातील इतर संस्थात काम करायचे. ज्यांना हे जमत नसेल त्यांनी घेतलेल्या स्वावलंबनाच्या धड्याचा उपयोग करून स्वत:च्या गावात जाऊन स्वयंरोजगार करायचा असे संस्थेचे धोरण होते. जोवर दिवाण, शर्मा होते तोवर सारे सुरळीत होते. तेव्हा संस्थेचा भर प्रामुख्याने सरकारी अनुदानावर होता. बाबा आमटेंनी नेमके हेच टाळले. त्यांनी आनंदवनला स्वयंपूर्ण करण्यावर भर दिला. दत्तपूर इथे मागे पडले. १९८३ला दिवाणांना पद्मश्रीने सन्मानीत करण्यात आले. त्याचा मोठा उत्सव साजरा करण्यात आला. नंतर वादाचे ग्रहण लागले.

काही कुष्ठरोग्यांनी संस्थेचा कारभार अमराठी लोकांच्या हाती नको असे म्हणत शर्मांवर आक्षेप घेतला. त्यामुळे व्यथित झालेले रविशंकर व त्यांचे पुत्र अतुल तात्काळ बाहेर पडले. दिवाण व देवेंद्र गुप्तांनी ही परिस्थिती कशीबशी हाताळली. मग आयआयटीची नोकरी सोडून सेवाग्रामला आलेले करुणाकरण इथे प्रमुख झाले. काही वर्षांच्या अंतराने दिवाण व करुणाकरण दोघेही वारले. मग संस्थेची जबाबदारी पुन्हा मगन संग्रहालयाकडे आली. याच काळात काही गांधीवाद्यांच्या भोळसटपणाचा फायदा घेत उत्तर प्रदेशातून आलेला व स्वत:ला विनोबा समर्थक म्हणवणारा एक इसम संस्थेत शिरला. कुणीतरी काम करायला हवे म्हणून वध्र्यातील संस्थांनी त्यावर आक्षेप घेतला नाही. नेमकी हीच चूक नडली. या इसमाने नंतर हिंदुत्ववादी रंग दाखवण्यास सुरुवात केली. त्याला साथ मिळाली ती त्याच विचारांच्या स्थानिक नेत्यांची.

करोनाचा भर ओसरल्यावर अचानक एक दिवस या इसमाने संस्था ताब्यात घेतल्याचे जाहीर केले. जुने फलक काढून टाकले. इतर गांधीवाद्यांना आत येण्यास बंदी घातली. तगडे सुरक्षा रक्षक नेमले. त्याला साथ मिळाली ती भाजप खासदाराच्या मुलीची. अचानक बँकांनी संस्थेची खाती गोठवली. हे कुणाच्या तरी इशार्‍यावरून घडते आहे, हे लक्षात येताच देशभरातील गांधीवादी अस्वस्थ झाले. वध्र्यात आंदोलन सुरू झाले. दोन दिवस धरणे दिल्यावर मेधा पाटकरांच्या नेतृत्वाखाली सार्‍यांनी दत्तपूरला धडक दिली. तिथे हजर असलेले पोलीस संस्थेच्या पदाधिकार्‍यांनाच आत जाऊ देईनात. त्या इसमाने धर्मादाय आयुक्तांकडून नवी कार्यकारिणी मंजूर करवून आणली असा प्रशासनाचा युक्तिवाद. अखेर गांधीवादी जबरीने आत शिरले तर कुष्ठरोगी रडायलाच लागले. त्या सार्‍यांना धीर दिल्यावर मग सुरू झाला न्यायालयीन लढा.

संस्थेच्या वतीने विभा गुप्तांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाद मागितली. निकाल त्या इसमाच्या विरोधात गेला. त्यानंतर ताबा मिळवण्यासाठी त्या गेल्या तर त्या इसमाने अगदी ट्रक भरून संस्थेतील फर्निचर व रेकॉर्ड घेऊन पोबारा केला. तेव्हापासून हा इसम वध्र्यातून परांगदा झाला तो कायमचाच. नंतर काही काळ शांततेत गेला. सर्व गांधीवादी संस्थांनी एकत्र येत संस्थेची धुरा चित्तरंजन यांच्याकडे सोपवली. हे मूळचे ओडिशाचे. तेथील सरकारमध्ये उच्चपदावर असलेले. तिथली नोकरी सोडून ते इथे आले. उत्तर प्रदेशच्या इसमाचा ससेमिरा सुटला पण स्थानिक धर्मवादी हार मानायला तयार नव्हते. मग पुन्हा या संस्थेविरुद्ध नव्याने प्रकरण दाखल करण्यात आले. धर्मादाय आयुक्त व उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली. यावेळी विरोधकांनी लढण्यासाठी नवे चेहरे समोर केले. ज्यांनी कधीही कुष्ठरोग्यांची सेवा केली नाही, ज्यांचा गांधीविचाराशी कधी संबंधच आला नाही असे. मग एक दिवस अचानक चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपच्या एक नेत्या समर्थकांना घेऊन आल्या व कुष्ठरोग्यांना, कर्मचार्‍यांना हाकलून लावायला लागल्या. पोलिसांनी मध्यस्थी केली म्हणून प्रकरण मिटले.

अगदी अलीकडे मोठा फौजफाटा घेऊन जिल्हा प्रशासन व म्हाडाचे अधिकारी आले व वसाहतीसाठी जागा ताब्यात घेऊ लागले. ही जागा सरकारने दिलेली नाही. संस्थेने विकत घेतलेली आहे. अशा पद्धतीने ताबा घेऊ शकत नाही असे पटवून दिल्यावर ते परतले. मग गांधीवाद्यांचे एक शिष्टमंडळ पालकमंत्री पंकज भोयरांना भेटले. या ऐतिहासिक संस्थेचे लचके तोडू नका अशी विनंती केली. ती त्यांनी मान्य केली. दत्तपूरच्या या संस्थेजवळ असलेली ५० एकर जागा शहराला लागून आहे. विरोधक तसेच सरकारचा डोळा आहे तो यावर. यातल्या कुणालाही संस्था ताब्यात घेऊन कुष्ठरोग्यांची सेवा करायची नाही. या सेवेशी त्यांचा दूरदूरचा संबंध नाही. आता कोर्टबाजी सुरू आहे व चित्तरंजन लढत आहेत. त्यांनी पुन्हा शेती कसायला घेतली आहे. दोनशे कुष्ठरोगी त्यात राबतात. संस्थेच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत.

एका कार्यालयात गांधींनी १९४४ला संस्थेला भेट दिली तेव्हा लिहिलेले पत्र फ्रेम करून लावले आहे. गांधींचे हस्ताक्षर दिव्य. त्यामुळे ते खुर्चीवर चढून वाचावे लागते. ‘खरे महात्मा तुम्हीच’ अशा शब्दात गांधींनी त्यात मनोहर दिवाणांचा गौरव केलेला. अजूनही संस्थेवरचे संकट टळले नाही. संस्थेच्या पाठीशी उभे राहणार्‍या गांधीवाद्यांची संख्या हळूहळू कमी होत आहे, हे दुसरे संकट. सेवेचा हा समृद्ध वारसा जतन करावा असे आज कुणालाच वाटत नाही. गांधींकडून सेवेचा वारसा घेणार्‍या गांधीवाद्यांनी संस्था चालवण्यासाठी करावे लागणारे राजकारण शिकूनच घेतले नाही. त्यामुळे अशा अनेक संस्थांवर आता संकट ओढवले आहे, हेही तितकेच खरे!