‘गरबा खेळताना हृदयविकाराने मृत्यू’ या बातम्यांनी यंदाच्या नवरात्रोत्सवाला लावलेले गालबोट दु:खद खरे, पण असे का होते आहे याचा विचार करण्याची गरज आहे. विरार येथील मनीष जैन, डोंबिवलीतील ऋषभ भानुशाली, वाशिममधील गोपाल इन्नानी, तसेच सुशील काळे आणि गुजरातमधला वीरेंद्र सिंग हे पाचही तरुण गरबा खेळताना नाहक बळी गेले. कुणाचा तरी मुलगा, कुणाचा तरी भाऊ, कुणाचा तरी पती, कुणाचे तरी वडील असलेली, नवरात्र उत्सवाचा आनंद घेऊ पाहणारी ही माणसे अशा पद्धतीने नाहक जातात, तेव्हा ही गोष्ट आपल्या सार्वजनिक चारित्र्याकडे बोट दाखवणारी मानली जाणे गरजेचे आहे. सणाचा त्यातही सार्वजनिक पद्धतीने उत्सवाचा आनंद साजरा करण्याची आपली पद्धत दिवसेंदिवस जास्तीत जास्त हिडीस होत चाललेली आहे. करोना कहराच्या दोन वर्षांमध्ये गोकुळाष्टमी, सार्वजनिक गणेशोत्सव हे सण साजरे करायला मिळाले नाहीत, तर त्या दोन वर्षांच्या काळातील सार्वजनिक शांतता पुढे सुरू राहावी असे आपल्याला वाटले नाही. या वर्षी हे दोन्ही सण वाढीव जल्लोष आणि वाद्यवृंदांच्या ठणठणाटात साजरे झाले. आवाजाच्या ठरवून दिलेल्या पातळीपेक्षा कित्येक पट जास्त आवाज केला गेला. गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान वापरलेल्या लेझर किरणांमुळे कोल्हापूरमध्ये कित्येकांच्या डोळय़ांना गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त होते.

नवरात्रीदरम्यान खेळल्या जाणाऱ्या गरब्यासाठीदेखील संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत कित्येक तास मोठमोठय़ाने संगीत वाजवले जाते. आसपासची वृद्ध माणसे, तान्ही बाळे, पाळीव प्राणी यांना त्याचा त्रास होत असेल हे कित्येकांच्या गावीदेखील नसते. काही तरी साजरे करण्यासाठी कर्णकर्कश संगीत पाहिजेच ही कसली असोशी आहे? या अशा प्रचंड प्रमाणात सतत कानावर आदळणाऱ्या संगीताचा हृदयावर काही परिणाम होत असेल का? जाणकारांच्या मते गरबा ही एरोबिक्स या प्रकारातील नृत्य कसरत आहे. रोजची सवय नसेल तर ती काही मिनिटांपुरतीच करणे ठीक. पण सवय नसताना, रक्तदाब, हृदयविकार असे काही आजार आहेत का याची तपासणी केलेली नसताना अचानक उठून खूप वेळ नाचत सुटणे घातक ठरू शकते. पण जगण्यापासून मरण्यापर्यंत कोणतीच गोष्ट गांभीर्याने घेण्याची पद्धत आपल्याकडे नाही. त्यामुळेच उत्सव म्हणजे जल्लोष हे समीकरण आपल्याकडे अनेकदा उत्सव म्हणजे दु:खाचे गालबोट असे होऊन बसते. एखाद्या यात्रेजत्रेला लोक गर्दी करतात आणि तिथे चेंगराचेंगरी होते. गोकुळाष्टमीला दहीहंडी खेळताना वरच्या थरावरून पडून जिवास मुकतात किंवा कायमचे जायबंदी होतात. गणेशोत्सवात विसर्जन करताना बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडतात. दिवाळीत फटाके वाजवताना भाजण्याच्या, आग लागण्याच्या घटना घडतात. संक्रांतीदरम्यान साजऱ्या होणाऱ्या पतंगोत्सवात कुणी पतंगाच्या काटाकाटीचा आनंद मिळवतो तर या पतंगोत्सवाशी संबंध नसलेला, रस्त्यावरून जाणारा भलताच कुणी त्याच पतंगाच्या मांजामुळे गळा चिरला जाऊन मृत्युमुखी पडतो. टेम्पो किंवा बस भरून देवदर्शनाला गेले आणि वाटेत अपघातात दगावले अशा घटना सातत्याने घडताना दिसतात. ‘गरबा खेळताना हृदयविकाराने मृत्यू’ या याच मालिकेतील पुढच्या घटना. जगणे हाच अनेकपरींचा उत्सव आहे, हे जाणून ‘इव्हेन्ट’वजा उत्सवांसाठी जीव पाखडण्याची बेफिकिरी कमी झाल्यास बरे.