‘हरिजन सेवक संघा’तर्फे संचालित ‘राजेंद्र छात्रालया’ने अनेक विद्यार्थी घडवले. मुंबईचे पहिले दलित महापौर डॉ. पी. टी. बोराडे, सनदी अधिकारी भाई नगराळे, धुळ्याचे आजवरचे सात खासदार याच छात्रालयाचे माजी विद्यार्थी, मात्र आज हे छात्रालय भाड्याच्या इमारतीत सुरू ठेवावे लागत आहे. यात संस्थेची आर्थिक ओढाताण होत आहे…
हा प्रसंग ३१ जुलै १९३७ चा. एका न्यायालयीन खटल्याच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर धुळ्याला आले होते. ही संधी साधून तिथल्या गांधीवाद्यांनी ठरवले, आंबेडकरांना ‘हरिजन सेवक संघा’तर्फे संचालित ‘राजेंद्र छात्रालय’ दाखवायचेच. यासाठी पुढाकार घेतला ॲड. काकासाहेब बर्वेंनी. हे त्या काळचे निष्णात वकील. कामकाज संपल्यावर त्यांनी गळ घातली. आंबेडकर तयार झाले. सारे आनंदित होऊन बाहेर निघाले. त्यांच्यासाठी राखून ठेवलेला टांगा तिथेच होता, पण चालक बेपत्ता झालेला. चौकशी केल्यावर कळले की अस्पृश्य म्हणजे महार व्यक्तीला टांग्यात बसवले तर पाप लागेल म्हणून तो पसार झालेला. शेवटी नरसोपंत सौंदणकरांनी टांग्याचे सारथ्य केले. आंबेडकर छात्रालयात आले. त्यांनी सेवक संघाच्या कार्याची भरभरून स्तुती केली. तसा अभिप्राय लिहिला. आजही मागास समाजातील गरीब मुलांना शिक्षणाचे दार उघडून देणार्या या छात्रालयाच्या निर्मितीची कथाही मोठी विलक्षण. सवर्णांचा जाच सहन करणार्या दलितांना राजकारण तर सोडाच पण शिक्षण व नोकरी मिळवण्यासाठी किती कष्ट पडतात याची जाणीव महात्मा गांधींना पहिल्यांदा करून दिली ती आंबेडकरांनी. राखीव मतदारसंघाची मागणी हे त्यामागचे निमित्त. आधी वाद, मग चर्चा व शेवटी करार हे सारे घडले १९३२ ला. पुणे कराराच्या जन्माची कथा अशी. यामुळे व्यथित झालेल्या गांधींनी पुरे झाले राजकारण म्हणत हरिजन सेवा संघाची स्थापना केली.
छात्रालये, शाळा सुरू करा अशी हाक समर्थकांना दिली. त्याची साद पोहोचली थेट ॲड. बर्वेंच्या कानी. धुळे परिसरात १८९९ पासून अस्पृश्यता निवारण संघाच्या माध्यमातून दलित्तोद्धाराचे काम करणारे बर्वे एक छात्रालय चालवत होतेच. बर्वे, सौंदणकर व त्यांचे सर्व सहकारी ब्राह्मण. त्यांना प्रारंभी या कामासाठी ब्राह्मण वस्तीत कुणी जागा देईना. मग त्यांनी मुस्लीम वस्तीत ती शोधली. गाव-खेड्यातली दलित मुले गोळा करून धुळ्याला आणायची. चरख्यावर खादीचे सूत कातून त्याचे कपडे शिवून या मुलांना द्यायचे. त्यांचे अंघोळपाणी, जेवणाची व्यवस्था करायची व शिकवायचे. यामुळे हिंदूंच्या रोषाला पात्र ठरलेल्या बर्वेंनी त्याची फिकीर कधी केली नाही. गांधींचा आदेश येताच त्यांनी हे छात्रालय हरिजन सेवक संघाला सुपूर्द केले. हे राज्यातले पहिले छात्रालय. ३१ जुलै १९३५ ला राजेंद्र प्रसादांनी उद्घाटन केले तेव्हापासून याचे नाव झाले राजेंद्र छात्रालय. १९३९ ला कन्या छात्रालयाची सुरुवात झाली. आजवर या दोन्ही ठिकाणांहून पाच हजार मुले व साडेतीन हजार मुलींनी शिक्षण घेतले. दरवर्षी साडेतीनशे गरीब मुलेमुली येथे शिक्षणाच्या निमित्ताने दाखल होतात. १९३९ ला गांधींनी या छात्रालयाला भेट दिली. १९४० ला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी.
भेटीनंतरचा सावरकर व आंबेडकरांचा अभिप्राय आजही वाचण्यासारखा. या दोघांनीही सेवक संघाचे व त्याला प्रेरणा देणार्या गांधींचे कौतुक केलेले. खान्देशावर आजही साने गुरुजींचा प्रभाव. स्वातंत्र्याच्या लढ्यात विनोबा व गुरुजी बराच काळ धुळ्याच्या कारागृहात होते. तिथून सुटका झाल्यावर या दोघांनी याच छात्रालयात मुक्काम ठोकला. समाजाचे प्रबोधन हा दोघांच्याही कार्याचा भाग. मग काय, याच छात्रालयात विनोबा प्रवचन द्यायचे व साने गुरुजी ते लिहून घ्यायचे. गीताई जन्माला आली ती अशी. इतकी समृद्ध परंपरा लाभलेल्या या छात्रालयाने आजवर विद्यार्थीही तसेच घडवले. मुंबईचे पहिले दलित महापौर डॉ. पी. टी. बोराडे, सनदी अधिकारी भाई नगराळे. इतकेच काय तर धुळ्याचे आजवरचे सात खासदार याच छात्रालयाचे विद्यार्थी. स्वावलंबन हे या ठिकाणाचे मुख्य सूत्र. त्यामुळे एखादा विद्यार्थी जास्त शिकला नाही तरी रिकामा राहात नाही. शहरातले अनेक ऑटोचालक इथले विद्यार्थी. त्यातले काही आजही कमाईतला काही वाटा छात्रालयाला देतात. आता या दोन्ही छात्रालयांचा कारभार बघतात मधुकर शिरसाठ हे माजी विद्यार्थी. ते सरकारी नोकरीत होते. तुरुंग अधिकारी. सात वर्षांत त्यांनी ती सोडली व हे काम हाती घेतले. जे बिघडलेले त्यांना दुरुस्त करण्यापेक्षा पिढी बिघडूच नये यासाठी झटणे चांगले अशी त्यांची भूमिका. त्यांचे वडील समता सैनिक दलात होते. आंबेडकरांच्या जवळचे. शिरसाठांनी वाहून घेतले गांधीकार्याला. आजच्या प्रतिकूल परिस्थितीत गांधी-आंबेडकर या छात्रालयात एकत्र वास करतात हे तसे दुर्लभ चित्र!
सेवक संघाच्या राज्य शाखेचे सचिव असलेले शिरसाठ वर्गणी गोळा करून विद्यार्थ्यांची सोय करतात. सरकार या संस्थेला नऊशे रुपये प्रतिविद्यार्थी अनुदान देते. सरकारी छात्रालयात हाच आकडा अडीच हजार. शिरसाठांच्या मदतीला येथील अनेक गांधीवादी असतात. रमेश दाणे हे ज्येष्ठ पत्रकार त्यातले एक. मध्यंतरी सरकारने अनुदान बंद केले तेव्हा धुळेकरांनी इथले विद्यार्थी जगवले. हे शहर धार्मिक दंगलीसाठी कुप्रसिद्ध. ती झाली की मुस्लीम या छात्रालयाचा आश्रय घेतात. काँग्रेस राजवटीच्या काळात ही संस्था दुर्लक्षित राहिली. युतीचे सरकार आल्यावर राजकुमार बडोले सामाजिक न्यायमंत्री असताना त्यांनी चार कोटींचा निधी दिला. यातून छात्रालयाची इमारत उभी राहिली पण अजून उद्घाटन झालेले नाही. कन्या छात्रालयासाठी जास्तीच्या निधीची मागणी केली पण टक्केवारी देण्याची ऐपत नाही म्हणून घोडे अडलेले. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घ्यावा व हा ऐतिहासिक वारसा पुढे न्यावा असे शिरसाठ म्हणतात. मध्यंतरी संस्थेचा अमृतमहोत्सव झाला. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील पाहुण्या होत्या. तेव्हा काही दलित संघटनांनी मोर्चा काढून फलकातील हरिजन शब्द हटवण्याची मागणी केली. यावरून तणाव निर्माण होऊ नये म्हणून शहरातील सर्व पक्षांचे लोक एकत्र आले व त्यांनी या संघटनांची समजूत काढली.
गेल्या ९० वर्षांत एकही वाद नाही, विद्यार्थ्यांची तक्रार नाही, कुठलीही वाईट घटना नाही हे या छात्रालयाचे वैशिष्ट्य. ते जपायला हवे यासाठी शहरातील सारे गांधीवादी दक्ष असतात. अनेकदा विद्यार्थ्यांच्या गरजा भागवता भागवता संस्थेच्या नाकीनऊ येतात, पण गांधींच्या प्रेरणेतून उभे राहिलेल्या या छात्रालयाला मदत करण्यासाठी काँग्रेसचा एकही नेता समोर येत नाही. हा पक्ष सध्या पराभूतावस्था अनुभवत असला तरी नेत्यांची श्रीमंती कायम. ते ऊठसूट गांधींचे नाव घेतात पण मदत मागितली की पाठ फिरवतात. हरिजन सेवक संघाची केवळ पाच छात्रालये सध्या राज्यात कशीबशी तग धरून आहेत. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ही संख्या पन्नासपेक्षा जास्त होती. नंतर बाळासाहेब भारदे या संघाचे राज्य अध्यक्ष झाले. अस्सल गांधीवादी व मनाने उमदे असलेल्या या नेत्याचा काँग्रेसच्याच लोकांनी गैरफायदा घेतला. अनेक ठिकाणची छात्रालये स्वत:च्या शिक्षण संस्थांना जोडून घेतली. अशा मागणीपत्रांवर भारदेंनी समोरच्यांवर विश्वास टाकून स्वाक्षर्या केल्या. नंतर या नेत्यांनी छात्रालये बंद केली व जागा हडपली.
आता पुण्याचे माजी आमदार मोहन जोशी अध्यक्ष आहेत. ही छात्रालये, कल्याणजवळच्या शेईला असलेली एक शाळा व अंबरनाथला १९३७ मध्ये स्थापन झालेली व अजूनही सुरू असलेली शाळा ते कशीबशी संचालित करतात- अनेकदा पदरचे पैसे खर्च करून. धुळ्याच्या छात्रालयाकडे आधी खूप जागा होती. बर्वेंनी विकत घेऊन दान दिलेली. तिथे बाजूलाच वैद्यकीय महाविद्यालय चालवणार्या एका संस्थानिक तसेच काँग्रेसनेत्याने त्यातली बरीचशी हडपली. शिरसाठांनी खूप लढा दिला. आमिष झुगारले पण फायदा झाला नाही. अस्पृश्यता निवारणाचा नारा देणार्या काँग्रेसच्या लेखी हे छात्रालयच अस्पृश्य ठरले आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत या संस्थेत वेगवेगळी शिबिरे भरतात. एप्रिलच्या शेवटी एका टळटळीत दुपारी भेट दिली तेव्हा बर्वेंचे नाव असलेल्या कन्या छात्रालयात भिक्खू महासंघाचे शिबीर सुरू होते. आताच्या दूषित वातावरणातला हा तसा दुर्मीळ प्रसंग. मनात कोरला गेलेला. नवीन इमारत पण उद्घाटन नाही. त्यामुळे एक छात्रालय भाड्याच्या इमारतीत सुरू ठेवावे लागल्याने संस्थेची आर्थिक ओढाताण खूप होते. ती बघून लोक देणगी देतात पण सरकार लक्ष देत नाही. गांधी, आंबेडकर, सावरकर अशी तिघांची पायधूळ लागलेली ही संस्था टिकायला हवी.
