धारावीचा विचार केला जातो तेव्हा धारावीकडे आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून बघितले जाते. धारावीचा पुनर्विकाससुद्धा धारावी प्रामुख्याने रहिवासी भाग असल्याचे गृहीतक केंद्रस्थानी ठेवून केला जातो आहे. धारावीमध्ये बरेच व्यवसाय आहेत वगैरे म्हटले जाते, पण तो मुद्दा दुय्यम असतो. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा उद्देश धारावीतील दहा लाख रहिवाशांना सुनियोजित शहरात मिश्र उपयोग असलेल्या इमारतीमध्ये घरे मिळवून देणे हा आहे. पण धरावी केवळ रहिवासी वस्ती नाही. धारावीत मोठ्या प्रमाणात उद्योग आहेत.

धारावीमध्ये उद्योग नक्की आहेत तरी किती? त्यांचे स्वरूप काय आहे? धारावी पुनर्विकास प्रकल्पानुसार धारावीत पाच हजार उद्योग आहेत. पण हा फक्त अंदाज आहे. धारावीत उद्योग आहेत तरी किती? भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची उद्यम वेबसाइट आहे. या संकेतस्थळावर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना नोंदणी करता येते. नोंदणी केलेल्या उद्योगांना विविध सवलती मिळतात. या सवलती मिळाव्यात म्हणून बहुतेक सगळे उद्योग नोंदणी करतात. ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत धारावीचा ४०००१७ पिन कोड असलेल्या २२ हजारपेक्षा जास्त उद्योगांनी उद्यम संकेतस्थाळावर नोंदणी केली होती. धारावी हे उद्योगाचे केंद्र आहे. महाराष्ट्र शासनाने राज्याच्या विविध भागांत एमआयडीसी स्थापन केल्या आहेत. उद्योग स्थापन करण्यासाठी जागा, पायाभूत सुविधा वगैरे पुरवून राज्यातील औद्योगिकीकरणाला हातभार लागावा म्हणून एमआयडीसीची निर्मिती झाली. धारावीची आकडेवारी तपासून पाहताना धारावीकडे एमआयडीसी म्हणून बघता येईल का असा विचार आला. उर्वरित लेखात धारावीची तुलना महाराष्ट्रातील काही आघाडीच्या एमआयडीसींशी केली आहे. यात लोटे परशुराम, शेंद्रे, बिडकीन, चाकण, मिरज, कागल, वाळूज आणि नवीन स्थापन करण्यात येत असलेल्या एमआयडीसींशी केलेली आहे. तुलना करताना प्रत्येक एमआयडीसी ज्या पिन कोड एरियात येते तो पिन कोड पट्टा म्हणून असलेल्या उद्योगांची संख्या घेतलेली आहे. आकृती क्रमांक १ मध्ये विविध एमआयडीसींमध्ये उद्योगांची एकूण संख्या दाखवली आहे.

जमीन वापरातील कार्यक्षमता

पण धारावीमधील उद्योग तुलनेने कमी भूभागात एकवटलेले आहेत. या बाबतीत महाराष्ट्रातील अन्य उद्योगक्षेत्रांशी तुलना केली असता, धारावीतील उद्योग उपलब्ध जागेचा वापर अधिक कार्यक्षमपणे करतात. धारावीत किलोमीटरमागे ५,८२६ उद्योग आहेत. धारावीपेक्षा अधिक घनता फक्त मरोळ एमआयडीसीची आहे. तिथे किलोमीटरमागे ८,३२९ उद्योग आहेत. इतर एमआयडीसी याबाबत धारावीच्या पासंगालासुद्धा पुरत नाहीत. त्यांची संख्या दर किलोमीटरमागे पाचशेच्या आसपास असल्याचे बिडकिन, कागल, चाकण, वाळूज येथे दिसते, तर कुपवाड येथे ती एक हजारच्या आसपास आहे. धारावीत कमी जागेत उद्योग दाटीवाटीने वसतात. जगातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त आर्थिक उत्पादन जगाच्या ०.३ टक्के इतक्या कमी भूभागात होते. भौगोलिक केंद्रीकरणाचे स्थानिक उद्योगांना बरेच फायदे असतात. एक तर उद्योगाचे विविध पुरवठादार उद्योगसुद्धा बहुतेक वेळेस जवळच असतात. तसेच खरेदीदार उद्योगही हाकेच्या अंतरावर असतात. उदा. धारावीत चर्मोद्योगाचे चामडे कमविणे, रंगविणे, कापणे, शिवून विविध वस्तू निर्माण करणे ते शेवटी विक्री करणे हे सगळे टप्पे आढळतात. यातून प्रत्येक उद्योगाचा खर्च वाचतो. एकाच ठिकाणी विविध उद्योग असल्यामुळे विविध प्रकारचे कामगार, तांत्रिक माहिती वगैरे सहज उपलब्ध होते. याला अर्थशास्त्रीय परिभाषेत ॲग्लोमरेशन इकॉनॉमीज
म्हणतात. म्हणजे एकाच भूभागात उद्योग दाटीवाटीने वसले की होणारे आनुषंगिक फायदे. यातून उत्पादकता वाढते. उत्पादकता वाढली की आर्थिक वाढ होते. म्हणून धारावीतील ॲग्लोमरेशन इकॉनॉमीज या मुंबईच्या, महाराष्ट्राच्या आणि देशांच्या आर्थिक वाढीच्या दृष्टीने कळीच्या आहेत.

वस्तू निर्माण करणार्‍या उद्योगांचे प्रमाण

राष्ट्रीय उत्पन्नातील वस्तू निर्माण क्षेत्राचा टक्का वाढविणे आवश्यक आहे. भारतात सध्या हा टक्का १६-१७ टक्के आहे. तो वाढविण्यासाठी भारत सरकार विविध प्रयत्न करत आहे. धारावीत जे उद्योग आहेत त्यात असलेल्या वस्तू निर्माण करणार्‍या उद्योगांचा टक्का आणि त्याची इतर एमआयडीसीमधील वस्तू निर्माण उद्योगांच्या टक्केवारीशी तुलना आकृती क्रमांक २ मध्ये दाखविली आहे. वस्तू उत्पादन क्षेत्राची टक्केवारी धारावीत कागल आणि शेंद्रे एमआयडीसीच्या खालोखाल आहे. पण कागल वा शेंद्रे एमआयडीसीमधील एकूण उद्योगांची संख्या धरावीपेक्षा खूप कमी आहे. बिडकीनसारख्या महत्त्वाकांक्षी एमआयडीसीच्या तुलनेत धारावी याबाबत खूपच पुढे आहे.

वरील तिन्ही निकष एकत्रित पाहिले तर धारावी ही लघुउद्योगांसाठी महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाची एमआयडीसी असल्याचे लक्षात येते. फरक एवढाच की धारावी कोणीही एमआयडीसी म्हणून ‘वसवली’ नाही. ती इतिहासातून जैविकदृष्ट्या निर्माण झालेली औद्योगिक एमआयडीसी आहे. जगातील बहुतेक सगळ्या महत्त्वाच्या आर्थिक रचना अशाच जैविक पद्धतीने तयार होतात. तिथे एक संपूर्ण परिसंस्था तयार झालेली असते. ती कोणी ‘तयार’ करत नाही. अर्थशास्त्राच्या स्वाभाविक नियमानुसार ती वर्षानुवर्षांच्या उत्क्रांतीतून रचली गेलेली असते. या जैविक उत्क्रांतीचा उद्देश गोंडस, सुंदर, सुनियोजित शहरे निर्माण करणे नसतो. आहेत त्या संसाधनाचा शक्य तेवढा वापर करून आर्थिक गतिशीलता गाठणे हा या प्रक्रियेचा उद्देश असतो. धारावी जैविक असल्यामुळे ‘नियोजित शहर’ असू शकत नाही. सुंदर तर असणे शक्यच नाही. विकसित देशातील शहरे ही सुंदर नसतात, पण आर्थिक वाढीचे, ऊर्जेचे केंद्र मात्र असतात. लोक राहायला आले आणि उद्योग करू लागले. मागणी, पुरवठा, स्पर्धा यांच्या एकत्रित प्रवाहातून ही व्यवस्था निर्माण झाली आहे. तिथली उद्योगांची दाटीवाटी ही तिची खरी ताकद आहे. धारावीत गर्दी असणे स्वाभाविक आहे. गर्दी हेच धारावीच्या आर्थिक ताकदीचे मर्म आहे. गर्दीमुळे नागरी सुविधांवर ताण येतो हेही खरे आहे. पण हा ताण कमी करण्याच्या प्रयत्नात, धारावीचे सुनियोजित वसाहतीत रूपांतर करण्याच्या प्रयत्नात तिची आर्थिक रचना विस्कळीत होऊ नये हे महत्त्वाचे! धारावीत अजूनही रोज जितक्या नवीन सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची नोंदणी होते आहे तितकी सुनियोजित अंधेरी एमआयडीसीमध्येही होत नाही. धारावीच्या आर्थिक ताकदीचे मर्म तिथे तयार झालेली परिसंस्था आहे.
धारावी पुनर्वसन प्रकल्प धारावीतील रहिवाशांना तिथेच घर मिळवण्यासाठी पात्र व्हायचे असेल तर विविध अटी घालत आहे. पण या अटींमुळेच धारावीतील उद्योगांची परिसंस्था नष्ट तर होणार नाही ना, याबाबत कोणतीच आकडेवारी प्रकल्पात नाही. या परिसंस्थेचा एक भाग तुटला, त्याच्या अमूल्य साखळीतील एक कडी तुटली तर इतर उद्योगांची उत्पादकता, स्पर्धात्मकता मार खाते. वर उल्लेख केलेल्या ॲग्लोमरेशन इकॉनॉमीजला फटका बसला तर धारावीची आर्थिक गतिशीलता संपेल. याचा परिणाम अर्थातच मुंबईच्या आर्थिक गतिशीलतेवर आणि पर्यायाने देशाच्या आर्थिक प्रगतीवर होईल. त्याचबरोबर धारावीत आज जे लोक उत्पादक कामे करत आहेत, त्यांच्याही हाताला फटका बसणार आहे. या सगळ्याचा विचार प्रकल्पात काळजीपूर्वक केलेला दिसत नाही. म्हणून हा ‘पुनर्वसन’ प्रकल्प अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे.
-नीरज हातेकर, अर्थशास्त्र व संख्याशास्त्राचे अभ्यासक