योगेन्द्र यादव

‘भारत जोडो यात्रा’ ही प्रतिक्रियात्मक नसून सकारात्मक आहे, स्वशक्तीची परीक्षा घेणारी ही पदयात्रा चुकीच्या गोष्टींना सामूहिक विरोध करतानाच ऐक्याचा संदेश देते आणि ती कुणा एकाच पक्षापुरती मर्यादित राहू शकत नाही..

Dhananjay Chandrachud
‘एआय’मुळे नैतिक, कायदेशीर, व्यावहारिक प्रश्न! आधुनिक प्रक्रियांबरोबर होणाऱ्या एकत्रीकरणाकडे सरन्यायाधीशांचा इशारा
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
Constitutional ethics Prime Minister and Chief Minister A political and constitutional issue
समोरच्या बाकावरून: घटनात्मक नैतिकता पणाला..
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

फुटबॉलच्या खेळाप्रमाणेच राजकारणातही चेंडूवरचा ताबा महत्त्वाचा असतो. राजस्थान काँग्रेसमध्ये एवढी धुसफुस झाली. पण या घडामोडींचा राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’वर काहीच परिणाम झाला नाही. ती तेवढय़ाच सकारात्मकपणे पुढे चालत राहिली. ‘भारत जोडो यात्रे’मुळे निर्माण झालेला अंत:प्रवाह लोकांच्या लक्षात यायला कारणीभूत ठरले ते एक छायाचित्र. राहुल गांधी यांचे भाषण सुरू असताना मुसळधार पाऊस पडायला लागला. त्यातही राहुल गांधी तसेच भिजत आपले भाषण करत राहिले. त्यांच्यासमोर उभे असलेले हजारो लोकदेखील ते ज्या प्लास्टिकच्या खुच्र्यावर बसले होते, त्यांच्यावरून उठून त्या डोक्यावर धरून राहुल गांधी यांचे भाषण तेवढेच लक्षपूर्वक ऐकत उभे राहिले.  हे छायाचित्र विलक्षण होते. भारत जोडो यात्रा नेमकी कशी सुरू आहे, हे सांगणाऱ्या हजारो बातम्यांनी जे सांगितले त्यापेक्षाही हे छायाचित्र आणि त्यातून जाणारा संदेश अधिक बोलका होता. भारत जोडो यात्रेपेक्षाही हे छायाचित्र अधिक ‘व्हायरल’ झाले.

यातून या मोहिमेला लोकांचा जो प्रतिसाद मिळतो आहे, त्यात अगदी सूक्ष्म असा बदल झाला आहे, हे लक्षात येते. भारत जोडो यात्रेची सुरुवात अतिशय संथ झाली. ७ सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून आम्ही सुरुवात केली तेव्हा आम्हाला दुर्लक्ष, उपहास आणि शंकाकुशंकांना तोंड द्यावे लागले. मला आठवतंय ही खरोखरच पदयात्रा आहे का, आम्ही खरोखरच चालत जाणार आहोत का याचा अंदाज घेण्यासाठी मला एका वरिष्ठ पत्रकाराने फोन केला होता. ही यात्रा नेमकी कशासाठी, ती काय साध्य करणार आहे, तिचे हेतू काय आहेत याविषयी नेमकी माहिती कोणालाच नव्हती. ‘हे काँग्रेसचे नेते खरोखरच चालणार आहेत का? राहुल गांधी अधूनमधून यात्रेत सहभागी होणार असतील ना? की ते खरोखरच पूर्ण यात्राभर चालणार आहेत?’ ‘काँग्रेसची ही भारत जोडो यात्रा यशस्वी झाली तर रोड शो आणि फसली तर तमाशा असे होईल ना?’ मी भारत जोडो यात्रेला निघण्याच्या आदल्या दिवशी काही जवळचे कौटुंबिक मित्र मला भेटायला आले होते.  माझ्या या उद्योगाबद्दल त्यांना काळजी वाटत होती. ती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. ‘‘योगेंद्रजी, या यात्रेत सहभागी होऊन तुम्ही तुमची प्रतिष्ठा पणाला लावत आहात. तुम्ही काँग्रेसमध्ये सामील होणार नाही आहात हे आम्हाला माहीत आहे, पण काँग्रेसशी जोडून घेणे म्हणजे मृत्यूचे चुंबन घेणे नाही का?’’ असे ते मला विचारत होते.

सकारात्मक वातावरण

भारत जोडो यात्रा सुरू होऊन एक महिना झाला आहे. या पहिल्या महिन्यातच काही तरी बदलले आहे. हा बदल म्हणजे देशाचा बदललेला कल, मूड असे म्हणणे आततायी ठरेल. पण या यात्रेने ‘सकारात्मक’ वातावरण निर्माण केले आहे, ही प्रतिक्रिया मी सारखी ऐकतो आहे. भारत जोडो यात्रा हा केवळ एक राजकीय तमाशा का झाला नाही याची माझ्या मते सहा कारणे आहेत.

सगळय़ात पहिले कारण म्हणजे भारत जोडो ही काही केवळ प्रतिक्रियात्मक मोहीम नाही तर ती सकारात्मक आणि सक्रिय मोहीम आहे. बऱ्याच काळानंतर असे घडले आहे की राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख विरोधी पक्षाने रस्त्यावर उतरून काहीतरी कृती करायला सुरुवात केली आहे. आपला म्हणून अजेंडा पुढे न्यायचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यामुळे पहिल्यांदाच असे होते आहे की कोणीतरी आपल्या कृतीवर भारतीय जनता पक्षाला प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. भारत जोडो यात्रेच्या पहिल्या महिन्यातच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या  प्रमुखांनी मुस्लीम विचारवंतांशी संवाद साधला. बेरोजगारी, गरिबी आणि असमानता चिंताजनक असल्याचे भाष्य केले हा योगायोग अर्थातच नाही. हे मुद्दे भारत जोडो यात्रेत उपस्थित केले गेल्यानंतर हे लगेच घडले. फुटबॉलच्या खेळाप्रमाणेच राजकारणातही चेंडूवरचा ताबा महत्त्वाचा असतो, तो असा. राजस्थान काँग्रेसमध्ये एवढी धुसफूस झाली. पण या घडामोडींचा राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’वर काहीच परिणाम झाला नाही. ती तेवढय़ाच सकारात्मकपणे पुढे चालत राहिली. 

दुसरे कारण म्हणजे, ही फक्त यात्रा नाही, ती पदयात्रा आहे. पदयात्रेला आपल्याकडे तिला सखोल असा सांस्कृतिक संदर्भ आहे. त्यामुळे आपल्याकडे पदयात्रा ही एक राजकीय कृती ठरते. पदयात्रेमध्ये आत्मक्लेश असतो. आपल्या श्रद्धेची, विश्वासाची खात्री देणारे ते व्याकरण आहे. पंढरीची वारी असो, अमरनाथ यात्रा असो, नर्मदा परिक्रमा असो किंवा देशातील शेकडो सामाजिक वा राजकीय यात्रा असोत, त्या यात्रेत चालत जाणारा आणि त्यांना चालताना पाहणारा यांच्यामधली दरी त्या पदयात्रेने सांधली जाते.

एखाद्या गोष्टीत लोक स्वत: सहभागी होत नाहीत, दूरवरूनच ते पाहतात किंवा अनुभवतात तेव्हा त्यांचा त्यांच्यासाठी तो अनुभव ०००  दुसऱ्याच्या अनुभवावर आधारित असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पदयात्रा हे संवाद साधण्याचे रस्त्यावरचे माध्यम आहे. त्याचे महत्त्व, त्याची तीव्रता ते अनुभवल्याशिवाय समजू शकत नाही. तिसरे कारण म्हणजे, भारत जोडो यात्रा हा केवळ आभासी विरोध नाही. त्यासाठी तुम्हाला रस्त्यावर उतरावे लागते. स्वशक्तीचे दर्शन घडवावे लागते.  भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांना असलेल्या लोकांच्या पाठिंब्याबाबत, त्यांच्या जनमानसातील स्थानाबाबत सातत्याने दावे करत असल्यामुळे, त्यांच्या विरोधात केली जाणारी प्रत्येक कृती रस्त्यावर उतरून आपले लोकांमधले स्थान, सामर्थ्य दाखवूनच करावी लागते.

त्यांच्यावर टीका करणारा प्रत्येक टीकाकार वेगळा काढून एकटाच दाखवला जात असल्याने आपल्याला असलेला लोकांचा पाठिंबा दाखवण्यासाठी  गर्दीची गरज असते. हजारो लोक एकत्रितरीत्या रस्त्यावर येऊन पदयात्रा करतात, मोर्चा काढतात, हे विरोधामधले एक अत्यंत ताकदीचे विधान आहे. संसदेत आवाज उमटणे बद झाले की रस्त्यावर उतरून हाक देण्याशिवाय पर्याय नसतो.

चौथे कारण म्हणजे, हे केवळ गर्दी गोळा करणे नाही. भारत जोडो यात्रेला लोकांचा खरोखरच प्रतिसाद मिळतो आहे. अर्थात काँग्रेस पक्ष आणि त्याच्या नेत्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थितांची जमवाजमव केली आहे, त्यात पुढील निवडणुकीत तिकीट मिळावे अशी आकांक्षा असलेले अनेकजण आहेत, हे कोणीच नाकारणार नाही. पण भारत जोडो यात्रेदरम्यान तीन राज्यांमध्ये फिरताना मी इंद्रधनुष्याचे सर्व हसते-खेळते रंग पाहिले अनुभवले आहेत. अर्थात ते प्रत्येक हास्य कशासाठी आहे, त्या प्रत्येक हास्यामागचे मन कसे आहे ते अवघड आहे, परंतु या यात्रेने आशा निर्माण केली आहे, हे मात्र नक्की. अनेक जण या यात्रेत प्रत्यक्ष सहभागी झाले आहेत. अनेकांनी या यात्रेला आपला पाठिंबा दिला आहे. पण त्याहीपलीकडे या यात्रेबद्दल आस्था असणाऱ्यांचे तिला पाठिंबा देणाऱ्यांचे एक मोठे वर्तुळ आहे. त्यामुळेच ही यात्रा कलुषित करण्याचे भाजपच्या आयटी सेलचे अनेक प्रयत्न फसले आहेत. 

पाचवे कारण, ही यात्रा फक्त धर्मनिरपेक्षतेबद्दल बोलत नाही. भारत जोडो यात्रेने आज आवश्यक असलेल्या अनेक प्रकारच्या ऐक्याचा संदेश दिला आहे आणि अर्थव्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचे मुद्दे समोर आणण्यात तिला यश आले आहे. राहुल गांधी यांचे दैनंदिन भाषण सामान्यत: जात, भाषा आणि विविध धर्मामध्ये एकतेची गरज याविषयी असते. नरेंद्र मोदी सरकारवर ते करत असलेल्या टीकेतून ही बाब पुढे येते, पण त्यांचे भाषण मुस्लिमांविरुद्धच्या द्वेषाच्या राजकारणावर टीका करण्यापुरते मर्यादित नसते. बेरोजगारी, महागाई, नोटाबंदी, वस्तू व सेवा कर (जीएसटी) वा सरकारच्या चुका हे प्रश्न त्यांनी सातत्याने व आक्रमकपणे मांडले आहेत. कुडमुडय़ा भांडवलशाहीला विरोध करणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख राजकीय नेत्यांपैकी ते एक आहेत. आपल्यासाठी टाकलेल्या जाळय़ात न अडकता ही यात्रा तिचा संदेश देत पुढे चालली आहे.

आणि सहावे कारण, भारत जोडो ही फक्त काँग्रेसची यात्रा नाही. या यात्रेला अनेक जनआंदोलने तसेच संघटना, बुद्धिजीवी तसेच भूतकाळात काँग्रेसशी थोडाफार संबंध आलेल्या नागरिकांचा पाठिंबा आहे (याच नात्याने प्रस्तुत लेखक तिच्याशी जोडला गेला), एरवी जे सहसा राजकीय पदे भूषवत नाहीत किंवा काँग्रेस पक्षाला त्यांचा पाठिंबा नसतो, असे लोकदेखील या वेळी भारत जोडो यात्रेला पाठिंबा देण्यासाठी उघडपणे पुढे आले आहेत. याचा अर्थ यापुढच्या काळात त्यांना काँग्रेसशी जोडून घ्यायचे आहे किंवा त्यांची काँग्रेसच्या नेतृत्वावर निष्ठा आहे, असे चुकूनही समजू नये. असे सगळे असणे हाच ‘भारत जोडो’चा आत्मा आहे आणि या यात्रेची नैतिक गरज आहे, हेच यातून स्पष्ट होते.

भारत जोडो यात्रेत सहभागी होऊन मी माझी प्रतिष्ठा पणाला लावतो आहे, असे मला सांगणाऱ्या मित्रांना मी नुकताच पुन्हा भेटलो. या वेळी त्यांच्या बोलण्यात अशी कोणतीच काळजी नव्हती तर ते अगदी चिंतामुक्त होते. हसत हसत ते म्हणाले, ‘‘काही तरी घडतंय..’’ त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य त्यांच्या शब्दांपेक्षाही जास्त बोलके होते. मीदेखील त्यांचे म्हणणे मान्य केले आणि म्हणालो, ‘‘हो, आपण समाजामधल्या अंत:प्रवाहांना लाट समजण्याची चूक करत नाही, तोपर्यंत तरी काही तरी घडतं आहे, असं समजायला हरकत नाही. कारण घोडामैदान पुढेच आहे..’’