योगेन्द्र यादव

हिंदूत्व, उदारमतवाद, स्त्रीवाद, पर्यावरणवाद हे शब्द सातत्याने ऐकणाऱ्या आजच्या भारतीय तरुणाला इथल्या एकेकाळी भरात असलेल्या समाजवादी चळवळीविषयी फारसे काहीच माहीत नसते. खरे तर आजच्या राजकीय वातावरणात समाजवादी विचारसरणी कधी नव्हे इतकी आवश्यक आणि सुसंगत ठरू शकते.

Hindu Muslim binary In Narendra Modi lone Muslim MP Choudhary Mehboob Ali Kaiser
एकमेव मुस्लीम खासदाराने सोडली साथ; म्हणाला, “मोदींच्या सत्ताकाळात द्वेष वाढला”
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
nirmala sitaraman
उलटा चष्मा: पैसे नसलेल्या अर्थमंत्री

समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांच्या १२० व्या जयंतीच्या आणि मुलायम यांचे राजकीय गुरू राम मनोहर लोहिया यांच्या ५५ व्या पुण्यतिथीच्या एक दिवस आधी म्हणजे ११ ऑक्टोबर रोजी मुलायमसिंह यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.  देशात एके काळी समाजवादी चळवळी महत्त्वाच्या का ठरल्या, या प्रश्नाची मुलायमसिंह यादव यांच्या निधनाच्या निमित्ताने सखोल चर्चा करायला हवी,   असे मला वाटते. नेताजींच्या राजकीय कारकीर्दीतील सुसंगत गोष्ट कोणती असे कुणी विचारले, तर त्याचे उत्तर आहे समाजवादी परंपरेशी त्यांची जोडली गेलेली ओळख. त्यांच्या पक्षाच्या ‘समाजवादी’ नावापासून ते समाजवादी चळवळीसाठी लाल टोपीवर भर देण्यापर्यंत, ब्रिटिशांच्या वर्चस्वाच्या विरोधात त्यांची भूमिका आणि राम मनोहर लोहिया यांच्या आवाहनापर्यंत ते आयुष्यभर ‘समाजवादी’ राहिले. त्यांचे अनेक जुने सहकारी म्हणतील की त्यांचा समाजवाद अनेक पैलू असलेला आणि बराचसा सौम्य होता. पण म्हणूनच भारतीय समाजवादी चळवळीच्या वारशावर आपण चर्चा केली पाहिजे.

ही राजकीय परंपरा आजच्या तरुण भारतीयांच्या समोर दिसत नाही. त्यांना सतत ‘हिंदूत्वाचा’ सामना करावा लागतो. ते उदारमतवादी, डावे, नक्षलवादी, स्त्रीवादी, गांधीवादी आणि पर्यावरणवादी यांच्याबद्दल ऐकतात. तुम्हाला समाजवाद्यांबद्दल काय माहीत आहे, असे त्यांना विचारा, तुम्हाला त्यांचा चेहरा कोरा दिसेल. किंवा त्यांना समाजवाद हा साम्यवादाचा समानार्थी शब्द आहे असे वाटत असण्याचीही शक्यता आहे. सुशिक्षित भारतीयांना तर कदाचित बर्नी सँडर्स हे अमेरिकी सिनेटर माहीत असतात, पण त्यांना राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव, युसूफ मेहेरअली, मधु लिमये, जॉर्ज फर्नाडिस आणि किशन पटनायक यांच्यासारखे भारतातले समाजवादी परंपरेतील दिग्गज माहीत असण्याशी, त्यांच्याशी जोडले जाण्याची शक्यता कमी असते.

समाजवाद आणि साम्यवाद या दोन्ही विचारसरणी वेगवेगळय़ा आहेत, हे ज्यांना माहीत असते, अशांनाही भारतीय समाजवादी चळवळीचे वेगळे, वैशिष्टय़पूर्ण स्वरूप समजतेच असे नाही. जगभरातील लोकशाही समाजवाद्यांप्रमाणे, भारतीय समाजवाद्यांनी भांडवलशाहीतून येणारी असमानता आणि साम्यवाद्यांची हुकूमशाही या दोन्ही गोष्टींना विरोध केला. परंतु युरोप आणि उर्वरित जगातील लोकशाही समाजवादी पक्षांप्रमाणे भारतीय समाजवाद ही डाव्या विचारसरणीच्या साम्यवादाची सौम्य झालेली आवृत्ती नव्हती. स्वातंत्र्यलढय़ातील सहभाग आणि गांधीजींचा त्यांना मिळालेला सहवास यातून त्यांचे विचारच नाही तर राजकारणदेखील बदलले. अशा प्रकारे भारतीय समाजवाद ही केवळ लोकशाही समाजवादाची भारतीय आवृत्ती नाही. जात आणि लिंग-आधारित न्याय, राजकीय आणि आर्थिक विकेंद्रीकरण, सांस्कृतिक विघटन आणि अिहसक प्रतिकार यासह आर्थिक समानतेचा पाठपुरावा करणारी ती एक वेगळी राजकीय विचारधारा आहे. या सगळय़ामुळे भारतीय समाजवादाला देशी बाज आहे. 

इतिहासातील गोष्टींचे विस्मरण का होऊ द्यायचे नाही? त्या वारंवार लक्षात का ठेवायच्या? याचे मुख्य कारण म्हणजे ही राजकीयदृष्टय़ा कमकुवत आणि विखुरलेली ही चळवळ आजच्या विरोधाच्या राजकारणाला मदत करण्यासाठी अत्यंत उपयोगाची आहे. भारतीय समाजवादी परंपरा आपल्या प्रजासत्ताकासमोरील राजकीय आव्हानासाठी तीन महत्त्वाच्या गोष्टी देऊ शकते. ज्यांना आपल्या लोकशाहीच्या पायावर होत असलेल्या हल्ल्यांच्या विरोधात उभे राहायचे आहे, त्यांना या तीन मुद्दय़ांचा अभ्यास करता येईल.

त्यापैकी पहिला मुद्दा म्हणजे सुरुवातीला भारतीय समाजवादी प्रखर राष्ट्रवादी होते. किंबहुना हाच ते आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये असलेला मूलभूत फरक होता. भारतीय स्वातंत्र्यलढय़ाशी कम्युनिस्टांचे प्रेम आणि तिरस्कार (लव्ह- हेट) असे नाते होते, तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय चळवळीत समाजवादी ठामपणे उभे होते. त्यांचा राष्ट्रवाद संकुचित नव्हता. ते जो राष्ट्रवाद मांडत होते, तो सकारात्मक आणि दूरगामी मांडणी करणारा होता. एवढेच नाही तर तो जगभरातील वसाहतविरोधी लढय़ांशी निगडित होता. स्वातंत्र्यानंतर, त्यांचा राष्ट्रवाद मुख्यत्वे राष्ट्रनिर्मिती, सामाजिक सौहार्द आणि स्वतंत्र परराष्ट्र धोरणाविषयी होता. परंतु ज्यामुळे १९६२ च्या युद्धात आपला पराभव झाला, त्या नेहरूप्रणीत चीनविषयीच्या धोरणावर टीका करण्यासही ते कचरले नाहीत.

आज भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशाबाहेरील तसेच देशांतर्गत काल्पनिक शत्रूंचा बागुलबुवा उभा करतात आणि त्यांचा सामना करण्यासाठी राष्ट्रवादाची हाक देतात. यातून उदारमतवादी तसेच डाव्यांची चुकीच्या मुद्दय़ांवर पंचाईत होते. अमूर्त आंतरराष्ट्रीयवादाच्या साहाय्याने भाजपच्या आक्रमक राष्ट्रवादाचा मुकाबला कुणालाच करता येणार नाही; आज सुरू असलेल्या बनावट, कट्टर राष्ट्रवादाचा प्रभावी प्रतिकार करण्यासाठी भारतीय समाजवाद्यांचा सकारात्मक राष्ट्रवाद उपयोगी पडू शकतो.

याबरोबरच येते सांस्कृतिक स्वाभिमानाचे राजकारण. तो दुसरा मुद्दा आहे. भारतीय (इथे हिंदू असे वाचावे) संस्कृतीचा आपल्याला अभिमान आहे असे भाजप सतत दाखवत असते. वासाहतिक भूतकाळ पुसून टाकण्याच्या प्रतीकात्मक कृतीच्या आवाहनाच्या माध्यमातून तो (भाजप) प्रत्येक भारतीयाच्या स्वाभिमानाला सतत आवाहन करत असतो. मुस्लीम शासकांचा समावेश करण्यासाठी त्याने हळूच वसाहतवादी भूतकाळाच्या सीमांचा विस्तार केला. प्राचीन भारतीय संस्कृतीचे सतत गोडवे गात राहिले गेले पाहिजेत यासाठी तो सतत खरी-खोटी कारणे देत राहतो. इंग्रजी भाषा बोलणाऱ्यांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी तो लोकांना वारंवार आवाहन करतो. भाजपचे टीकाकार म्हणतात की यातील बऱ्याच गोष्टी हे पोकळ ढोंग आहेत, फालतू प्रतीकवाद आहेत आणि त्यांनी दिलेला इतिहासही खोटा आहे. परंतु सांस्कृतिक स्वाभिमान का बाळगायचा हे स्पष्ट करण्यासाठी भाजप पर्यायी कारणे देत नाही. त्यांची इंग्रजी भाषेविरोधातील बचावात्मक भूमिका वसाहतवादी वाटत नसली तरी अभिजातवादी वाटू शकते. भारतीय समाजवादी आपल्या सांस्कृतिक वारशाची आपल्या, देशी पद्धतीने मांडणी करतात. ते इंग्रजी भाषेच्या वर्चस्वावर टीका करतात, पण ती करताना हिंदीच्या वर्चस्वाचे समर्थन करत नाहीत. हेच त्यांचे पर्यायी सांस्कृतिक राजकारण आहे. ते नास्तिक व्यक्तीला अपमानास्पद वागणूक देत नाहीतच, उलट धर्माबद्दल सहानुभूती, करुणा बाळगतात. त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांना सामान्य- श्रद्धावान भारतीयांशी सहज संवाद साधता येतो.

तिसरा घटक म्हणजे सामाजिक न्यायाच्या समाजवादी राजकारणाला, विशेषत: जाती-आधारित विषमतेला असलेला त्यांचा विरोध. भारतीय समाजातील असमानतेला कारणीभूत ठरणारा प्रमुख घटक म्हणजे जात ही बाब आंबेडकरांव्यतिरिक्त, सगळय़ात आधी कुणी ओळखली असेल तर ती भारतीय समाजवाद्यांनी. मागासवर्गीयांसाठी (यात एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक आणि महिलांचा समावेश होता) वेगवेगळय़ा गोष्टी करण्याची मागणी त्यांनी केली. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यामागे समाजवादी पक्ष हेच प्रमुख बलस्थान होते. आज तो वारसा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण दलित-बहुजन ऐक्य हे सध्याच्या आक्रमणाविरुद्ध ठामपणे उभे राहू शकते. समाजातील सर्व वंचित घटकांच्या व्यापक एकतेसाठी वैचारिक आणि राजकीय आधार देण्याचे काम समाजवादी चळवळ करू शकते.

समाजवादी चळवळीचा वारसा महत्त्वाची भूमिका बजावू शकत असला तरी या चळवळीचे वारसदार ही ऐतिहासिक भूमिका बजावतील का? स्वातंत्र्योत्तर भारतात सर्व प्रकारच्या दडपशाहीला आणि हुकूमशाहीला समाजवाद्यांनी विरोध केला आहे. समाजवादी चळवळ अत्यंत बहरात होती त्या काळात काँग्रेस हा पक्ष त्यांचा प्रमुख विरोधक होता. त्यामुळे त्यांच्या प्रस्थापितांविरोधाच्या लढय़ाचे स्वरूपच काँग्रेसविरोध असे होते. त्या काळातील बहुतांश समाजवाद्यांप्रमाणे मुलायमसिंह यादव हे काँग्रेसचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जात होते. तर आजच्या समाजवादी चळवळीच्या वारसांनी कोणतीही भूमिका घेताना हे समजून घेतले पाहिजे की आज काँग्रेस नाही तर भाजप हाच प्रस्थापित सत्तेचा चेहरा आहे. तो घटनात्मक लोकशाही आणि एकात्मतेचा पाया दाबून टाकू पाहत आहे. अशा सगळय़ा परिस्थितीत नव्या भारतात आपली भूमिका पार पाडण्यासाठी भारतीय समाजवादाने नवा जन्म घेण्याची गरज आहे.

लेखक ‘जय किसान आंदोलन’ आणि ‘स्वराज इंडिया’चे संस्थापक आहेत.