नैसर्गिक आपत्ती येवो वा मानवनिर्मित, दिल्ली सध्या सर्वसामान्यांच्या दृष्टीने एक अत्यंत असुरक्षित शहर बनू लागल्याचे पुरावे ठायी-ठायी आढळून येत आहेत. ताजी घटना नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरची. तेथील व्यवस्थेला लहरी हवामानाचा फटका बसला. कारण हवामानाइतकीच तेथील व्यवस्थेची तयारीदेखील लहरी होती. पण सारा दोष निसर्गाचा आहे असे म्हणून हात झटकण्याची प्रवृत्ती या घटनेबाबतही दिसून येत आहे. तेथे रविवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वार्‍यांमुळे, प्रवाशांना विमानातून चढ-उतार करण्यासाठी वापरात येणारा चाकांवरला जिना अनियंत्रित झाला आणि जवळील विमानावर जाऊन आदळला. अन्य दोन उपकरणेही अनियंत्रित झाली आणि विश्रामस्थळी उभ्या असलेल्या इतर दोन विमानांवर आदळली. या घटनेत एअर इंडियाच्या तीन विमानांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. यांतील दोन विमानांचे नुकसान तुलनेने किरकोळ असले तरी तिसर्‍या विमानाचे नुकसान मोठे असून, हे विमान आणखी काही काळ उड्डाणयोग्य राहणार नसल्याचे देखभाल-दुरुस्ती विभागाने कळवले आहे.

अशा प्रकारे विमाने नुकसानग्रस्त होण्यातून काही लाख रुपयांचे नुकसान होते. एअर इंडियासारख्या कंपनीस तर ते अजिबात परवडण्यासारखे नाही. आधीच आखाती युद्धामुळे किंवा पाकिस्तानने बंदी घातल्यामुळे तेथील हवाई हद्दींचा वापर करता येत नाही. त्यामुळे लांबचे वळण घेऊन विमाने युरोप-अमेरिकेमध्ये जात आहेत. शिवाय सध्या हवाई इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत, त्याची झळ एअर इंडिया आणि इतरही विमान कंपन्यांना बसत आहे. पण रविवारची घटना ही निव्वळ यंत्रणांच्या निष्काळजीपणातून घडलेली दिसते. अचानक आलेल्या वादळवार्‍यांची पुरेशी पूर्वकल्पना नव्हती असे दिल्ली विमानतळ व्यवस्थापनाचे म्हणणे. तशी ती दिली होती असे हवामान विभागाचे म्हणणे. ताशी ६० किलोमीटर वेगाने वारे वाहतील असा इशारा देण्यात आला होता. प्रत्यक्षात १०० किलोमीटर वेगाने वारे वाहिले. पूर्वसूचना न दिल्याबद्दल हवाई नियंत्रण विभागालाही जबाबदार धरण्यात येत आहे. विमानतळासारख्या अतिमहत्त्वाच्या ठिकाणी खरी तयारी ही अनपेक्षित घटनांचा सामना करण्यातूनच सिद्ध होते. चाकांवरला जिना वार्‍यामुळे जवळपास काही मीटर सरकत नव्हे, तर अक्षरश: दौडत गेल्याची दृश्ये समाजमाध्यमांवर प्रसृत झाली. अशा प्रकारे चाकांच्या आधारावरील उपकरणे स्थानबद्ध करण्याच्या अनेक सुविधा उपलब्ध असतात. विमानतळावर विशेषत: विमानांची ये-जा सुरू असताना अनियंत्रित, सैल वस्तूंच्या टकरीमुळे दुर्घटना होऊन हाहाकार उडू शकतो. पण देशातील दोन प्रमुख विमान कंपन्यांनी याबाबत ढिसाळपणा दाखवला. तसाच तो विमानतळ व्यवस्थापन करणार्‍या कंपनीनेही दाखवलाच.

दिल्लीतील सरकारी व्यवस्थांची बेफिकिरी दर्शवणार्‍या घटना अलीकडे दर आठवड्याला घडताना दिसून येत आहेत. दिल्ली विमानतळाचेच उदाहरण घ्यायचे झाल्यास, जानेवारीत एअर इंडियाचेच विमान उतरून मुक्कामस्थळी जात असताना धावपट्टीवर सोडून देण्यात आलेला एक खोका विमानाच्या एका इंजिनमध्ये अंतर्गत शोषणझोतामुळे खेचला जाऊन इंजिनाचे नुकसान झाले. त्यामुळे नवे कोरे महागडे विमान काही काळ उड्डाणच करू शकले नाही. अचानक बरसणारा पाऊस ही हवामान बदलाच्या काळात नवनित्य घडामोड ठरत असताना, हवामान विभाग, हवाई नियंत्रण विभाग, विमानतळ व्यवस्थापन, विमान कंपन्यांच्या अखत्यारीतील कर्मचारी वर्ग यांची तयारी आणि तत्परता मात्र गतशतकातील मानकांवरच आधारलेली असेल तर काय होऊ शकते याचे दिल्लीतील परवाची घटना हे उदाहरण ठरावे. देशाच्या प्रगतीची लायकी ही तेथील सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये तपासावी असे पु. ल. देशपांडे यांनी लिहून ठेवले आहे. त्यात आजही तथ्य आहेच. आधुनिक जगतात अशी लायकी विमानतळांतून प्रकटत असते. भारतातील विमानतळांचे पावसासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे तीनतेरा वाजल्याची उदाहरणे दिल्लीप्रमाणेच मुंबई, बंगळूरु, चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता, हैदराबाद अशा प्रमुख शहरांमध्ये दिसून आली आहेत. ‘प्रवासी विमान वाहतूक क्षेत्र वाढत चालले आहे’, ‘एकेका महानगरीत दोन-दोन विमानतळ उभे राहत आहेत’… वगैरे कौतुक मिरवून घेणार्‍या सरकारने आणि सरकारच्या स्तुतिभाटांनी दिल्ली विमानतळावरील वादळ-विचक्यासारख्या घटनांवर भाष्य करणे मात्र सातत्याने टाळलेच आहे.