– डॉ. मनसुख मांडविया

भारताची विकासगाथा अशा लोकांद्वारे लिहिली जाईल, जे आज यातील विचारांना मूर्त रूप देत आहेत. संपूर्ण देशात, तरुण भारतीय याबद्दल सखोल विचार करत आहेत की, भारत कशा प्रकारे वेगाने पुढे जाऊ शकेल, कशा प्रकारे अधिक चांगले शासन करू शकेल आणि २०४७ पर्यंत कशा प्रकारे विकसित देश होईल. त्यांचे विचार विद्यापीठ परिसर आणि समुदाय, नवउद्याोग, खेळाची मैदाने, वर्गखोल्या आणि गावांतील बैठकांमध्ये उमटताना दिसतात. खरा प्रश्न आता हा राहिलेला नाही की, तरुणांकडे योगदान देण्यासाठी काही आहे का, खरा प्रश्न असा आहे की, त्यांना राष्ट्राच्या वाटचालीला दिशा देण्याची संधी मिळावी, यासाठी सशक्त मंच उपलब्ध आहे का. ‘विकसित भारत युवा नेता संवाद’ (व्हीबीवायएलडी), हा उपक्रम अशाच प्रकारचा मंच प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

आज भारतात जगातील सर्वात जास्त तरुण आहेत. त्यामुळे साहजिकच राष्ट्राच्या भविष्याची दिशा केवळ धोरणे किंवा संस्थांद्वारे नाही, तर येथील तरुण नागरिकांची कल्पनाशक्ती, दृढ विश्वास आणि धैर्याने निर्धारित होईल. विशाल युवाशक्तीचे हे भांडार हा केवळ लोकसंख्याशास्त्रीय लाभ नाही, तर ही भारताची सर्वांत मोठी राष्ट्रीय संपत्ती आहे जी नवोन्मेषाला गती देण्यासाठी, लोकशाही मजबूत करण्यासाठी आणि देशाला सर्वसमावेशक व शाश्वत विकासाच्या दिशेने पुढे नेण्यासाठी सक्षम आहे.

आजचा तरुण केवळ वैयक्तिक प्रगतीने प्रेरित होत नाही; तर तो जबाबदारी घेण्याच्या आणि सार्थ प्रभाव पाडण्याच्या इच्छेनेदेखील प्रेरित होतो. ते अशा मार्गांचा शोध घेतात, जिथे त्यांच्या सर्जनशीलतेचे रूपांतर तोडग्यांमध्ये होईल, त्यांच्या ऊर्जेचे रूपांतर नेतृत्वात आणि महत्त्वाकांक्षेचे सेवेत होऊ शकेल. ‘युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री’ म्हणून माझ्या कार्यकाळात, मला विविध पार्श्वभूमीच्या म्हणजे विद्यापीठ परिसर, ग्रामीण जिल्हे, क्रीडा मैदाने आणि सामुदायिक उपक्रमांमधील – तरुण भारतीयांशी संवाद साधण्याची संधी मिळाली आहे. त्यातून तरुण देशाच्या भविष्याबद्दल किती गांभीर्याने विचार करतात, हे स्पष्टपणे जाणवते. मला तो प्रसंग आठवतो जेव्हा मी ग्रामीण भागांतील तरुण स्वयंसेवकांच्या एका गटाला भेटलो होतो. त्यांनी आपल्या गावांमध्ये अनौपचारिक शिक्षण केंद्र सुरू केले होते. मर्यादित संसाधने असूनही, दृढ विश्वासाच्या जोरावर ते शिक्षण आणि कौशल्य विकासातील उणिवांवर स्थानिक पातळीवर काढलेल्या उपायांद्वारे तोडगा काढत होते. त्यांचे विचार व्यावहारिक होते, जमिनीवरील वास्तवाशी जोडलेले होते आणि जबाबदारीची जाण त्यांना होती. अशा प्रकारचे अनुभव हे स्पष्ट करतात की, जेव्हा तरुणांवर विश्वास ठेवला जातो आणि त्यांना संधी दिली जाते, तेव्हा ते केवळ सहभागी होत नाहीत, तर नेतृत्व करतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून असे आवाहन केले होते की, ज्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही, अशा एक लाख तरुणांना सार्वजनिक जीवनात आणले जावे. पंतप्रधानांच्या याच भावनेतून प्रेरणा घेऊन जानेवारी २०२५ मध्ये ‘विकसित भारत युवा नेता संवाद’ कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला, ज्यामध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाची संकल्पना पूर्णपणे नवीन स्वरूपात मांडण्यात आली आहे. याला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व होता. ‘विकसित भारता’ संदर्भातील आवाहन केल्यानंतर ३० लाखांहून अधिक तरुणांनी त्यात सहभाग घेतला. दोन लाखांपेक्षा जास्त निबंध सादर केले गेले आणि हजारो तरुणांनी राज्य स्तरावर आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचा समारोप दिल्लीच्या भारत मंडपम येथे झाला, जिथे तीन हजार तरुणांना पंतप्रधानांशी मनमोकळेपणाने संवाद साधण्याची संधी मिळाली. पंतप्रधानांनी त्यांचे विचार ऐकून घेतले आणि त्यांना नेतृत्व करण्याचे आवाहन केले.

आकडेवारीच्या पलीकडे जाऊन पाहिले, तर सहभागाच्या स्वरूपामुळे हा संवाद खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरल्याचे दिसते. २०४७च्या भारताच्या उभारणीत भारताच्या तरुणांचे विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत, यावर या उपक्रमातून शिक्कामोर्तब झाले. तरुण स्पर्धकांना राष्ट्रीय आव्हानांबद्दल गांभीर्याने विचार करण्यासाठी, त्यावर उपाय सुचवण्यासाठी आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षेला सामायिक उद्देशाशी जोडण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले, ज्यामुळे आकांक्षा आणि अंमलबजावणी यांच्यातील अंतर संपुष्टात आले.

विकसित भारत युवा नेतृत्व संवाद या उपक्रमाची खरी ताकद केवळ त्याच्या व्याप्तीत नाही, तर त्याच्या आखणीमध्येही आहे. या उपक्रमाच्या स्वरूपातच विचार, भाषा, संस्कृती आणि अनुभवांच्या विविधतेचा अंतर्भूत आहे. यानिमित्ताने शहरी आणि ग्रामीण भारतातील तरुण, विद्यार्थी आणि व्यावसायिक, नवोन्मेषी आणि तळागाळातील नेतृत्व एकाच व्यासपीठावर येते. या उपक्रमात अनेक स्तरांतील सहभाग दिसून येतो. त्यामुळेच भौगोलिक परिस्थिती, भाषा किंवा पार्श्वभूमीमुळे कोणत्याही विचारांना बगल दिली जाणार नाही, उलट संवादाच्या अशा स्वरूपामुळेच सहभागी होणाऱ्या प्रत्येक तरुण प्रतिनिधीला त्याचे म्हणणे मांडण्याची संधी मिळेल आणि त्यांच्या विचारांची व्याप्ती वाढवण्यासाठी एक व्यासपीठही उपलब्ध होईल.

भारतातील तरुण पिढीने देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यापासून ते स्वतंत्र भारतातील संस्थांच्या उभारणीपर्यंत, राष्ट्र उभारणीच्या प्रत्येक निर्णायक क्षणात कायम मुख्य भूमिका पार पाडली आहे. प्रत्येक वळणावर, भारतीय तरुण धाडस, आत्मविश्वास आणि नेतृत्व करण्याच्या इच्छेेने पुढे आला आहे. आज देश पुन्हा एकदा तरुण वर्गाकडे अपेक्षेने पाहत आहे, अर्थात ही अपेक्षा केवळ सहभागापुरती मर्यादित नाही, तर ती विकसित भारताचे सहनिर्माते म्हणून नेतृत्व करण्यासाठी आणि या वाटचालीला गती देण्यासाठीची आहे. २०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्याचे स्वप्न केवळ आर्थिक प्रगतीपुरते मर्यादित नाही, तर त्याअंतर्गत सामाजिक सलोखा, पर्यावरणीय जबाबदारी, तंत्रज्ञानविषयक मार्गदर्शन आणि सर्वसमावेशक विकासही साधणे गरजेचे आहे. या जटिल आव्हानांचा सामना करण्यासाठी नवे विचार, परिस्थितीशी जुळवून घेण्याची लवचीकता आणि नवोन्मेषाचा अवलंब करण्याची क्षमता गरजेची आहे आणि हे सर्व गुण भारताच्या तरुणांत ठळकपणे दिसून येतात.

या उपक्रमाच्या पहिल्या आवृत्तीच्या दमदार यशाच्या बळावरच, विकसित भारत युवा नेता संवाद २०२६ चे आयोजन ९ ते १२ जानेवारी २०२६ या कालावधीत करण्यात आले. या आयोजनातून या राष्ट्रीय युवा परिषदेने एका जागतिक व्यासपीठाच्या दिशेनेच निर्णायक झेप घेतली आहे आणि त्याचे पडसाद जगभरात उमटत आहेत. भारतासाठी डिझाईन आणि विकसित भारतासाठी तंत्रज्ञान यांसारख्या नवीन उपक्रमांमुळे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील युवा अनिवासी भारतीयांच्या सहभागामुळे, या संवादाची व्याप्ती आता देशाच्या सीमा ओलांडून त्यापलीकडे पोहोचली आहे. असे असले तरी, युवा वर्गाला धैर्याने विचार करण्यासाठी, बिनधास्तपणे नवोन्मेष साकारण्यासाठी आणि दृढ विश्वासाने नेतृत्व करण्यासाठी सक्षम करणे हा या उपक्रमाचा मूळ उद्देश मात्र कायम राखला गेला आहे.

या वर्षीच्या आयोजनाच्या व्याप्तीतून या महत्त्वाकांक्षेचे गहिरेपणच अधोरेखित होते. विकसित भारत प्रश्नमंजुषा स्पर्धेत ५० लाखांपेक्षा जास्त तरुण स्पर्धकांनी भाग घेतला होता. हा विकसित भारत युवा नेता संवाद २०२६मधील निवडीचा पहिला टप्पा होता. चार दिवसांच्या या सोहळ्यादरम्यान, देशाच्या कानाकोपऱ्यातील सहभागी युवा प्रतिनिधींना व्यावहारिक ज्ञान, विचार आणि दृष्टिकोन समजून घेण्याची संधी मिळाली, त्यादृष्टीने त्यांचा राष्ट्रीय आणि जागतिक कीर्तीच्या दिग्गज व्यक्तींशी संवाद घडला. हा संवाद विविध विषय आणि भौगोलिक सीमांच्या पलीकडे जाणारा असेल हे नक्की.

हे व्यासपीठ खऱ्या अर्थाने आपल्या तरुणांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देते इतकेच नाही, तर त्यांचे म्हणणे ऐकले जाईल याचीही काळजी घेते आणि हेच विकसित भारत युवा नेता संवाद २०२६चे वेगळेपण आहे. या व्यासपीठामुळे भारतातील तरुणांच्या प्रतिनिधींना आपले विचार, आकांक्षा आणि त्यांच्या मनातील उपाययोजना थेट भारताच्या पंतप्रधानांसमोर मांडणे शक्य झाले आहे. संपूर्ण देशभरात स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केल्या जाणाऱ्या १२ जानेवारीला, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: भारत मंडपममध्ये तरुणांशी संवाद साधतील. त्यातून पंतप्रधानांना या तरुणांच्या मनातील भविष्यातील भारताचे चित्र कसे आहे आणि त्याला कशा प्रकारे आकार देण्याचा निर्धार त्यांनी केला आहे हे समजून घेता येईल.

आता भारत आपल्या स्वातंत्र्याच्या शताब्दीच्या दिशेने वाटचाल करत आहे. अशा वेळी देशाला मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस असलेल्या आणि त्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत परावर्तित करण्याचा दृढ निश्चय असलेल्या तरुण वर्गाच्या सक्रिय सहभागाची गरज आहे. त्यादृष्टीने पाहिले तर विकसित भारत युवा नेतृत्व संवाद हे निव्वळ संवादासाठीचे एक व्यासपीठ नाही, तर ही एक मोहीम आहे. ही मोहीम भारतातील तरुण पिढीला पुढाकार घेत नेतृत्व करण्याचे, राष्ट्रीय आव्हानांचा सामना करण्याचे आणि विकसित भारताच्या ध्येयाशी आपल्या आकांक्षाना जोडण्याचे आवाहन करणारी मोहीम आहे.

ज्यांच्यामध्ये नेतृत्व करण्याचा आत्मविश्वास आहे, जे राष्ट्रसेवेसाठी वचनबद्ध आहेत त्यांच्याकडूनच विकसित भारताची जडणघडण होणार आहे. त्यासाठी भारतातील तरुण आता सज्ज झाले आहेत. अशावेळी देशानेही त्यांच्या खांद्याला खांदा लावून चालण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे.

(लेखक केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच कामगार आणि रोजगारमंत्री आहेत)